कराड/प्रतिनिधी : –
पुणे जिल्ह्याचे जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी यांच्याकडे सैनिक फेडरेशन महाराष्ट्र राज्यचे उपाध्यक्ष माजी सैनिक प्रशांत कदम यांनी सातारा जिल्ह्याप्रमाणे पुणे जिल्ह्यात सर्व आजी-माजी सैनिक, त्यांचे कुटुंबीय, शहीद जवानांच्या कुटुंबीयांचे प्रलंबित प्रश्न, विविध समस्या सोडवण्यासाठी सैनिक दरबार आयोजित करण्याची मागणी निवेदनाद्वारे केली होती. त्यास जिल्हाधिकारी श्री. डूडी यांनी सकारात्मक प्रतिसाद देत मंगळवार (दि. 13) मे रोजी वाजता जिल्हाधिकारी कार्यालय, पूणे येथे सैनिक दरबार आयोजित केला आहे. यामुळे प्रशांत कदम यांच्या मागणीला यश आले आहे.
प्रलंबित प्रश्न, समस्या सोडवण्यासाठी पाठपुरावा : माजी सैनिक प्रशांत कदम जिल्ह्यातील सर्व आजी, माजी सैनिक, त्यांचे कुटुंबीय व शहीद जवानांच्या कुटुंबीयांचे प्रलंबित प्रश्न, विविध समस्या सोडवण्यासाठी श्री. जितेंद्र डूडी सातारा जिल्ह्याचे जिल्हाधिकारीपदी कार्यरत असताना त्यांच्याकडे पाठपुरावा केला होता. त्यावेळी श्री. डूडी यांनी यासंदर्भात विविध बैठका घेतल्या होत्या. तसेच सैनिक दरबारही भरवून अनेक प्रश्न मार्गी लावले होते.
मागणी : श्री. डूडी पुणे जिल्ह्याचे जिल्हाधिकारी म्हणून रुजू झाल्यानंतर सातारा जिल्ह्याप्रमाणे पुणे जिल्ह्यातीलही सैनिक दरबार भरवून सर्व आजी, माजी सैनिक, त्यांचे कुटुंबीय व शहीद जवानांच्या कुटुंबीयांचे प्रलंबित प्रश्न, विविध समस्या सोडवण्यासाठी प्रयत्न करावेत, अशी मागणी माजी सैनिक प्रशांत कदम यांनी श्री. डूडी यांच्याकडे निवेदनाद्वारे केली होती.
आश्वासन पूर्ती : त्यावेळी जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी यांनी सकारात्मक प्रतिसाद देत लवकरच सैनिक दरबार आयोजित करण्याचे आश्वस्त केले होते. त्यानुसार जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी यांच्या अध्यक्षतेखाली व सैनिक कल्याण विभाग महाराष्ट्र राज्य उपसंचालक तथा जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी, पुणे ले. कर्नल सतेश हंगे यांच्या उपस्थित मंगळवार (दि. 13) मे रोजी सकाळी 10 वाजता जिल्हाधिकारी कार्यालय पूणे येथे सैनिक दरबार आयोजित केला आहे. यामुळे प्रशांत कदम यांच्या मागणीला यश आले आहे.
आवाहन : या सैनिक दरबारप्रसंगी पुणे जिल्ह्यातील सर्व आजी, माजी सैनिक, त्यांचे कुटुंबीय, शहीद जवानांच्या कुटुंबीयांनी बहुसंख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी, पुणे यांच्यावतीने करण्यात आले आहे.