कराड/प्रतिनिधी : –
मुला – बाळांच्या संगोपन, पालन – पोषणापासून ते त्यांचे शिक्षण, नोकरी, व्यवसाय, लग्न आणि उर्वरित आयुष्यातील वाटचालीतही बाप नावाच्या माणसाचा सिंहाचा वाटा असतो. या सगळ्या कुटुंबाचा गाडा हाकताना त्याची होणारी कसरत दुर्लक्षित नेहमीच राहते. हल्लीच्या बदलत्या युगात तर “तुम्ही माझ्यासाठी काय केले?” हा प्रश्न मुलांकडून सर्रास उपस्थित केला जातो. त्यामुळेच आज “बाप” समजून घेण्याची वेळ आली आहे. तुम्हालाही ‘बाप’पण समजून घ्यायचांय… तर चला मग शाळेत जाऊया..!
व्याख्यान : बेलवडे बुद्रुक (ता. कराड) येथील कासेगाव शिक्षण संस्थेच्या ब्रह्मदास विद्यालयाच्या मैदानावर सोमवार, दि. 2 डिसेंबर रोजी दुपारी 3.30 वाजता सुप्रसिद्ध व्याख्याते, राष्ट्रभूषण पुरस्कार प्राप्त समाजरत्न प्रा. वसंत हंकारे यांचे ‘बाप समजून घेताना…’ या विषयावर व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे.
वारसा : सातारा जिल्ह्याच्या कराड तालुक्यातील बेलवडे बुद्रुक गावाला मोठा शैक्षणिक व धार्मिक वारसा लाभला आहे. गावातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेसह ब्रह्मदास विद्यालयात शिक्षण घेतलेले अनेक यशस्वी विद्यार्थी आज विविध क्षेत्रात उच्च पदावर कार्यरत आहेत. तसेच शेती आणि उद्योग, व्यवसायातही अनेकजण यशस्वी वाटचाल करत आहेत. विद्यालयाचा हाच शैक्षणिक वर्षा भावी पिढीही जोमाने पुढे नेईल शंका नाही. त्याचबरोबर गावाला मोठा धार्मिक आणि सामाजिक वारसाही लाभला असून अनेक धार्मिक कार्यक्रमांसह व्याख्यानमाला, कला, क्रीडा, संस्कृतिक क्षेत्रातही उल्लेखनीय काम आहे. अशा सर्व कार्यक्रमांचे वर्षभर आयोजन केले जाते.
उद्देश : भावी पिढीला आपल्या परिस्थितीसह कर्तव्य, जबाबदारी, नीतीमूल्ये आदींची जाणीव होण्यासाठी, तसेच व्याख्यानाच्या माध्यमातून प्रबोधन होण्यासाठी, त्याचबरोबर कुटुंबातील प्रत्येक घटकाला आपापल्या जबाबदारीची जाणीव होण्याचा उद्देश डोळ्यासमोर ठेवून या व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले आहे.
संयोजक : ब्रह्मदास विद्यालय शाळा व्यवस्थापन समिती, समस्त ग्रामस्थ व ब्रह्मदास विद्यालय बेलवडे बुद्रुक यांच्या संयुक्त विद्यमाने हे व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे. तरी ब्रह्मदास विद्यालयातील सर्व विद्यार्थी, विद्यार्थिनी, तसेच ग्रामस्थ, पंचक्रोशीतील नागरिकांनीही या व्याख्यानाचा लाभ घ्यावा, असे आवाहन संयोजकांकडून करण्यात आले आहे.