*????भेट दोन ????साहेबांची????…. नित्य स्मरणातील! ????*

👇बातमी ऐकण्यासाठी येथे क्लिक करा.

भेट दोन साहेबांची…. नित्य स्मरणातील! 

या पहिल्या लेखमालेस आपण उदंड प्रतिसाद दिलात, त्याबद्दल आभार मानतो! ही लेखमाला आपल्या पसंतीस उतरली व ती पूर्ण होण्याआधीच नवीन कोणत्या विषयावर लिहिणार, अशी विचारणा सुरू झाली. त्यातूनच प्रेरित होऊन आता एका वेगळ्या पद्धतीने नव्या लेखमालेचा श्रीगणेशा करीत आहे. त्यासही आपला उत्तम प्रतिसाद मिळेल अशी आशा आहे. *लिहीणं गरजेचं असतं जे ऐकायला तयार नाहीत त्यांनी वाचाव म्हणून*

श्रीशिवछत्रपतींची प्रेरणा
आणि
पदभ्रमंतीचा थरार!

भाग पहिला : 

शिवरायाचे आठवावे रूप।
शिवरायाचा आठवावा प्रताप।
शिवरायाचा आठवावा साक्षेप।
भूमंडळी।।- समर्थ रामदास स्वामी

आपल्या प्रत्येकाच्या जीवनातील तारुण्यकाळ हा सळसळत्या उत्साहाने भरलेला असतो. रोजच नव्या स्वप्नांचा धावता मागोवा घेण्यात नव्या उमेदीने काळ व्यतित होत असतो. तारुण्याच्या उंबरठ्यावर पाऊल टाकले की विविध प्रकारची ‘प्रलोभने’ आपल्या सभोवती फेर धरू लागतात. याच वयात विचारांच्या महापुरात ‘तग’ धरण्याची धडपड सुरू होते. त्यातूनच कुणाला महापुरुषांच्या चरित्रातून तर काही जणांना अन्य महनीय व्यक्तिरेखा ‘भुरळ’ घालतात. त्यांच्या पावलावर पाऊल टाकत पुढे जाण्यासाठी आपापल्यापरीने प्रयत्नही सुरू राहतात.

हे सर्व जरी खरे असले तरी, आपल्या पैकी बहुतांश जणांना श्रीशिवछत्रपतींच्या चरित्राची ओढ निश्चितच लागलेली असेल किंवा आहे! अशीच काहीशी मनोवस्था आमच्या सर्व सवंगड्यांची देखील झाली होती. एकीकडे हिंदुत्ववादी विचारांचा पगडा आणि दुसरीकडे श्रीशिवछत्रपतींच्या पराक्रमाच्या शौर्यगाथा यातून प्रेरणा घेऊनच आमचा तारुण्य काळ सळसळत होता. त्यावेळी ना टिव्ही होते ना मोबाईल. त्यामुळे विविध प्रकारचे खेळ खेळण्यात सगळे रमून जायचो. शिवाय व्यायामाची (बलभीम व्यायामशाळा), पुरात उड्या मारून पोहण्याची तसेच कै. रमेश माने (पत्रकार) यांच्याशी ओळख झाल्यावर त्यांच्याकडून कराटे शिकण्याचाही सराव आम्ही करत असू. मेट्रो सायकल मार्टमधून सायकल भाड्याने घेऊन भटकण्याचा आनंदही लुटत होतो. गल्लीतील खेळ तर आता इतिहासजमा झाले आहेत. थोडक्यात म्हणजे मैदानी खेळ खेळण्यात आमचे बालपण व तारुण्य काळही मागे पडत होता.

