राजू शेट्टी; 31 व्या अखिल भारतीय नवोदित मराठी साहित्य संमेलनाची सांगता
कराड/प्रतिनिधी : –
शेतकऱ्यांच्या जगण्याचे वास्तव साहित्यिकांनी समाजासमोर मांडले पाहिजे, साहित्यिकांनी लिखाण करताना पुरस्कारासाठी न करता समाजाच्या हितासाठी करून त्यावरील उपाय देखील त्यामध्ये सुचित करावेत. तरच साहित्य अधिक समृद्ध होईल, असे प्रतिपादन माजी खासदार व शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी केले.
साहित्य संमेलन : अखिल भारतीय मराठी साहित्य परिषद आयोजित मराठी साहित्य संमेलनात ‘कृषक समाज काल आज आणि उद्या’ या विषयावरील परिसंवादात त्यांनी आपले विचार व्यक्त केले.
मान्यवरांची उपस्थिती : यावेळी साहित्य परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. शरद गोरे, कोल्हापूर विभागीय अध्यक्ष विकास भोसले, शेतकरी संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष विठ्ठल राजेपवार, शेतीमित्र अशोकराव थोरात, कराड कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती प्रकाश पाटील, संचालक नितीन ढापरे, परिषदेचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष प्रा.डॉ. नितीन नाळे, राज्य उपाध्यक्ष डॉ. हनुमंत चिकणे उपस्थित होते.
शेतकऱ्यांपासून संस्कृतीचा उदय : शेतकऱ्यांच्या बाबतीत शासकीय व्यवस्थेची भावना बोथट झाली आहे. वर्षानुवर्षे शेतकरी अन्याय सहन करत आहेत. भारतीय संस्कृतीचा उदय शेतकऱ्यांपासून झाला आहे, असे सांगत श्री. शेट्टी म्हणाले, भांडवलदाराने शेतकऱ्यांना लुटण्याचे काम आजपर्यंत केले. स्वामीनाथन, सुब्रमण्यम यांनी देशात हरितक्रांती आणली. शेतकऱ्यांनी समृद्धी आणली त्यांची अवस्था दयनीय झाली आहे. साहित्यिकांनी शेतकऱ्यांचे चित्र योग्य पद्धतीने रंगवले नाही. गोरगरिबांचे शोषण करणारा, फेटा उडवणार अशा पद्धतीचे चित्रण मराठी साहित्यात व चित्रपटात रंगवले गेले. त्यामुळे शेतकऱ्यांच्या जगण्याचे वास्तव साहित्यिकांनी समाजासमोर मांडले पाहिजे.
धोरणात्मक निर्णय घेऊन कायदे करायला हवेत : उत्पादन खर्च प्रतिदिन वाढत आहे. या उलट शेतकऱ्याचे उत्पन्न घटत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढल्या असून दिवसाला सात शेतकरी आत्महत्या करत आहेत, असे सांगत श्री. शेट्टी म्हणाले, शरद जोशी म्हणायचे, सरकारचे धोरण हेच शेतकऱ्याचे मरण आहे. आसमानी संकटाचा सामना करत शेतकरी शेती करत असताना सरकार सुलतानी संकट शेतकऱ्यांवर लादत आहे. बाजार पेठ व उत्पादित मालाची नेमकी माहिती सरकारकडून शेतकऱ्यांना दिली जात नाही, त्यामुळे शेतकरी आतबट्ट्यात येत आहे. शेतकऱ्यांचे उत्पन्न कमी असेल तर सरकारने धोरणात्मक निर्णय घेऊन तसे कायदे करायला हवेत.
संस्कृत कधीही राजभाषा नव्हती : या देशात शेतकऱ्याची मोठी पिळवणूक होत आहे. जात व धर्म ही व्यवस्था बोगस आहे. शेतकरी व बहुजन समाजाला दाबण्यासाठी प्रयत्न झाले, असे सांगत डॉ. शरद गोरे म्हणाले, मराठी राजभाषा आहे. संस्कृत कधीही राजभाषा नव्हती. याचे कोणतेही संदर्भ साहित्यात आढळून येत नाहीत. महात्मा फुले यांनी सांगितले होते सर्वात पहिली गुलामी वैचारिक केली जाते. ही व्यवस्था बदलण्यासाठी विचारवंतांना पुन्हा एकत्रित करावे लागेल.
आत्महत्यांना सरकार जबाबदार : जोपर्यंत शेतकऱ्यांमध्ये राजकारण आहे, तोपर्यंत त्यांना एकत्र येऊ दिले जाणार नाही, असे सांगत विठ्ठल राजेपवार म्हणाले, उत्पादन वाढवा म्हणून सांगणारे भरपूर आहेत. पण शेतमालाला भाव द्या, असे म्हणणारे खूप कमी आहेत. शेतकऱ्यांच्या आत्महत्येला केंद्र व राज्य सरकार जबाबदार आहे. सत्तेसाठी वापर करून घेणाऱ्या राजकारण्यांना बाजूला केले पाहिजे. भारतीय राज्यघटनेने शेतकऱ्यांना सन्मानाने जगण्याचे अधिकार दिले. पण त्याची अंमलबजावणी होताना दिसत नाही. यासाठी शेतकरी संघटनानी संघर्ष करण्याची गरज आहे.
आभार : यावेळी साहित्यिक, कवी, नागरिक उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विक्रम शिंदे, विकास भोसले यांनी आभार मानले.
उत्पादन खर्चावर भाव देण्याची सरकारची जबाबदारी
सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळे शेतमालाला भाव मिळत नाही. शेतीमालाच्या दरावर नियंत्रण करण्याचा कायदा सरकारने केला असला, तरी शेतमालाला उत्पादन खर्चावर भाव देण्याची जबाबदारीही सरकारची आहे. बाजारपेठेवर शेतकऱ्यांचे नियंत्रण नाही, तंत्रज्ञानाच्या वापरावर निर्बंध लादले जात आहेत. हमीभावापेक्षा कमी भावाने शेतमाल खरेदी करणे कायद्याने गुन्हा आहे. त्याची अंमलबजावणी सरकारने करावी, असे आवाहन श्री. शेट्टी यांनी केले.
650 कवी व साहित्यिकांनी फुलून गेली साहित्यनगरी
साहित्य संमेलनासाठी महाराष्ट्र गोवा व कर्नाटक राज्यातून आलेल्या 600 कवी व साहित्यिकांची मांदिआळी यशवंतराव चव्हाण साहित्य नगरीत पाहायला मिळाली. कवी संमेलन कथाकथन परिसंवाद यासारख्या विविध विषयांचे मोठे विचार मंथन या विचारपीठावरून झाले.
