????भेट दोन ???? साहेबांची ????…. नित्य स्मरणातील! ????

👇बातमी ऐकण्यासाठी येथे क्लिक करा.

भाग आठवा : 

आपल्या पैकी काही जणांना तरी रोजनिशी किंवा डायरी लिखाणाची सवय असते. पण त्या रोजनिशीचे एक वैशिष्ट्य आपण सगळेच दुर्लक्षित करतो. पहा! त्या रोजनिशीचे नव्याने उघडणारे पान नेहमीच कोरे असते. दिवस सरत आला की आपण त्यावर लिखाण करतो. पण आज लिखाण केलेले पान दुसऱ्या दिवशी मागे पडते आणि परत नव्याने कोरे पान पुढे येते.

म्हणण्याचा हेतू इतकाच की कधी तरी अशा भूतकाळात हरवलेल्या आठवणी पुन्हा ताज्या करायला हव्यात. जरी त्यातून फारसे काही साध्य होत नसले तरी आजचे किंवा उद्याचे कोरे पान लिहिताना आपल्याला नवी प्रेरणा, उमेद, दिशा निश्चितच मिळू शकेल! ही सगळी लेखमाला देखील अशाच एका कोऱ्या पानावरुन सुरू झाली पण तिच्या लिखाणाचा श्रीगणेशा भूतकाळात हरवलेल्या पानावर अदृश्य रुपात राहिला होता.

एक महत्त्वाचा नामोल्लेख राहून गेला तेवढा करून मूळ विषयावर येतो. १९९१ सालात जेव्हा आम्ही परत सायकलने मुंबईला गेलो त्यावेळी वाटेत नवी मुंबई येथे मुक्काम केला होता. आमची संपूर्ण बडदास्त श्रीमान गणेश नाईक साहेब यांनी मोठ्या आदराने केली होती. असो!

धर्मवीर आनंद दिघे साहेब म्हणजे शिवसैनिकांसाठी *”आधारवड”* होते. त्यांच्या *”छत्रछायेत”* गेलो की आम्ही आमचे विश्व विसरून जात होतो. सलग दोन वर्ष ओझरती का होईना त्यांना पाहण्याची, भेटण्याची संधी मिळाली होती ती आठवणीची शिदोरी घेऊन आमची कराडची दिनचर्या सुरू होती. एक विशेष गोष्ट सांगून जायचे विसरले आहे. आम्ही मुंबईत गेलो त्यावेळी सोबत येताना एक विशेष वस्तू सोबत आणली होती आणि ती म्हणजे…..
*खिशाला लावायचे बॉलपेन!*
तुम्हाला कदाचित हसू येईल पण ते पेन आमच्यासाठी पुढील काळात आमची ओळख बनले होते. असे काय होते त्या पेनमध्ये? तर त्यावर अगदी छोट्या आकारात श्री. बाळासाहेबांचे चित्र गोलाकार लावलेले असायचे. असेच श्री. दिघे साहेबांचे चित्र असलेले पेन मिळायचे. तर अशी ही दोन पेन आम्ही अगदी दररोज शर्टाच्या खिशाला लावून वावरत असू. त्यातूनच *’आम्ही कुणाचे कोण’* आहोत हे पाहणाऱ्याला समजत असे. अगदी साधी वस्तू पण साहेबांच्या फोटोमुळे ती *अनमोल* ठरत होती.

तो काळच असा भारावलेला होता की अगदी लहानसहान गोष्टी देखील आम्हाला नवचैतन्य देत होत्या. याच दरम्यान सिनेमा किंवा पिक्चर पाहण्याचे बरेच *फॅड* होते. त्यावेळी मिथून चक्रवर्ती यांच्या ब्रेकडान्सने तरुणांना जणू वेड लावले होते. त्यातूनच आमच्यापैकी काही जणांनी हा डान्स प्रकार शिकण्याची शिकस्त चालवली होती. एक दिवस बुरुड गल्लीत राहण्यास असलेल्या *गोपी* नावाच्या डान्सरबरोबर आमची ओळख झाली आणि त्याने आम्हाला ब्रेकडान्सचे धडे देण्याचे कबूल केले व पुढे काही दिवस तो प्रयोगही सुरू राहिला.

