कराड प्रतिनिधी : –
सध्या सातारा जिल्ह्यातील सर्व साखर कारखाने सुरू झाले आहेत. मात्र, कोणत्याही कारखान्याने उस दर जाहीर केलेला नाही. त्यामुळे आपण यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखान्याच्या माध्यमातून ऊस दराची कोंडी फोडावी. तसेच चालू हंगामात गळीतास येणाऱ्या उसाला एकरकमी चार हजार रुपये दर जाहीर करावा, अशी मागणी बळीराजा शेतकरी संघटनेने आमदार डॉ. अतुलबाबा भोसले यांच्याकडे केली आहे.
निवेदन : सदर मागणीचे निवेदन बळीराजा शेतकरी संघटनेच्या वतीने आमदार डॉ. अतुलबाबा भोसले यांना देण्यात आले. यावेळी बळीराजा शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष पंजाबराव पाटील, जिल्हाध्यक्ष चंद्रकांत यादव, पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष विश्वास जाधव, युवा अध्यक्ष गणेश शेवाळे, तालुकाध्यक्ष आनंदराव थोरात, पोपटराव जाधव, सुनील कोळी, उत्तम खबाले, बाबासो मोहिते, सागर कांबळे, शंभू पाटील उपस्थित होते.
केंद्र सरकारला विनंती करा : साखर निर्यातबंदी उठवावी, साखरेचा भाव प्रतिकिलो चाळीस रुपये करावा, इथेनॉलसाठी उसाचा रस वापरण्यास परवानगी द्यावी व उसाचा एफआरपी बेस 8.30 टक्के पूर्वीप्रमाणे करण्यात यावा, यासाठी आपण केंद्र सरकारला विनंती करावी, अशीही मागणी या निवेदनाद्वारे आमदार डॉ. अतुलबाबा भोसले यांच्याकडे करण्यात आली आहे.
शेतकऱ्यांना आवाहन : गेल्या दहा वर्षात ऊस दरासाठी कोणत्याही प्रकारचे तीव्र आंदोलन झाले नसल्याने ऊसाला वाढीव दर मिळालेल्या नाही. त्यामुळे ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी घरात न बसता आपल्या कामाचे दाम मिळवण्यासाठी रस्त्यावर उतरून लढा द्यावा. तसेच सध्या साखर कारखानदार आणि शेतकरी दोघेही अडचणीत सापडलेले असून याला केंद्र सरकारचे धोरण जबाबदार आहे. तसेच लोकांना केंद्र सरकारचे सहा हजार, लाडक्या बहिणींचे दीड हजार, अर्ध्या तिकिटात एसटी, मोफत रेशन मिळत असल्याने यातच जनता गडबडून गेली आहे. शेतकरी हक्काचे, कष्टाचे, घामाचे दाम मागायचे विसरला आहे. शेतकऱ्याच्या ऊस, सोयाबीन, कापूस, कांदा, दुधाला मातीमोल भाव मिळत आहे. त्यामुळे यासाठी शेतकऱ्यांनी रस्त्यावर उतरावे. लढणाऱ्या शेतकऱ्यांच्या पाठीशी बळीराजा शेतकरी संघटना कायम राहील, असे आवाहन या निवेदनाद्वारे बळीराजा शेतकरी संघटनेतर्फे ऊस उत्पादक शेतकऱ्यांना करण्यात आले आहे.