रामकृष्ण वेताळ; रिसवडमध्ये कोपर्डे गट व गण आणि वाघेरी गणातील उमेद्वारांच्या प्रचारार्थ जाहीर सभा
कराड/प्रतिनिधी : –
कोपर्डे हवेली जिल्हा परिषद गटातील सर्वांगीण विकासासाठी आवश्यक असलेला शासनाचा निधी मिळवण्याची संपूर्ण जबाबदारी मी स्वीकारतो. निधी कसा आणि कुठून मिळवायचा याची मला पुरेशी माहिती व अनुभव आहे. त्यामुळे विकासकामांबाबत कोणतीही चिंता न करता सर्वांनी विजयी निर्धाराने कामाला लागावे, असे आवाहन कराड उत्तरचे नेते रामकृष्ण वेताळ यांनी केले.
जाहीर सभा : रिसवड (ता. कराड) येथे आयोजित प्रचार सभेत ते बोलत होते. या सभेत कोपर्डे हवेली गटाच्या अपक्ष उमेदवार सौ. विद्या वेताळ, पंचायत समिती कोपर्डे गणाचे उमेदवार अमित पाटील, तसेच वाघेरी गणाच्या अपक्ष उमेदवार सौ. नीलम पिसाळ यांची प्रमुख उपस्थिती होती.
मान्यवरांची उपस्थिती : कार्यक्रमास सोसायटीचे चेअरमन श्रीरंग चव्हाण, माजी पंचायत समिती सदस्य सुरेश कुंभार, देवानंद चव्हाण, शिवाजी पाटील, प्रल्हाद भोसले यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
…ती क्षमता माझ्यात आहे : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा मला थेट पाठिंबा असल्याचे सांगताना रामकृष्ण वेताळ म्हणाले, कोपर्डे हवेलीसह कराड उत्तरच्या इतर भागांमध्ये विकासासाठी निधीचा सातत्यपूर्ण प्रवाह आणण्याची क्षमता माझ्यात आहे. स्वाभिमान जपण्यासाठी आणि धनदांडगे, तसेच गुन्हेगारी प्रवृत्तींपासून मतदारसंघ सुरक्षित ठेवण्यासाठी सर्वांनी एकजुटीने काम करणे आवश्यक आहे.
नेतृत्व अधिक बळकट करा : सभेच्या अध्यक्षीय भाषणात सदाशिव इंगवले यांनी, कराड उत्तरचे राजकारण गुन्हेगारीकरण व बाजारीकरणापासून मुक्त ठेवण्यासाठी रामकृष्ण वेताळ यांचे नेतृत्व अधिक बळकट करण्याचे आवाहन केले.
योजना तळागाळापर्यंत पोहोचवण्यासाठी कटिबद्ध : उमेदवार सौ. विद्या वेताळ, अमित पाटील आणि सौ. नीलम पिसाळ यांनी जिल्हा परिषद व पंचायत समितीमार्फत राबविण्यात येणाऱ्या विकास योजना व विविध शासकीय मदतीच्या योजना तळागाळातील सर्वसामान्य नागरिकांपर्यंत पोहोचवण्यासाठी आपण कटिबद्ध असल्याचे सांगितले.
जाहीर पाठिंबा : वडोली निळेश्वर गावचे माजी उपसरपंच दयानंद पवार व त्यांच्या संपूर्ण गटाने रामकृष्ण वेताळ यांना जाहीर पाठिंबा दिला. या पाठिंब्यामुळे अपक्ष उमेदवारांच्या मताधिक्यात वाढ होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.
उपस्थिती : या सभेला भानुदास पोळ, जालिंदर माने, अशोक थोरात, ललासो जगदाळे, अंकुश थोरात, संदीप बाबर, तानाजी इंगवले, दादासो इंगवले, नाना शिंदे यांच्यासह कोपर्डे हवेली गटातील कार्यकर्ते व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक अमृत इंगवले यांनी केले, सूत्रसंचालन रामभाऊ सातपुते यांनी तर आभार दीपक इंगवले यांनी मानले.
गुन्हेगारी प्रवृत्तींचा बंदोबस्त करण्याचा निर्धार
सभेला उपस्थित असलेली मोठी गर्दी ही या मतदारसंघात गुन्हेगारीकरणाला थारा न देण्याचा स्पष्ट संदेश देणारी आहे. गुन्हेगारी प्रवृत्ती यशवंत विचाराला बाधक असून त्या ठेचून काढण्यासाठी सर्वांनी एकत्र यावे, असे आवाहन रामकृष्ण वेताळ यांनी यावेळी केले. अपक्ष उमेदवारांचा विजय निश्चित असल्याचा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.