हर्षवर्धन सपकाळ : यशवंतराव चव्हाण स्मृतिस्थळी अभिवादन, दोन राष्ट्रवादी एकत्र आल्यास आनंद
कराड/प्रतिनिधी : –
काँग्रेसचे कार्यकर्ते फोडा अशी भूमिका भाजपचे प्रदेशाध्यक्ष जाहीरपणे व्यक्त करीत आहेत. पण काँग्रेसमुक्त भारत करता करता भाजपाच काँग्रेसयुक्त झाली आहे, हे त्यांनी लक्षात घ्यावे. अनेकजण अडचणीमुळे भाजप पक्षात जात असले, तरी अजूनही काँग्रेस संपलेली नाही. यातून त्यांनी काहीतरी धडा घ्यावा, अशी प्रतिक्रिया काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी दिली.
अभिवादन : प्रीतिसंगमावरील दिवंगत यशवंतराव चव्हाण यांच्या स्मृतिस्थळी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ शनिवारी दुपारी अभिवादन केले.
मान्यवरांची उपस्थिती : याप्रसंगी प्रदेश युवक काँग्रेसचे कार्याध्यक्ष शिवराज मोरे, अजितराव पाटील – चिखलीकर, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष निवास थोरात, माजी नगरसेवक प्रदीप जाधव, अशोकराव पाटील, अमित जाधव, रणजित देशमुख आदींची उपस्थिती होती. यावेळी माध्यमांशी संवाद साधताना ते बोलत होते.
काँग्रेस कधीही संपणार नाही : काँग्रेसचे अनेक नेते आज भाजपच्या वाटेवर आहेत. परंतु, भाजपचे नेते त्यांना वेटिंगवर ठेवल्याच्या भावना व्यक्त करीत आहेत. याबाबत छेडले असता श्री. सपकाळ बोलत होते. ते पुढे म्हणाले, काँग्रेस पक्ष संपवण्याच्या वल्गना कोणी करत असले, तर काँग्रेस पक्ष कधीही संपणार नाही. कारण भारताचा आणि काँग्रेस पक्षाचा डीएनए एकच आहे. त्यामुळे लोकशाही वाचवण्यासाठी, राज्यघटना वाचण्यासाठी या पुढच्या काळामध्ये काँग्रेस जोरकसपणे प्रयत्न करेल. काँग्रेस पक्षाला दीडशे वर्षाची परंपरा असून कोणी ओसाड गावची पाटीलकी माझ्याकडे आली असे म्हणत असेल, तर ते चुकीचे असल्याचेही त्यांनी एका प्रश्नावर बोलताना सांगितले.
दोन राष्ट्रवादी एकत्र आल्यास आनंदच : दोन राष्ट्रवादी कॉंग्रेस एकत्र येणार असल्याचे बोलले जात आहे? या प्रश्नावर ते म्हणाले, काँग्रेसची भूमिका ही नेहमी ‘भारत जोडो’ची राहिलेली आहे. त्यामुळे दोन राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र आल्या, दोन कुटुंबे एकत्र आली, तर आम्हाला आनंदच होईल, अशी प्रतिक्रियाही त्यांनी यावेळी दिली.
आघाडीचे नुकसान सोसावे लागले : खरंतर, गतकाळात आघाडीची अपरिहार्यता होती. त्यामुळे राजकारणात आम्हाला आघाडी करावी लागली. त्याचेच मोठे नुकसान आम्हाला सोसावे लागले. मात्र, आता आम्ही नव्याने काँग्रेसची बांधणी चांगल्या पद्धतीने करणार असल्याचे श्री. सपकाळ यांनी एका प्रश्नावर बोलताना श्री. सकपाळ यांनी सांगितले.
स्थानिक नेत्यांना निर्णयस्वातंत्र्य : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वतंत्रपणे लढवणार, की आघाडी म्हणून? यावर बोलताना श्री. सकपाळ सन २०२५ हे वर्ष पक्षाने संघटनात्मक वर्ष जाहीर केले आहे. त्यामुळे प्रत्येक जिल्ह्यात अपेक्षित फेरबदल, दुरुस्त्या होतील या शंका नाही. येणाऱ्या काळात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार आहेत. त्या स्वतंत्र लढवायच्या, की स्थानिक पातळीवर पुन्हा आघाड्या करूनच लढवायच्या, हा निर्णय जिल्हास्तरावरील स्थानिक नेते घेतील. तशी मोकळीक त्यांना देण्यात आली असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.
