देवेंद्र फडणवीस; पाल येथे मनोज घोरपडे यांच्या प्रचाराचा शुभारंभ उत्साहात
कराड/प्रतिनिधी : –
तव्यावरची भाकरी योग्य वेळी फिरवली नाही, तर ती करपते. असे ज्येष्ठ नेते शरद पवार म्हणतात. ते आमचे राजकीय विरोधक असले, तरी त्यांच्या चांगल्या गोष्टींचे अनुकरण केले पाहिजे. तब्बल 25 वर्षे कराड उत्तर विधानसभा मतदारसंघ सर्वांगीण विकासापासून वंचित राहिला आहे. त्यामुळे पवार साहेबांच्या युक्तीनुसार आता कराड उत्तरची भाकरी फिरवण्याची वेळ आली असून खंडेराय – म्हाळसाईचा आशीर्वाद मनोजदादांना मिळणार असल्याचा विश्वास राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला.
प्रचार शुभारंभ सभा : पाल (ता. कराड) येथे कराड उत्तर विधानसभा मतदारसंघातील भाजपचे अधिकृत उमेदवार मनोज घोरपडे यांच्या प्रचार शुभारंभ सभा मोठ्या उत्साहात पार पडली. या सभेत मार्गदर्शन करताना ते बोलत होते. यावेळी खा. उदयनराजे भोसले, आ. शिवेंद्रसिंहराजे भोसले, आ. जयकुमार गोरे, जिल्हाध्यक्ष धैर्यशील कदम, रामकृष्ण वेताळ आदींची प्रमुख उपस्थिती होती.
रखडलेल्या विकासाला एकप्रकारे आम्हीही जबाबदार : 2014 आणि 2019 मध्ये कराड उत्तर मतदारसंघातील जनतेच्या मनात निर्माण झालेली परिवर्तनाची नांदी आम्ही ओळखू शकलो नाही, असे सांगत उपमुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, त्यामुळे येथील रखडलेल्या विकासाला एकप्रकारे आम्हीही जबाबदार आहोत. याबद्दल मी दिलगिरी व्यक्त करतो.

धैर्यशील कदम आणि रामकृष्ण वेताळ यांनी त्याग केला :
दोन्हीवेळी मनोजदादा आणि धैर्यशीलदादांच्या मतविभागणीचा फायदा विरोधकांना झाल्याचे सांगत श्री. फडणवीस म्हणाले, आता 2024 मध्ये ही चूक आम्ही सुधारली असून मनोजदादांसाठी धैर्यशील कदम आणि रामकृष्ण वेताळ यांनी त्याग केला असून त्याला जनतेच्या साथीची जोड मिळाल्याने उत्तरेतील परिवर्तन निश्चित आहे, असा ठाम विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.
5 वर्षांत 25 वर्षांच्या बॅकलॉग भरून काढणार : उत्तरेतील शाश्वत विकासाबाबत बोलताना श्री. फडणवीस म्हणाले, टेंभू, ताकारी, उरमोडी, म्हैसाळ योजनांना निधी देऊन दुष्काळ निर्मूलन करत आम्ही सिंचनाची कामे केली. टेंभू, उंडाळे, उरमोडी, वांग – मराठवाडी आदी प्रकल्पांसाठीही मोठा निधी दिला. त्यानुसार उत्तरेत इंदोली, पाल योजनांना 100 मीटर हेड करून येतील शेतीच्या पाण्याचा प्रश्न मिटवणार आहे. उत्तरेत 990 कोटींच्या निधीतून विकासकामे आणली. जनतेने याठिकाणी कमळ फुलवल्यावर अवघ्या 5 वर्षात येथील 25 वर्षांच्या बॅकलॉग भरून काढू, असे ग्वाही श्री. फडणवीस यांनी यावेळी दिली. तसेच राज्यात महायुतीचे सरकार येणार असून त्यामध्ये कराड उत्तरचा भागीदार असायला हवा. यासाठी जनतेने परिवर्तन करावे. कराड उत्तरच्या विकासासाठी आपण लागेल तेवढा निधी देऊ, असेही आश्वासन त्यांनी यावेळी दिले.












