आ. डॉ. अतुलबाबा भोसले; कराडच्या वैकुंठधाम स्मशानभूमीची पाहणी, २५ वर्षांच्या दृष्टीने आराखडा
कराड/प्रतिनिधी : –
येथील स्मशानभूमीच्या सुधारीकरणासाठी शहरातील काही समाजसेवी वृत्तीच्या संघटना, व्यक्तींनी एकत्र येऊन ट्रस्टच्या माध्यमातून विविध उपक्रम हाती घेतले आहेत. यामध्ये दहन विधीसाठी लागणारे सर्व साहित्य विनामूल्य दिले जात आहे. अन्य सुधारण्याच्या बाबतीत माझ्याकडे आराखडा सादर केला आहे. त्यातील सर्व गोष्टींची शासन स्तरावरून पाठपुरावा करून सर्वोतोपरी मदत करणार असल्याची ग्वाही आ. डॉ. अतुलबाबा भोसले यांनी दिली.
स्मशानभूमीस भेट : येथील स्मशानभूमीस शनिवारी भेट देऊन वैकुंठधाम सुधार समितीच्या माध्यमातून केल्या जात असलेल्या विविध सुधार कामाची आ.डॉ. भोसले यांनी पाहणी केली. याप्रसंगी माध्यमांशी संवाद साधताना ते बोलत होते.
मान्यवरांची उपस्थिती : यावेळी मुख्याधिकारी प्रशांत व्हटकर, नगर अभियंता आर. डी. गायकवाड, वैकुंठधाम सुधार समितीचे अध्यक्ष विनायक पावसकर, उपाध्यक्ष सागर बर्गे, सचिव सुधीर एकांडे, खजिनदार महेंद्रकुमार शाह, सदस्य नितीन शहा, चंद्रकांत जिरंगे, सुरेश पटेल, विनियक विभुते, प्रकाश जाधव, माजी उपनगराध्यक्ष जयवंत पाटील आदी उपस्थित होते.

२५ वर्षांच्या दृष्टीने आराखडा : स्मशानभूमी सुधार समितीच्यावतीने विधानसभेचा सदस्य म्हणून आपणाकडे येणाऱ्या २५ वर्षांनंतर देखील कराडची अद्यावत स्मशानभूमी निर्माण करण्यासाठीचा एक आराखडा स्मशानभूमी सुधार समितीने आपणाकडे दिला असल्याचे सांगताना आ. डॉ. भोसले म्हणाले, यामध्ये स्मशानभूमीसाठी संरक्षण भिंत, बागबगीचा, कारंजा, स्वच्छता राखण्यासाठी काही उपकरणे, श्रद्धांजली शोकसभा घेण्यासाठी दुमजली हॉल करणे, जुन्या हॉलचे नुतनीकरण करणे, लोकांना बसण्यासाठी अद्यावत बैठक व्यवस्था करणे आदींची मागणी केली आहे.
पाठपुरावा व पूर्ततेसाठी प्रयत्न : स्मशानभूमी सुधार समितीच्या विविध मागण्यांबाबत शासनस्तरावर पाठपुरावा करून या सर्व गोष्टींची पूर्तता करण्याच्या दृष्टीने आपण प्रयत्न असून लवकरात लवकर या सर्व गोष्टींची पूर्तता करणार असल्याचे आ.डॉ. भोसले यांनी यावेळी सांगितले.
प्रयत्नांचे कौतुक : स्मशानभूमी सुधार समितीच्यावतीने स्मशानभूमीत करण्यात आलेल्या विविध बदलांची पाहणी त्यांनी यावेळी केली. दहन विधीसाठी लागणारे सर्व साहित्य विनामूल्य दिले जात असल्याच्या गोष्टीसह त्यांच्या अन्य प्रयत्नांचे कौतुक करत लोकांना दु:खद प्रसंगी स्मशानभूमीत लावणाऱ्या सोयी, सुविधा उपलब्ध करून त्यांची गैरसोय दूर करण्यासाठी आपण प्रयत्नशील राहणार असल्याचे आ. डॉ. भोसले यांनी यावेळी सांगितले.
