आ. डॉ. अतुलबाबा भोसले यांची कृतज्ञता; रिमांड होमला भेट, शासकीय व खाजगी पातळीवरून सोयी-सुविधा पुरवणार
कराड/प्रतिनिधी : –
कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघातील जनतेने आपल्याला भरभरून प्रेम दिले आहे. ज्या लोकांमुळे मी आज या पदावर पोहचलो, त्या पदाचा लोकांसाठी उपयोग व्हावा, ही आपली भावना आहे. त्याच भावनेतून रिमांड होमच्या माध्यमातून निराधार मुला-मुलींचे संगोपन केले जाते, त्यांच्यासाठी विविध सोयी-सुविधा उपलब्ध करता याव्यात, यासाठी आपण आपले विधानसभा सदस्य म्हणून मिळालेले पहिले मानधन रिमांड होमला देत असल्याची माहिती आ. डॉ. अतुलबाबा भोसले यांनी दिली.
रिमांड होमला भेट : कै. क्रांतिवीर माधवराव जाधव मुलांचे निरीक्षणगृह (रिमांड होम), तसेच येथील हुतात्मा स्मारकास आ.डॉ. अतुलबाबा भोसले शनिवारी भेट देऊन तेथील सुविधांची पाहणी केली. याप्रसंगी माध्यमांशी त्यांनी संवाद साधला.
मान्यवरांची उपस्थिती : यावेळी प्रांताधिकारी अतुल म्हेत्रे, रिमांड होमचे पदाधिकारी, राजेंद्र यादव (आबा), मलकापूर नगरपालिकेचे माजी सभापती शंकरराव चांदे, माजी सभापती प्रशांत चांदे, धनाजी देसाई आदींची प्रमुख उपस्थिती होती.

आयुष्य समाजासाठी समर्पित : कै. माधवराव जाधव यांचे आयुष्य समाजासाठी समर्पित होते. त्यांनी आपल्या आयुष्याच्या प्रत्येक क्षणी समाजातील दुर्बल, अनाथ आणि मागास मुलांच्या पुनर्वसनासाठी अथक प्रयत्न केल्याचे सांगत आ.डॉ. भोसले म्हणाले, कै. माधवराव जाधव यांच्या नावाने सुरु असलेले हे निरीक्षणगृह केवळ एक संस्था नसून, हजारो मुलांसाठी उमेदीचा आणि नवजीवनाचा किरण आहे.
६००० मुला-मुलींचा सांभाळ : या संस्थेला जवळपास ५० वर्ष झाली असून आजपर्यंत सहा हजार मुला-मुलींचा सांभाळ करण्याचे काम संस्थेने केल्याचे सांगत आ.डॉ. भोसले म्हणाले, आपणही या मुलांचे काहीतरी देणे लागतो, या जाणिवेतून आपण ही मदत केली असून त्यांच्या शैक्षणिक वाटचालीत या मदतीने सहकार्य होईल, हा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.
अडीअडचणी घेतल्या जाणून : मुलांचे निरीक्षणगृह (रिमांड होम) संस्थेच्या संचालक मंडळाची भेट घेऊन त्यांच्या अडीअडचणी याप्रसंगी आ.डॉ. भोसले यांनी जाणून घेतल्या. तसेच शासन स्तरावरून, त्याचबरोबर खाजगी संस्था व कंपन्यांकडून रिमांड होमला अत्याधुनिक सुविधा कशा पुरवता येतील, यासाठीही आपण प्रयत्न करणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

स्मारकाच्या सुशोभीकरणास सहकार्य
याप्रसंगी आ. भोसले यांनी येथील हुतात्मा स्मारकाला देखील भेट दिली. याप्रसंगी हुतात्मा स्मारक केवळ एक वास्तू नसून, आपल्या देशासाठी प्राण अर्पण करणाऱ्या वीर हुतात्म्यांची आठवण जपणारे पवित्र स्थळ आहे. त्यांच्या बलिदानामुळेच आपण आज स्वातंत्र्याच्या आणि लोकशाहीच्या छायेखाली मुक्तपणे जगू शकतो. त्यामुळे या स्मारकाच्या सुशोभीकरणास आपणाकडून तत्परतेने सहकार्य राहील, अशी ग्वाही आ.डॉ. अतुलबाबा भोसले यांनी दिली.
