पहिल्या महिला उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार प्रीतिसंगमावर नतमस्तक

👇बातमी ऐकण्यासाठी येथे क्लिक करा.

यशवंतराव चव्हाणांच्या विचारांना वंदन; अजितदादांच्या वैचारिक वारशाला नवी दिशा

कराड/प्रतिनिधी : –

महाराष्ट्राच्या राजकारणात इतिहास घडवणाऱ्या क्षणाला साक्षी ठरवत, राज्याच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतल्यानंतर सुनेत्रा अजित पवार यांनी सोमवारी येथील प्रीतिसंगमावर जाऊन आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार स्व. यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीस्थळी नतमस्तक होत भावपूर्ण अभिवादन केले.

वैचारिक वारशाची साक्ष : स्व. अजितदादा पवार यांच्या दुर्दैवी विमान अपघातानंतर अवघ्या काही दिवसांत राज्याच्या उपमुख्यमंत्रीपदाची जबाबदारी स्वीकारलेल्या सुनेत्रा पवार यांचा हा दौरा केवळ औपचारिक नव्हता, तर तो एका वैचारिक वारशाला दिलेली साक्ष होता. पुष्पचक्र अर्पण करताना त्यांच्या चेहऱ्यावर उमटलेली शांतता आणि डोळ्यांत दाटलेली भावना, उपस्थितांच्या मनाला स्पर्शून गेली.

कराडशी अजितदादांचे नाते सर्वश्रुत : यशवंतराव चव्हाण आणि अजितदादा पवार यांचे कराडशी असलेले भावनिक नाते सर्वश्रुत आहे. आयुष्यातील महत्त्वाच्या प्रत्येक टप्प्यावर अजितदादांनी प्रीतिसंगमावर येऊन यशवंतराव चव्हाण यांच्या स्मृतींना अभिवादन केले. ‘माझे राजकारण आणि समाजकारण हे यशवंतराव चव्हाणांच्या विचारांवर आधारलेले आहे,’ असे ते वारंवार सांगत. आज त्याच परंपरेचा वारसा त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार पुढे नेत असल्याचे चित्र या भेटीतून स्पष्ट झाले.

शांत उपस्थितीच अनेक प्रश्नांची उत्तरे : उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी, या वेळी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला नाही. मात्र त्यांची शांत उपस्थितीच अनेक प्रश्नांची उत्तरे देणारी ठरली. प्रीतिसंगमावरील अभिवादनानंतर त्या फलटण तालुक्यातील तरडगाव येथे रवाना झाल्या.

सांत्वनपर भेट : अजित पवार यांच्या विमान अपघातात शहीद झालेले अंगरक्षक विदीप जाधव यांच्या कुटुंबीयांची त्यांनी सांत्वनपर भेट घेतली. ‘सत्ता नव्हे, माणुसकी हीच खरी जबाबदारी’ हे त्यांच्या कृतीतून पुन्हा एकदा अधोरेखित झाले.

विचार, मूल्ये पुढे नेण्याचा प्रयत्न : अजितदादांच्या जाण्याने निर्माण झालेली पोकळी भरून काढणे अशक्य असले, तरी त्यांचे विचार, मूल्ये आणि जनतेशी असलेली नाळ पुढे नेण्याचा प्रयत्न सुनेत्रा पवार करत असल्याचे या दौऱ्यातून स्पष्ट झाले. हा दौरा श्रद्धांजलीपर असला, तरी त्यामागे भविष्यासाठीचा ठाम निर्धार दडल्याचे स्पष्टपणे दिसून आले.

मान्यवरांची उपस्थिती : यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील, राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर, खासदार नितीनकाका पाटील, माजी खासदार श्रीनिवास पाटील, माजी सहकार मंत्री बाळासाहेब पाटील, कराडचे नगराध्यक्ष राजेंद्रसिंह यादव, जिल्हाधिकारी संतोष पाटील, पोलीस अधीक्षक तुषार दोशी, प्रांताधिकारी अतुल म्हेत्रे, तहसीलदार कल्पना ढवळे, मुख्याधिकारी प्रशांत व्हटकर यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.

वेणूताई चव्हाण यांच्या स्मृतीस भावपूर्ण अभिवादन

राज्याच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी स्व. यशवंतराव चव्हाण यांच्या पत्नी, समाजकार्याच्या प्रेरणास्थान सौ. वेणूताई चव्हाण यांच्या जन्मशताब्दी निमित्त कराडमधील छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियमजवळील वेणूताई चव्हाण स्मारकास भेट दिली. यावेळी त्यांनी वेणूताई चव्हाण यांच्या स्मृतींना अभिवादन करत स्मारकातील यशवंतराव चव्हाण व वेणूताई चव्हाण यांच्या जतन केलेल्या दुर्मिळ स्मृतिसंग्रहाची पाहणी केली. माजी राज्यपाल श्रीनिवास पाटील यांनी यशवंतराव चव्हाण आणि वेणूताई चव्हाण यांच्या सामाजिक, राजकीय आणि वैचारिक योगदानावर प्रकाश टाकत आठवणींना उजाळा दिला. हा क्षण केवळ स्मरणाचा नव्हे, तर एका प्रेरणादायी वारशाशी नव्याने नाते जोडणारा ठरला. 

Jan Swarashtra
Author: Jan Swarashtra

आणखी वाचा

Buzz4 Ai
error: Content is protected !!