मलकापूर म्हणजे नाविण्यपूर्ण योजना व संकल्पना साकारणारे सर्व सोयींयुक्त शहर. गेल्या 15 वर्षांपासून अखंडपणे 24 तास पाणीपुरवठा करणारे शहर, आदर्श सोलरसिटी, स्वच्छ व सुंदर शहर, विकासाची प्रयोगशाळा, किंबहुना विकासाचे माहेरघर म्हणजे मलकापूर. हे सार झालं फक्त आणि फक्त पृथ्वीराज बाबांच्या संकल्पनेतून आणि व कै. भास्कररावजी शिंदे (दादा) यांच्या प्रेरणेतून. मलकापूर शहराच्या विकासामध्ये राज्याचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचेच नव्हे, तर संपूर्ण चव्हाण कुटुंबाचे मोलाचे योगदान लाभले आहे. त्यांच्या अनमोल मार्गदर्शनाखाली मनोहर शिंदे (भाऊ) आज यशस्वी वाटचाल करत असून ते खऱ्या अर्थाने मलकापूर शहराचे विकासदूत आहेत.
– सुरेश जाधव (गो-का-क- मलकापूर)

मलकापूर शहराला रोलमॉडेल बनविण्याचे स्वप्न : स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये विकासात्मक दृष्टीकोन असणाऱ्या बाबांनी मलकापूरला नेहमीच प्राधान्यक्रम दिला आहे. मलकापूर शहराला रोलमॉडेल बनविण्याचे स्वप्न केवळ बाबांमुळे साकार झाले. सन 2013 मध्ये झालेली (17-0) पंचवार्षिक निवडणूक म्हणजे जनतेने बाबांवर व भाऊंवर दाखवलेल्या विश्वासाची दिलेली पोहोचपावती. सन 2008 साली ग्रामपंचायत बरखास्त करुन 24×7 नळपाणी पुरवठा योजनेच्या उभारणीला सुरुवात केली. यामध्ये खुप अडचणी आल्या. बाबांनी कै. भास्कररावजी शिंदे यांचे कार्य पुढे चालविण्याचे काम व जबाबदारी मनोहर भाऊंवर टाकली. ती जबाबदारी पार पाडण्यासाठी मनोहर भाऊंना त्यांच्या आशीर्वादामुळे नेहमीच बळ मिळत राहिल.

जगाच्या नकाशावर मलकापूरची ओळख : आज मलकापूरची ओळख जगाच्या नकाशावर वेगळ्या प्रकारे झाली आहे. मलकापूर शहराची सध्या व भविष्यात होणाऱ्या वाढीचा विचार करून, 24×7 नळपाणी पुरवठा योजना सन 2001 मध्ये सुरु केली. या योजनेमुळे पाणी व वीज बचत होऊन नगरपरिषदेच्या उत्पन्नात वाढ होण्यास मदत झाली आहे. यशाची देशपातळीवर दखल घेत अशा प्रकारच्या नाविण्यपूर्ण योजनेचा अनेक गावांनी व शहरांनी स्विकार केला आहे.
माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचे पाठबळ : या योजनेच्या अनुभवावरूनच केंद्र शासनाच्या स्मार्ट सिटी प्रकल्पात मीटरद्वारे पाणी पुरवठ्याची संकल्पना समाविष्ट झाली. पंधरा वर्षांपूर्वी ग्रामपंचायत बरखास्त करून नगरपंचायत करण्याचा धाडशी निर्णय घेऊन महाराष्ट्रातील मलकापूर ही चौथी नगरपंचायत स्थापन केली. या नगरपंचायतीच्या स्थापनेमध्ये माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण (बाबा), त्याचबरोबर स्व. विलासरावजी देशमुख यांचे मोठे पाठबळ लाभले. नगरपंचायतीच्या स्थापनेनंतर दादांनी सर्वसामान्य कुटुंबातील व्यक्तींना प्रतिनिधित्व करण्याची संधी दिली. तसेच ग्रामपंचायतीकडे कार्यरत सर्व गरीब, सामान्य कुटुंबातील कर्मचाऱ्यांचा समावेश नगरपंचायतीच्या आकृतिबंधामध्ये आग्रहाने विशेषबाब म्हणून करून घेतला.