परंतु, केवळ खेळण्यातच किंवा उनाडक्या करण्यात आमचा कालापव्यय न करता आम्हाला छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरित्राच्या वाचनाची रुची निर्माण झाली. त्याच वेळी “राजा शिवछत्रपती” या बाबासाहेब पुरंदरे लिखित पुस्तकाची एक प्रत आमच्या हाताशी लागली. पण ती एकच प्रत आम्ही मित्र एका पाठोपाठ एकेक करत वाचून काढत होतो. त्या प्रतीची जणू पारायणेच सुरू होती म्हणा ना! त्यातून शिवचरित्रातील ‘वीरगाथा’ आमच्या नसानसात भिनत होत्या. दिवाळीच्या कालावधीत किल्ले बनविण्याची जणू चढाओढ होती. गणेशोत्सव तर अगदी बालवयातच आम्ही साजरा करत होतो आणि पुढे जाऊन “मयूर गणेश मंडळही स्थापन” केले होते. (त्या इतिहासात पुढच्या काळात दृष्टीक्षेप टाकूया) याच मंडळाच्या वतीने शिवजयंती साजरी करण्यासही प्रारंभ झाला. अगदी रात्रभर जागून सुतळी व भगव्या पताका चिकटवून त्या सगळ्या गल्लीत लावण्यात आम्ही गुंतलेले असायचो. पताका इतक्या दाटीवाटीने लावायचं की माध्यानीचा सूर्यप्रकाशही रस्त्यावर पडता कामा नये असा मानस असायचा.
श्रीशिवजयंतीला एकदा प्रतापगड व एकदा सज्जनगड किल्ल्यावरून  शिवज्योत आणण्याची कसोटी देखील आम्ही लिलया पार पाडली होती. याच सर्व भारावलेल्या मनःस्थितीत काळ, वेळ, दिवस आणि वर्षे सरत होती. पण केवळ हे सर्व करूनच आम्ही थांबलो नव्हतो तर काही तरी वेगळे, ‘साहसी’ करायला हवे (थ्रिल) अशी रुखरुख लागली होती. शिवाय मोबाईल नसल्याने  रील्स’च्या महाजालात गुंतण्याचा धोकाही नव्हता. पण नेमके काय करायचे? हे मात्र ठरत नव्हते. आमच्या परिचयातील देखील कुणी प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने वाटचाल करीत असलेले दिसत नव्हते.

छत्रपती शिवरायांच्या चरित्राच्या वाचनाने आम्ही नवचैतन्याने भारावलो होतोच; पण त्यातून प्रेरित होऊन नेमके काय करावे? याचा मात्र ‘सुगावा’ लागत नव्हता. जरी त्या काळात टीव्ही नव्हते तरी रोजची वर्तमानपत्र अनेक घरोघरी येतच होती. ती वाचण्याची सवयही आम्हाला लागली होती.

एक दिवस दैनिक सकाळचा अंक आमच्या वाचनात आला. त्यामध्ये गडकिल्ल्यांची अगदी मोजकीच माहिती प्रसिद्ध होत होती. कुणी तरी इतिहास प्रेमी ते सदर लिहीत असत. ती माहिती अगदीच तोकडी असली तरी त्यात त्या गडावर किंवा किल्ल्यावर जाण्यासाठी असलेला मार्गही लिहिलेला असायचा पण तो देखील अगदी थोडक्या शब्दात!

पण हाती लागलेल्या त्या अंकाने आमच्या जीवनात आणखी एका क्रांतीचा उदय झाला होता. आम्हाला ‘थ्रिल’ गवसले होते. असे काय होते ते? तर त्या अंकात वासोटा किल्ल्याचा इतिहास व तिथे जाण्यासाठी असलेला मार्ग दर्शविला होता. बास!….आता आम्हाला एक दिशा मिळाली होती. पण नेमके जायचे कसे? या प्रश्नाचे उत्तर सापडत नव्हते. आमच्या वयाचा विचार करता घरातून अशा अपरिचित ठिकाणी जाण्याची परवानगी मिळण्याची शक्यता नव्हती. किंवा ते समक्ष घरच्यांकडे मागण्याचे धाडस आमच्या ठाई नव्हते. आम्ही काही जण मिळून (खर सांगायचे तर दोघेच) यावर तोडगा काढण्यासाठी खलबते सुरू केली. परंतु श्रीशिवछत्रपतींच्या चरित्रातून “गनिमीकावा” तर आमच्या अंगात जणू भिनला होता. त्याचा वापर स्वतःच्या जीवनात करण्याची संधी चालून आली होती.

*ठरले तर मग….आता वासोट्याची मोहिम फत्ते करायचीच!!*

क्रमशः
समीर श्री. आराणके (ज्येष्ठ पत्रकार), सोमवार पेठ, कराड
दूरभाष : ९४०३१६६५५८ 

Jan Swarashtra
Author: Jan Swarashtra

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!