उंब्रज मेळाव्यात रयत संघटनेचा मनोजदादांना जाहीर पाठींबा
कराड/प्रतिनिधी : –
एका विचाराने, ध्येयाने वाटचाल केलेले दिवंगत विलासराव पाटील-उंडाळकर आमचे दैवत आहेत. त्यांचा विचार पुसून टाकण्याचा कोणी प्रयत्न करत असेल, तर रयत संघटना शांत बसणार नाही. 25 वर्षांत कराड उत्तरमध्ये आ. बाळासाहेब पाटील यांनी त्यांच्या स्वार्थासाठी उंडाळकर गटाचा सोयीनुसार वापर केला. गटाचे नेतृत्व संपवण्याचाही प्रयत्न केला. जिल्हा बॅंक, बाजार समितीच्या निवडणुकीत रयत संघटनेवर प्रचंड अन्याय केला. त्यामुळे या निवडणुकीत आपण रयत संघटनेची ताकद दाखवा, असा सज्जड इशारा कोयना दुध संघाचे माजी चेअरमन वसंतराव जगदाळे यांनी दिला.
उंब्रज येथे रयत संघटनेचा मेळावा : रयत संघटना व माजी मंत्री दिवंगत विलासकाका उंडाळकर प्रेमींनी मनोजदादा घोरपडे यांना पाठिंबा देण्यासाठी उंब्रज येथे आयोजित मेळाव्यात ते बोलत होते. यावेळी बाबूराव धोकटे, कोयना संघाचे माजी उपाध्यक्ष संपतराव इंगवले, निवासराव निकम, मोहनराव माने, महेश कुमार जाधव, खरेदी-विक्री संघाचे चेअरमन अनिल मोहीते, खरेदी विक्री संघाचे माजी अध्यक्ष जयसिंगराव चव्हाण, रणजीत पाटील सुद्दामराव चव्हाण, आनंदराव थोरात, सुरेशराव पाटील, बाळासो पवार, तसेच जेष्ठ कार्यकर्ते उपस्थित होते.
समोरासमोर लढत असल्याने करेक्ट कार्यक्रम : विद्यमान आमदारांनी 25 वर्षांत विकासकामे करण्यापेक्षा लोकांना त्रास देण्याचेच केल्याची सांगत मनोजदादा घोरपडे म्हणाले, एकतर्फी सत्ता संपवून यांना घरी घालवण्याची भूमिका जनतेने घेतली आहे. यावेळी समोरासमोर लढत असल्याने करेक्ट कार्यक्रम होतोय. आजपर्यंत प्रत्येकाला वेठीस धरून खुनशी राजकारण करणारे व्यक्तीमत्व कराड उत्तरमधून हद्दपार झाले पाहिजे. आगामी काळात रयत संघटनेला बरोबर घेवून राजकीय वाटचाल सुरू राहील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
स्वार्थासाठी पायंडा मोडला : जिल्हा बॅंकेला स्वत:च्या स्वार्थासाठी माजी पालकमंत्र्यांनी पायंडा मोडल्याचे सांगत संपतराव इंगवले म्हणाले, आजवर काका सांगतील तेव्हा त्यांना पाठींबा दिला. मात्र, त्यांनी आमच्या नेत्याला कमी लेखल्याने या निवडणुकीत विद्यमान आमदारांना रयत संघटना जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही.
त्यांनी आजवर मुळे छाटण्याचे काम केले : झाड मोठं झाल की त्याची मुळ छाटायची अशा प्रकारचे राजकारण कराड उत्तरच्या आमदारांनी आत्तापर्यंत केल्याचे सांगत सुरेशराव पाटील म्हणाले, चोरेकर, पार्लेकर, किवळकरांचे घर संपवण्याचा प्रयत्न झाला. मात्र, यावेळी या सगळ्या प्रश्नांना उत्तर देण्याची संधी निर्माण झाली असून जनता त्यांना जागा दाखवेल.
मनोजदादांचा विजय सुकर : पालकमंत्री असताना विद्यमान आमदारांनी त्रास दिल्याच्या सांगत मोहनराव माने म्हणाले, कोणतीही ठोस विकासकाम त्यांना करता आले नाही. एकास एक उमेदवार असल्याने मनोजदादांचा विजय सुकर आहे. यावेळी निवासराव निकम व जेष्ठ कार्यकर्तांनी मनोगत व्यक्त केली.