महाराष्ट्राचे पर्यटन जागतिक स्तरावर नेणार 

👇बातमी ऐकण्यासाठी येथे क्लिक करा.

पर्यटनमंत्री शंभूराज देसाई; जिल्ह्यातील माजी सैनिकांचे प्रलंबित प्रश्न मार्गी लावणार 

कराड/प्रतिनिधी : –

महाराष्ट्राला मोठा ऐतिहासिक वारसाला व नैसर्गिक साधन संपत्ती लाभली आहे. त्यामुळे राज्यातील एकूणच पर्यटन स्थळांसह सातारा जिल्ह्यातील पर्यटन जागतिक स्तरावर कसे नेता येईल, या दृष्टीने निश्चितपणे आपण प्रयत्न करणार असल्याचे मत राज्याचे नवनियुक्त पर्यटन, खनिकर्म व माजी सैनिक कल्याण मंत्री शंभूराज देसाई यांनी व्यक्त केले.

जल्लोषी स्वागत : मंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर प्रथम जिल्ह्यात आल्यानंतर कराड येथे कार्यकर्त्यांनी त्यांचे जल्लोषी स्वागत केले. यावेळी कराड नगरपालिकेचे माजी उपनगराध्यक्ष राजेंद्रसिंह यादव व त्यांच्या समर्थकांनी त्यांचे स्वागत केले. याप्रसंगी माध्यमांशी संवाद साधताना ते बोलत होते.

प्रतापगड व कोयना पर्यटनास चालना : सातारा जिल्ह्यातील पर्यटन वाढीच्या दृष्टीने प्रतापगडावर सर्व पुरातत्व विभागाच्या अधिकाऱ्यांना घेऊन जाणार असल्याचे सांगत ना. देसाई म्हणाले, तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रतापगड संवर्धनासाठी एक प्रस्ताव मंजूर केला होता, तोही पुढे नेऊन त्यात अधिक सुधारणा करण्याचे काम करणार आहे. तसेच कोयना पर्यटनाचा पहिला टप्पा पूर्ण झाला असून त्याच्या निविदाही निघाल्या आहेत. दुसऱ्या टप्प्याचा प्रकल्प आराखडा करण्याचे काम सुरू आहे. त्याचीही बैठक मुंबईत लवकरच घेणार असल्याचे त्यांनी सांगितले.

पाटणला पर्यटन वाढीस वाव : पाटण तालुक्याच्या पर्यटन संदर्भात बोलताना ते म्हणाले, पाटण तालुक्याच्या पर्यटन वाढीसाठी मोठा वाव आहे. कोयना पर्यटन, जल पर्यटन, सह्याद्री व्याघ्र प्रकल्पातील वन पर्यटनला प्राधान्य देण्यात येणार आहे. तसेच जिल्ह्यातील कास पठार, बामणोली, महाबळेश्वर, पाचगणी, वासोटा अशा पर्यटनस्थळांना जागतिक दर्जाचे पर्यटनस्थळ करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजितदादा पवार यांनी सकारात्मकता दर्शवले असून त्या कामाला लवकरच गती मिळाल्याचे दिसेल.

माजी सैनिकांचे प्रश्न मार्गी लावणार : सातारा माजी सैनिकांचा जिल्हा आहे. जिल्ह्यातील मिलिटरी अपशिंगे गावातील घरटी एक माणूस सैन्यदलात कार्यरत आहे. उद्या मंगळवारी आपण त्या गावात जाऊन जिल्ह्यातील माजी सैनिकांच्या प्रलंबित कामांचा सर्व अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत आढावा बैठक घेणार असून ते प्रश्न प्राधान्याने मार्गी लावण्यावर भर देण्यात येणार असल्याचेही मंत्री देसाई यांनी सांगितले.

पालकमंत्री पदाबाबत रस्सीखेच नाही : सातारा जिल्ह्याच्या पालकमंत्री पदासाठी रस्सीखेच सुरू आहे? या प्रश्नावर बोलताना मंत्री देसाई म्हणाले, सातारा जिल्ह्याच्या पालकमंत्री पदाबाबत  कोणत्याही प्रकारची रस्सीखेच नाही. पालकमंत्री कोणाला करायचे? याचे सर्वाधिकार महायुतीच्या तिन्ही नेत्यांना  आहेत. ते ज्याच्याकडे जबाबदारी देतील, ती सर्वजण पूर्णपणे पार पाडतील. 

महायुतीवर लोकांचे प्रेम : शपथविधीनंतर प्रथमच जिल्ह्यात आल्यावर सर्वत्र जल्लोष स्वागत होत आहे. हे महायुतीवरचे लोकांचे प्रेम आहे. शिवसेना पक्षप्रमुख एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस व अजितदादा पवार यांच्या नेतृत्वाखाली विधानसभेत प्रचंड बहुमत मिळाले. खातेवाटपानंतर महायुतीच्या तिन्ही नेत्यांनी लगोलग कामांना सुरुवात करण्याचे आदेश दिले आहेत. तसेच निवडणुकीमध्ये महायुतीने दिलेले वचन आणि आश्वासने पूर्ण करण्यास आम्ही सर्वजण प्राधान्य देऊ, असेही मंत्री देसाई यांनी यावेळी सांगितले.

Jan Swarashtra
Author: Jan Swarashtra

Leave a Comment

आणखी वाचा

  • Buzz4 Ai
  • Buzz Open / Ai Website / Ai Tool
error: Content is protected !!