कराड/प्रतिनिधी : –
शेतकऱ्यांची कर्जमाफी, हमीभाव व दिव्यांगाना सहा हजार रूपये पेन्शन या मागण्यांसाठी मंगळवार (दि. 13) रोजी प्रहारचे संस्थापक अध्यक्ष बच्चू कडू यांच्या उपस्थितीत सार्वजनिक बांधकाम मंत्री छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या सातारा येथील निवासस्थानासमोर रक्तदान आंदोलन करण्यात येणार आहे. त्याच दिवशी कराडला विभागीय कार्यकर्त्यांचा मेळावा व संताजी-धनाजी पुरस्काराचे वितरण करण्यात येणार असल्याची माहिती प्रहार जनशक्ती पक्षाचे जिल्हाध्यक्ष मनोज माळी यांनी दिली.
पत्रकार परिषद : माजी मंत्री बच्चू कडू हे मंगळवारी रक्तदान आंदोलन व मेळाव्याच्या निमित्ताने कराड व सातारा दौऱ्यावर येणार आहेत. याबाबत माहिती देण्यासाठी शासकीय विश्रामगृह येथे आयोजित पत्रकार परिषदेचे ते बोलत होते.
मान्यवरांची उपस्थिती : यावेळी महिला आघाडीच्या जिल्हाअध्यक्षा मनिषा चव्हाण, पाटण तालुका अध्यक्ष शुभम उबाळे, प्रहार अपंग क्रांती आंदोलनाच्या जिल्हाअध्यक्षा सुरेखा सुर्यवंशी, आक्काताई ढेबे, माधुरी बावधने, बंटी मोरे व कार्यकर्ते उपस्थित होते.
विभागीय कार्यकर्ता मेळावा : मंगळवारी दुपारी 2 वाजता बच्चू कडू यांच्या उपस्थितीत टाऊन हॉल येथे विभागीय कार्यकर्त्यांचा मेळावा होणार असल्याचे सांगत श्री. माळी यांनी या मेळाव्यासाठी सातारसह पुणे, सांगली व कोल्हापूर जिल्ह्यातील पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित रहाणार असल्याचे सांगितले.
संताजी-धनाजी पुरस्कार : या मेळाव्यात संघटनेसाठी प्रामाणिकपणे काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना संताजी-धनाजी पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार असल्याचेही श्री. माळी यांनी यावेळी सांगितले.
आंदोलनाची सांगता : सरकारने जाहीरनाम्यात म्हटल्याप्रमाणे शेतकऱ्यांची कर्जमाफी करावी, शेतमालाला हमीभाव द्यावा व दिव्यांगाना सहा हजार रूपये पेन्शन द्यावी, या मागण्यांसाठी बच्चू कडू यांच्या नेतृत्वाखाली प्रहारच्या वतीने रक्तदान आंदोलन करण्यात येत आहे. रायगडपासून सुरुवात झालेल्या या आंदोलनाची सांगता सातारा येथे करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
सरकारला जाग आली नाही : काही दिवसांपुर्वी राज्यातील सर्व आमदारांच्या घरासमोर मशाल मोर्चा काढण्यात आला होता. तरीही सरकारला जाग आलेली नाही. त्यामुळे 14 रोजी राज्यातील सर्व मंत्र्यांच्या घरासमोर रक्तदान आंदोलन करण्यात येणार आहे. बच्चू कडू 13 रोजी कराड व सातारा दौऱ्यावर येत असल्याने 13 रोजी दुपारी कराडचा मेळावा झाल्यानंतर सायंकाळी 7 वाजता मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या सातारा येथील निवासस्थानासमोर रक्तदान आंदोलन करण्यात येणार असल्याचे श्री. माळी यांनी यावेळी सांगितले.