रामकृष्ण वेताळ; पत्रकार बांधवांच्या प्रत्येक हाकेला धावून येणार
कराड/प्रतिनिधी : –
समाजातील प्रत्येक घटकांशी पत्रकारांची नाळ जोडलेली असते. समाजातील सर्वसामान्य नागरिकांच्या अनेक समस्या, अडीअडचणी सोडविण्यासाठी आपल्यासाठी लेखणीच्या माध्यमातून ते शासन, प्रशासन आणि लोकप्रतिनिधींना वेळोवेळी धारेवर धरत असतात. त्यामुळे पत्रकार हा समाजाचा आरसा असून समाजाच्या कल्याणासाठी त्यांची लेखणी अखंडपणे तळपत राहो, असे मत भारतीय जनता पक्षाच्या किसान मोर्चाचे प्रदेश सरचिटणीस रामकृष्ण वेताळ यांनी व्यक्त केले.
पत्रकार सन्मान सोहळा : सैदापूर (ता. कराड) येथील त्यांच्या कार्यालयात मराठी पत्रकार दिनानिमित्त आयोजित पत्रकार सन्मान सोहळ्यात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी ज्येष्ठ पत्रकार प्रमोद तोडकर होते. यावेळी कराडसह तालुक्यातील पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित होते.
पत्रकारिता क्षेत्रात मोठी स्पर्धा : पत्रकार हा लोकशाहीचा चौथा स्तंभ आहे. परंतु, सध्या पत्रकारिता क्षेत्रातही मोठी स्पर्धा निर्माण झाली असल्याचे सांगत श्री वेताळ म्हणाले, त्यांच्या धकाधकीच्या आयुष्यात ताणतणाव निर्माण झाला असून त्यांनी आपल्या आरोग्याची काळजीही घेणे तितकेच गरजेचे आहे.
पत्रकारांची नेहमीच साथ मिळाली : सामाजिक बांधिलकीच्या दृष्टीने एक लोकप्रतिनिधी म्हणून भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून आपण कराड उत्तर विधानसभा मतदारसंघांमध्ये कार्यरत आहोत. यामध्ये पत्रकार बांधवांची आपल्याला नेहमीच साथ मिळत राहिली आहे. त्यामुळे पत्रकारांना कोणत्याही प्रकारची मदत लागल्यास, अडचण निर्माण झाल्यास त्यांच्या हाकेला आपण तात्काळ धावून जाऊ, अशी ग्वाही रामकृष्ण वेताळ यांनी यावेळी दिली.












