आमदार अतुल भोसले; स्व. यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीस्थळी वाहिली आदरांजली
कराड/प्रतिनिधी : –
आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार स्व. यशवंतराव चव्हाण साहेबांच्या कार्यातून आम्हा सर्वांना प्रेरणा मिळते. राज्य सरकार त्यांच्या पुरोगामी विचारांवर आधारित विकासकामांना गती देत आहे. चव्हाण साहेबांच्या समाधीस्थळाचे रिडेव्हलपमेंट व कराड शहरात ॲनिमेटेड ‘नेकलेस रोड’ उभारण्याचा प्रस्ताव सरकारच्या विचाराधीन आहे. या प्रकल्पाचे अंदाजपत्रक तयार करण्याचे काम सुरू असून, राज्यस्तरावर लवकरच निर्णय होईल. मुख्यमंत्री या प्रकल्पाबाबत सकारात्मक असल्याची माहिती आमदार अतुल भोसले यांनी दिली.
आदरांजली : आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार स्व. यशवंतराव चव्हाण साहेबांच्या पुण्यतिथीनिमित्त आ.डॉ. अतुल भोसले यांच्यासह मान्यवरांनी समाधीस्थळी भेट देऊन पुष्पचक्र अर्पण करत आदरांजली वाहिली.
स्मृतिस्थळ रिडेव्हलपमेंटचे स्वप्न : माध्यमांशी संवाद साधताना साबरमती रिव्हरफ्रंट प्रकल्प करणाऱ्या कंपनीने कराड शहरातील प्रीतिसंगम बाग आणि कृष्णामाई घाटाची पाहणी केली असून, येथील विकासकामे गतीमान करण्यासाठी प्रक्रिया सुरू आहे. चव्हाण साहेबांच्या स्मृतिस्थळाचे रिडेव्हलपमेंट हे आमच्या स्वप्नातील महत्त्वाचे काम आहे, हा प्रकल्प पूर्णत्वास नेण्यासाठी सर्वांचे सहकार्य आवश्यक आहे.
कराडकर सुखी, समाधानी, समृद्ध व्हावेत : विधानसभेच्या विजयाला एक वर्ष पूर्ण झाल्यानंतर समाधीस्थळी अभिवादन करताना काय भावना आहेत? यावर ते म्हणाले, कराडकरांना उत्तम नागरी सुविधा मिळाल्या पाहिजेत. कराड शहर देशाच्या नकाशावर अधिक ठळकपणे दिसावे, यासाठी मी प्रयत्नशील आहे. कराडकर सुखी,, समाधानी आणि समृद्ध व्हावेत, हेच ध्येय असल्याचे त्यांनी सांगितले.
दुर्लक्षाची नोंद घेऊन सूचना : अभिवादन कार्यक्रमाला मुख्यमंत्री किंवा उपमुख्यमंत्री उपस्थित नसल्याच्या प्रश्नावर ते म्हणाले, चव्हाण साहेब हे सर्वांचेच आदरस्थान आहेत. निवडणुकीच्या कामकाजामुळे वेळापत्रकात बदल झाले असतील. मात्र प्रशासनाच्या दुर्लक्षाची नोंद घेऊन पुढील वर्षी आवश्यक सुधारणा करण्यात येतील, असे त्यांनी सांगितले.
शहरांना नवी ओळख : कराड व मलकापूर निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मतदारांशी संवाद साधताना अनुभवलेल्या परिस्थितीबद्दल बोलताना ते म्हणाले, कराड आणि मलकापूर ही ऐतिहासिक व सांस्कृतिक वारसा लाभलेली शहरे आहेत. या शहरांना नवी ओळख मिळावी आणि उत्तम नागरी सुविधा मिळाव्यात, यासाठी भारतीय जनता पार्टी कटिबद्ध आहे.
विकासाला वेगळीच गती मिळेल : केंद्र आणि राज्यात मित्रपक्षांचे सरकार असल्याने कराडमध्ये भाजपचे नगराध्यक्ष व नगरसेवक निवडून आल्यास कराड शहराच्या विकासाला वेगळीच गती मिळेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.