जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तात्पुरता बंद ठेवण्यात आलेला येथील जनावरे बाजार गुरुवारी (दि. ५) नियमितपणे भरणार असल्याचा निर्णय कराड शेती उत्पन्न बाजार समितीने घेतला आहे.
निर्णय : निवडणूक मतदान प्रक्रिया पूर्वी जाहीर करण्यात आलेल्या ५ फेब्रुवारी ऐवजी आता ७ फेब्रुवारी रोजी होणार असल्याने हा निर्णय घेण्यात आला असल्याची माहिती बाजार समितीचे सभापती सतीश इंगवले व उपसभापती नितीन ढापरे यांनी दिली.
संभ्रम दूर : कराड व परिसरातील शेतकरी, पशुपालक व व्यापाऱ्यांसाठी जनावरे बाजार हा आर्थिक व्यवहारांचा महत्त्वाचा आधार असून, शेतीपूरक व्यवसाय म्हणून जनावरांच्या खरेदी-विक्रीवर अनेक कुटुंबांची उपजीविका अवलंबून आहे. निवडणूक आचारसंहिता व मतदान प्रक्रियेच्या कारणामुळे बाजार बंद राहिल्याने शेतकरी व व्यापाऱ्यांमध्ये संभ्रमाची स्थिती निर्माण झाली होती. मात्र मतदानाची तारीख पुढे ढकलण्यात आल्याने हा संभ्रम दूर झाला असून शेतकरी हिताच्या दृष्टीने बाजार सुरू ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
प्रशासनाशी समन्वय : निवडणूक प्रक्रियेमुळे कोणतीही गैरसोय होऊ नये, तसेच शेतकरी व व्यापाऱ्यांचे आर्थिक नुकसान टाळण्यासाठी प्रशासनाशी समन्वय साधून जनावरे बाजार सुरू ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याचे उपसभापती नितीन ढापरे यांनी सांगितले.
सहकार्य करावे : सभापती सतीश इंगवले यांनी, बाजाराच्या दिवशी कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी आवश्यक ती सर्व खबरदारी घेण्यात येणार असल्याचे स्पष्ट करत व्यापारी, शेतकरी व नागरिकांनी प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन सभापती सतीश इंगवले यांनी केले आहे.
संधीचा लाभ घ्या : प्रशासनाने घालून दिलेल्या सर्व नियमांचे पालन करून गुरुवारी (दि. ५) कराडचा जनावरे बाजार नेहमीप्रमाणे भरणार असून, शेतकरी व व्यापाऱ्यांनी या संधीचा लाभ घ्यावा, असेही बाजार समितीच्या वतीने सांगण्यात आले आहे.