संसदेबाहेर करण्यात आलेल्या ‘चहा पार्टी’ कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर कराड शहर भाजपच्यावतीने काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या भूमिकेचा तीव्र निषेध नोंदवण्यात आला. शहरातील शिवतीर्थ दत्त चौकात भाजप पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी एकत्र येत आंदोलन करून काँग्रेसच्या भूमिकेविरोधात घोषणाबाजी केली.
संसदेच्या पावित्र्याला बाधा : महाराष्ट्र प्रदेश भाजपच्या आदेशानुसार आणि जिल्हाध्यक्ष आमदार डॉ. अतुल भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली हे आंदोलन करण्यात आले. लोकसभा अध्यक्षांनी मनाई आदेश दिला असतानाही राहुल गांधी यांनी काही खासदारांसह संसदेबाहेर ‘चहा पार्टी’चे आयोजन केले. संसदेच्या पावित्र्याला बाधा आणणारे वर्तन लोकशाहीसाठी घातक असल्याचे मत यावेळी आंदोलकांकडून व्यक्त करण्यात आले.
अफवा पसरवून संभ्रम : यावेळी भाजप पदाधिकाऱ्यांनी काँग्रेस पक्षावर देशभरात इंधन टंचाई आणि गॅस सिलिंडर उपलब्ध होणार नाहीत, अशा अफवा पसरवून जनतेमध्ये संभ्रम निर्माण केल्याचा आरोपही करण्यात आला. इराण-इस्राएल युद्धाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात असल्याचे सांगत, या सर्व प्रकाराचा निषेध करण्यात आला.
लोकशाही परंपरेला धक्का : यावेळी बोलताना भाजप शहराध्यक्ष सौ. सुषमा लोखंडे यांनी, विरोधी पक्षाच्या अशा भूमिकेमुळे देशाच्या लोकशाही परंपरेला धक्का बसत असल्याची टीका केली. अशा प्रकारच्या राजकारणाला कराडमधील भाजप कार्यकर्ते तीव्र विरोध करतील, असेही त्यांनी स्पष्ट केले.
मान्यवरांची उपस्थिती : या आंदोलनात नगरसेवक व भाजप जिल्हा उपाध्यक्ष सुहास जगताप व प्रमोद शिंदे, सरचिटणीस प्रशांत कुलकर्णी, विश्वनाथ फुटाणे, नूतन वाघ, वंदना काटकर, व्यापारी आघाडी अध्यक्ष केतन शहा, केमिस्ट आघाडी अध्यक्ष संजय शहा, अल्पसंख्याक आघाडी अध्यक्ष प्रित्येश मेहता, दिव्यांग आघाडी अध्यक्ष अभिजित घाटगे, ॲड. विशाल कुलकर्णी, सागर गवळी, सचिन वास्के, अनिल धोत्रे, राहुल आवटी, तसेच आमदार अतुल भोसले जनसंपर्क कार्यालयाचे प्रमुख दिलीपराव जाधव, सुरज देसाई, सागर माने, अनिल लोखंडे यांच्यासह भाजपचे अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.