केंद्रीय अर्थसंकल्पातून विकसित भारताच्या दिशेने ठोस पाऊल

👇बातमी ऐकण्यासाठी येथे क्लिक करा.

आमदार डॉ. अतुल भोसले; अर्थसंकल्पाने ‘विकसित भारत’ संकल्पनेला भक्कम आधार

कराड/प्रतिनिधी : –

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली सादर केलेला केंद्रीय अर्थसंकल्प २०२६ हा देशाच्या सर्वांगीण विकासाचा आराखडा ठरणारा असल्याचे मत आमदार डॉ. अतुल भोसले यांनी व्यक्त केले.

प्रतिक्रिया : आरोग्य, शिक्षण, पायाभूत सुविधा, शेती आणि ग्रामीण अर्थव्यवस्था या महत्त्वाच्या क्षेत्रांना प्राधान्य देण्यात आल्याने ‘विकसित भारत’ या संकल्पनेला भक्कम आधार मिळणार असल्याची प्रतिक्रिया आमदार डॉ. अतुल भोसले यांनी दिली.

महत्वाचा निर्णय : या अर्थसंकल्पात शिक्षण आणि आरोग्य क्षेत्रासाठी करण्यात आलेल्या तरतुदी भविष्यातील पिढीसाठी दिशादर्शक ठरणाऱ्या आहेत. विशेषतः प्रत्येक जिल्ह्यात मुलींसाठी वसतिगृहे उभारण्याचा निर्णय हा स्त्री शिक्षणाला चालना देणारा असून, सामाजिक परिवर्तनाच्या दृष्टीने महत्त्वाचा असल्याचे डॉ. भोसले यांनी नमूद केले.

व्यापार, उद्योग व रोजगारनिर्मितीला चालना : देशातील रस्ते व महामार्ग विकासासाठी १५ हजार कोटी रुपयांची तरतूद करून दळणवळण व्यवस्था अधिक गतिमान करण्याचा दूरगामी विचार या अर्थसंकल्पातून दिसून येतो. यामुळे व्यापार, उद्योग आणि रोजगारनिर्मितीला चालना मिळणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

संकल्प स्वयंपूर्णतेसाठी निर्णायक : शेती आणि ग्रामीण भागासाठी जाहीर केलेल्या विविध योजनांमुळे शेतकरी वर्गाला दिलासा मिळणार असून ग्रामीण अर्थव्यवस्था बळकट होण्यास मदत होईल. ‘लखपती दीदी’ योजनेच्या माध्यमातून महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्याचा सरकारचा संकल्प ग्रामीण भागातील स्वयंपूर्णतेसाठी निर्णायक ठरणार असल्याचे भोसले यांनी सांगितले.

प्रगतीला नवी दिशा : एकूणच हा अर्थसंकल्प सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, महिला, विद्यार्थी आणि युवकांच्या अपेक्षांना न्याय देणारा असून देशाच्या प्रगतीला नवी दिशा देणारा आहे, असे मत आमदार डॉ. अतुल भोसले यांनी व्यक्त केले.

Jan Swarashtra
Author: Jan Swarashtra

error: Content is protected !!