परंतु त्यातून गोप्याबरोबर आमची चांगली गट्टी जमली. तो पण शिवसैनिक असल्याने आमची मैत्री अधिक दृढ झाली. त्याला मुंबईत जाऊन एखाद्या ऑर्केस्ट्रा किंवा तत्सम ठिकाणी डान्स करण्यासाठी जायची इच्छा व तळमळ लागली होती. मग मी आणि तो असे दोघे मिळून मुंबई गाठायचे व ठाण्यात जाऊन श्री. दिघे साहेबांना भेटायचे असे ठरले. त्यानुसार आमचा एक मित्र रमेश कदम (पूर्वी ढवळीकर वाड्यात मे महिन्याच्या सुट्टीत राहायला येत असे) हा मुंबईत रहायला होता. आम्ही थेट त्याचे घर गाठले आणि तिथूनच ठाण्याला “आनंद आश्रमात” साहेबांच्या भेटीला दाखल झालो.

साहेबांची भेट झाली आणि मी त्यांना त्यांच्याकडे येण्याचा उद्देश स्पष्ट केला. त्यांनी फक्त *थांब* अशी खूण केली. आम्ही एका बाजूला होऊन उभे राहिलो. सगळा दिवस लोक त्यांच्या भेटीसाठी येतच होते. रात्र होत आली तरी माणसांची रिघ सुरूच होती. त्यातूनच साहेबांची नजर आमच्याकडे वळली आणि आम्ही अजूनही तिथेच आहोत हे पाहून साहेबांनी कुणाला तरी हाक मारली आणि *”अरे यांची राहण्याची व जेवणाची व्यवस्था कर”* असे सांगितले.

आम्ही गुपचूप त्यांच्या मागे बाहेर पडलो आणि जवळच असलेल्या एका अपार्टमेंटच्या खोलीत त्यांनी आम्हाला *”इथे मुक्काम करा मी जेवण आणून देतो”* असे सांगितले. चला हे ही नसे थोडके असे म्हणत आम्ही तिघेही तिथेच विसावलो. पण जे आज घडले आहे तेच उद्या, परवा आणि तेरवा देखील घडणार आहे याची आम्हाला जाणीव देखील झाली नाही. तिसऱ्या दिवशी रमेश कंटाळला मग आम्ही आमचे साहित्य आणण्यासाठी रमेशच्या घरी गेलो व परत आम्ही फक्त दोघेच (मी व गोप्या) परत आनंद आश्रमात दाखल झालो.

राहण्याची व जेवणाची व्यवस्था तर झाली होती पण गोप्याच्या कामाचे काय? कारण एक दोन नव्हे तर आठवडा होत आला तरी साहेब काहीच सांगत नव्हते. आणि आम्ही देखील योग्य संधीची प्रतिक्षा करण्यात थकत नव्हतो. अर्थात संपूर्ण दिवस व रात्र माणसांच्या गराड्यात हरवलेल्या साहेबांना उसंत तरी मिळायला हवी. पहाटे चार/साडेचार पासून माणसांचे येणे जाणे सुरू व्हायचे आणि मध्यरात्री नंतर कधी तरी ती वर्दळ कमी व्हायची. सलग आठ दिवस हे सगळे चित्र आम्ही पाहत व अनुभवत होतो.

