गद्दारांना जागा दाखवा; ही स्वाभिमानाची निवडणूक

👇बातमी ऐकण्यासाठी येथे क्लिक करा.

पृथ्वीराज चव्हाण; जखिणवाडीत काँग्रेस, समविचारी उमेदवारांच्या प्रचारार्थ जाहीर सभा

कराड/प्रतिनिधी : –

सत्तेत असताना वारुंजी जिल्हा परिषद गटासह जखिणवाडी परिसरासाठी कोट्यवधींचा निधी देऊन अनेक विकासकामे मार्गी लावली. मात्र सत्ता गेल्यानंतर स्वतःच्या राजकीय स्वार्थासाठी काहींनी भाजपची वाट धरली. वारंवार दिलेल्या संधीचे मोल न ठेवणाऱ्या अशा गद्दारांना या निवडणुकीत त्यांची जागा दाखवा, असे ठाम आवाहन राज्याचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केले.

जाहीर प्रचार सभा : जखिणवाडी (ता. कराड) येथे वारुंजी जिल्हा परिषद गट, तसेच वारुंजी व कोयना वसाहत पंचायत समिती गणातील काँग्रेस व समविचारी उमेदवारांच्या प्रचारार्थ आयोजित जाहीर सभेत ते बोलत होते.

मान्यवरांची उपस्थिती : यावेळी महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष शिवराज मोरे, महाराष्ट्र काँग्रेस ओबीसी सेलचे अध्यक्ष भानुदास माळी, कराड दक्षिण काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नामदेवराव पाटील, प्रा. शरद काटकर, नगरसेवक फारूक पटवेकर, वारुंजी जिल्हा परिषद गटाच्या उमेदवार सौ. सुनंदा नामदेव पाटील, पंचायत समितीचे उमेदवार रवींद्र बडेकर, तसेच कोयना वसाहत पंचायत समिती गणातील उमेदवार श्रीकांत पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.

न्यायालयाच्या तंबीनंतरच निवडणुका : स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांनी सत्तेचे विकेंद्रीकरण करत पंचायतराज व्यवस्थेची मुहूर्तमेढ रोवल्याचे सांगताना पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, लोकसभा व विधानसभा कायदे निर्मिती करतात, तर ग्रामपंचायत, पंचायत समिती आणि जिल्हा परिषद या स्थानिक स्वराज्य संस्था थेट विकासकामे राबवतात. राजीव गांधींनी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पाच वर्षांच्या कालावधीत होणे बंधनकारक केले. मात्र भाजप सरकारने तब्बल आठ वर्षे निवडणुका न घेता सर्व अधिकार प्रशासक म्हणून नोकरशाहीच्या हाती दिले. मात्र सर्वोच्च न्यायालयाच्या तंबीनंतरच सरकारला निवडणुका घ्याव्या लागल्या, असा आरोप त्यांनी केला.

स्थानिक निवडणुकांना महत्व : जिल्हा परिषद व पंचायत समितीची निवडणूक ही ग्रामीण विकासाची खरी निवडणूक असून, याच प्रक्रियेतून नवे नेतृत्व घडते. सरपंच ते मुख्यमंत्री असा प्रवास स्वर्गीय विलासराव देशमुख यांनी केला, याची आठवण करून देत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे महत्व श्री. चव्हाण यांनी स्पष्ट केले. तसेच काँग्रेसच्या वारुंजी जिल्हा परिषद गटासह दोन्ही पंचायत समिती गणातील उमेदवारांना मोठ्या मताधिक्याने विजयी करण्याचे आवाहनही त्यांनी केले.

महिलांना ५० टक्के आरक्षण : पृथ्वीराज चव्हाण यांनी मुख्यमंत्री असताना महिलांना ५० टक्के आरक्षण दिल्याचे सांगत भानुदास माळी यांनी, आज सर्वच निवडणुकांमध्ये महिलांना मोठ्या प्रमाणात संधी मिळत असल्याचे नमूद केले. तसेच सामान्य कुटुंबातून पुढे आलेले नामदेव पाटील यांचे नेतृत्व लोकसेवेसाठी समर्पित असून, त्यांच्या उमेदवारांना भरघोस मतांनी विजयी करण्याची जबाबदारी मतदारांची असल्याचे त्यांनी सांगितले.

विकासासाठी कटिबद्ध : पृथ्वीराज चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली महिलांना राजकारणात सन्मानाचे स्थान मिळाल्याचे सांगत शिवराज मोरे यांनी, वारुंजी जिल्हा परिषद गटात नामदेव पाटील यांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात विकासकामे झाली असून, सर्व उमेदवार सर्वसामान्यांचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी कटिबद्ध असल्याचे त्यांनी सांगितले.

पक्षांतराला विरोध केला : विधानसभेच्या निकालानंतर वारुंजी जिल्हा परिषद गटासह काही कार्यकर्त्यांनी भाजपची वाट धरली, मात्र या निर्णयाला आपण शेवटपर्यंत विरोध करत अनेकांना मी थांबवण्याचा प्रामाणिक प्रयत्न केल्याचे माजी पंचायत समिती सदस्य नामदेवराव पाटील यांनी सांगितले.

… अशी मानसिकता आहे : नरेंद्र पाटील यांनाही याबाबत स्पष्ट सल्ला दिला होता. वेळप्रसंगी उदयसिंह पाटील-उंडाळकर यांच्याशी चर्चा करावी, असेही सांगितले होते. मात्र आपण भाजपमध्ये जाणारच, अशी त्यांची भूमिका ठाम होती. भाजपमध्ये गेल्यावर लोकांची सेवा न करता सहज विजय मिळवता येतो, अशी एक मानसिकता समाजात तयार झाली आहे, ही लोकशाहीसाठी घातक बाब असल्याचे नामदेवराव पाटील यांनी सांगितले.

आवाहन : श्रीकांत पाटील यांची नाळ थेट जनतेशी जोडलेली आहे, ते कायम लोकांमध्ये राहून काम करणारे नेतृत्व आहे. त्यामुळे त्यांच्या सोबत असलेले सर्वच उमेदवार बहुमताने निवडून येतील, असा ठाम विश्वास व्यक्त करत या निवडणुकीत जनतेने व्यक्ती, पक्ष किंवा सत्ता न पाहता प्रत्यक्ष काम करणाऱ्या नेतृत्वाला साथ द्यावी, असे आवाहनही त्यांनी केले.

मनोगत : प्रा. शरद काटकर, नगरसेवक फारूक पटवेकर, तसेच सर्व उमेदवारांनीही मनोगत व्यक्त केले. सभेस वारुंजी जिल्हा परिषद गट व कोयना वसाहत पंचायत समिती गणातील मतदारांसह महिला भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

Jan Swarashtra
Author: Jan Swarashtra

आणखी वाचा

Buzz4 Ai
error: Content is protected !!