मतदान जनजागृती; तब्बल 30 हजार स्क्वेअर फुटावर 2 हजार विद्यार्थ्यांनी बनवली मानवी साखळीतून निर्मिती
सातारा/प्रतिनिधी : –
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कराड येथील छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियम वर तब्बल 30 हजार स्क्वेअर फुटावर विविध विद्यालयांच्या 2 हजार विद्यार्थ्यांच्या मानवी साखळीतून महाराष्ट्राचा नकाशा साकारून मतदान जागृती करण्यात आली.
मतदान जनजागृती : मतदानाचा टक्का वाढावा व सर्वांनी मतदान करावे, या उद्दिष्टाने कराड उत्तर व दक्षिण स्वीप पथकाच्या माध्यमातून हा भव्य दिव्य उपक्रम राबवण्यात आला. तहसीलदार स्मिता पवार, गटविकास अधिकारी प्रताप पाटील, मलकापूरचे मुख्याधिकारी प्रताप कोळी, शिक्षणाधिकारी शबनम मुजावर, कराडचे गटशिक्षणाधिकारी बिपीन मोरे, नायब तहसीलदार युवराज पाटील यांच्यासह विविध मान्यवरांची यावेळी उपस्थिती होती.
दहा शाळांमधील तब्बल 2 हजार विद्यार्थ्यांचा सहभाग : कराड शहरातील दहा शाळांमधील तब्बल 2 हजार विद्यार्थ्यांच्या माध्यमातून छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियमवर 3 हजार स्क्वेअर फुटावर महाराष्ट्राचा नकाशा साकारून मानवी साखळीच्या माध्यमातून मतदान जनजागृती करण्यात आली. कराड येथील शिवाजी स्टेडियमवर तब्बल 30 हजार स्क्वेअर फुटावर अवघ्या दोन तासात महाराष्ट्राचा नकाशा साकारून कला शिक्षकांनी आपल्या कलेचे बहारदार प्रदर्शन केले.
उपक्रमासाठी योगदान : कार्यक्रमाचे सूत्रसंचालन महेंद्र भोसले, सुनील परीट यांनी केले. उपक्रम यशस्वी करण्यासाठी स्विप पथकाचे नोडल अधिकारी सौरभ करपे, प्रतिभा लोंढे सहाय्यक नोडल अधिकारी सुनील परीट, महेंद्र भोसले, तसेच पथकातील कर्मचारी आनंदराव जानुगडे, ऋषिकेश पोटे, संतोष डांगे, गोविंद पवार, अनिल काटकर यांच्यासह कला शिक्षकांनी परिश्रम घेतले.