आठ दिवस झाले आणि त्या दिवशीच्या मध्यरात्री म्हणजे साधारण एक/दीडच्या सुमारास मी, स्वतः साहेब आणि गोप्या असे तिघेच तिथे राहिलो होतो. हीच संधी मिळाली आणि मी साहेबांना गोप्या चांगला डान्सर आहे व त्याला कामाची गरज आहे. त्याला कुठेतरी हॉटेल, ऑर्केस्ट्रा मध्ये लावा अशी विनंती केली. साहेबांनी त्यांच्या नेहमीच्या शैलीत मान हलवली आणि गोप्याकडे नजरेचा कटाक्ष टाकत म्हणाले, *”चल नाचून दाखव”.*

आता मात्र गोप्याची पुरती भंबेरी उडाली. गाणं नाही की म्युझिक नाही आता नाचायचे कशावर असे भाव त्याच्या चेहऱ्यावर उमटले होते.
साहेब पुन्हा एकदा म्हणाले, *”अरे नाचून दाखव की”.*
मग मीच मध्यस्थी करत म्हटले, “साहेब म्युझिक नसल्याने तो कसे नाचू शकणार?”
माझे हे उत्तर ऐकले मात्र आणि साहेब त्यांच्या नेहमीच्या शैलीत फक्त गालातल्या गालात हसत, एक शब्दही न बोलता खोलीत निघून गेले.

केवळ म्युझिक नाही म्हणून हाताशी आलेली संधी गोप्याने गमावली याची जाणीव मला झाली. दुसऱ्या दिवशी सकाळी आम्ही साहेबांची भेट घेतली व आम्ही कराडला निघत असल्याचे सांगितले.
*”तू इथे रहा, संघटनेचे काम कर सगळी व्यवस्था करतो”,* असे त्यांनी मला सूचित केले पण…..खरच साहेब म्हटले तसे त्यावेळी आपण तिथेच राहिलो असतो तर? आजही हा प्रश्न कधी तरी विचारात येतो. केवळ दिघे साहेबच नव्हे तर सूर्यकांत महाडिक यांनीही अशीच इच्छा व्यक्त केली होती. त्यामुळे आजही काही मित्र उपहासाने म्हणतात की,  *”त्यावेळी तिकडे गेला असतास तर तुझें व आमचेही आयुष्य काही वेगळे घडले असते”*

परंतु, या आठ दिवसांच्या भेटीनंतर काही काळाने साहेब कराडला आले होते आणि काही वेळासाठी ते बलभीम तालमीच्या जवळ असलेल्या डॉ. सतिश नारकर यांच्याकडे भेटीसाठी आले होते. पण तिथे आल्यावर साहेबांनी माझी चौकशी केली. नुसतीच चौकशी करून थांबले नाहीत तर माझ्या घरी त्यांच्या भेटीसाठी येण्याचा निरोपही धाडला. तो निरोप मिळताच मी देखील धावत जाऊन साहेबांची भेट घेतली. पुढेही अशी भेट होत होती पण रोजनिशीची पाने मागेच पडली होती!

असा हा सगळा स्नेहबंध निर्माण झाला आणि आजही तो हृदयाच्या खोल कप्प्यात साठवून ठेवला आहे. तो ठेवा काही अंशी तरी उलगडण्याचा हा प्रयत्न होता. आता अखेरच्या टप्प्यात सर्वश्री शिवसेनाप्रमुख मा. श्री. बाळासाहेब ठाकरे, माँ साहेब मीनाताई ठाकरे, धर्मवीर आनंद दिघे साहेब, मनोहर जोशी, सुधीर जोशी, सूर्यकांत महाडिक, चंद्रकांत पवार, रामभाऊ रैनाक, संजय मोहिते, रमेश माने (पत्रकार), विजय उंडाळकर, महेश उमराणी,  डॉ. सतिश नारकर यांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन करून तसेच या संपूर्ण प्रवासात व त्या काळात शिवसेनेच्या वाटचालीत ज्या ज्ञात/अज्ञात व्यक्तींनी योगदान दिले त्या सर्वांचे आभार मानून या लेखमालेस तूर्त विराम देतो! जय हिंद! जय महाराष्ट्र!!

समाप्त : 

समीर श्री. आराणके (ज्येष्ठ पत्रकार, कराड) 

दूरभाष : ९४०३१६६५५८ 

Jan Swarashtra
Author: Jan Swarashtra

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!