कराड/प्रतिनिधी : –
संपूर्ण महाराष्ट्रातील चित्रपटगृहात धुमाकूळ घालणाऱ्या “धर्मरक्षक महावीर छत्रपती संभाजी महाराज” या चित्रपटाचे शो एका दक्षिणात्य चित्रपटासाठी बंद करण्यात आले आहेत. हा मराठी अस्मितेसह मराठी चित्रपट सृष्टीवर घाला असून मराठी चित्रपटाला शो न दिल्यास दक्षिणात्य चित्रपटाचे शो बंद पाडू, असा इशारा आस्था सामाजिक संस्थेच्या अध्यक्षा सौ. स्वाती पिसाळ यांनी दिला आहे.
पत्रकार परिषद : येथील शासकीय विश्रामगृहात याबाबतची माहिती देण्यासाठी आयोजित पत्रकार परिषदेत त्या बोलत होत्या. यावेळी मानव परिवर्तन व विकास बहुउदेशीय सेवाभावी संस्थेच्या अध्यक्षा सौ. राधिका पन्हाळे, मराठा महासंघाचे अनिल घराळ, शिवसेनेचे राजेंद्र माने आदींची उपस्थिती होती.
बलिदान युवा पिढीसमोर यावे : संपूर्ण महाराष्ट्राचे आराध्यदैवत असलेल्या छत्रपती संभाजी महाराज यांचा पराक्रम, त्यांनी स्वराज्यासाठी दिलेले बलिदान युवा पिढीसमोर जाणे अत्यंत गरजेचे असल्याचे सांगत सौ. पिसाळ म्हणाल्या, धर्मरक्षक महावीर छत्रपती संभाजी महाराज हा चित्रपट सर्वत्र प्रदर्शित होणे अत्यावश्यक आहे. परंतु, कराडसह महाराष्ट्रातील चित्रपटगृहांमध्ये धुमाकूळ घालत असतानाही हा चित्रपट बंद करून एक दाक्षिणात्य चित्रपट बहुतांश चित्रपटगृहात दाखविला जात आहे. त्यामुळे नागरिकांसह शिव, शंभू प्रेमींमधून प्रतिक्रिया व्यक्त व्यक्त होत आहेत. त्यामुळे दाक्षिणात्य चित्रपट बंद पाडण्याचा इशारा त्यांनी दिला आहे.
लाजिरवाणी घटना : एका दाक्षिणात्य चित्रपटासाठी छत्रपती संभाजी महाराज चित्रपट चित्रपटगृहात बंद करण्याचा निर्णय डिस्ट्रीब्यूटर लॉबीने घेतला. ही घटना पुरोगामी महाराष्ट्रासाठी अत्यंत लाजिरवाणी आहे. त्यामुळे अखंड महाराष्ट्रातील जनता या प्रकाराचा आम्ही जाहीर निषेध करत आहे. त्यामुळे हा चित्रपट संपूर्ण महाराष्ट्रात महाराष्ट्रात प्रदर्शित करावा, अशी आमची मागणी आहे.
निवेदन : याबाबतचे निवेदन मुख्यमंत्री, पोलिस अधिक्षक, प्रांताधिकारी यांना देण्यात येणार असल्याचे सौ. पिसाळ यांनी यावेळी सांगितले.