अपक्षांची मोट बांधू; भविष्यात भगवाही फडकवू  

👇बातमी ऐकण्यासाठी येथे क्लिक करा.

रणजीत पाटील; धनुष्यबाणाचे चिन्ह न मिळाल्याची खंत; १२ अपक्ष एकत्र आणण्याचा प्रयत्न

कराड/प्रतिनिधी : – 

कराड नगरपालिकेच्या निवडणुकीत शिवसेनेचे धनुष्यबाणाचे चिन्ह अखेर आपणास मिळाले नाही, याची तीव्र खंत व्यक्त करत नगराध्यक्षपदाचे अपक्ष उमेदवार रणजीत पाटील (नाना) यांनी अपक्षांची मोट बांधून मतदारांसमोर नवा पर्याय देण्याची घोषणा केली. शिवसेनेने वेळेवर ए.बी. फॉर्म न दिल्याने अपक्ष म्हणून लढण्याचा निर्णय घ्यावा लागला, असे सांगत त्यांनी प्रभागातील समविचारी उमेदवारांना एका व्यासपीठावर आणण्याचा संकल्प पत्रकार परिषदेत व्यक्त केला. तसेच भविष्यात कराड नगरपालिकेवर भगवा फडकवून स्व. आनंद दिघेंची स्वप्नपूर्ती करणार, असा दृढ निश्चयही त्यांनी व्यक्त केला.

पहिल्या फळीतील साथीदार : १२ जण आपल्या संपर्कात असून, पहिल्या टप्प्यात ५ अपक्ष उमेदवारांनी साथ दिली आहे. ज्योती पवार, प्रताप इंगवले, शैला पाटील, विनायक मोहिते, वंदना गायकवाड व पूनम धोत्रे हे उमेदवार पहिल्या फळीतील साथीदार असल्याचे पाटील यांनी जाहीर केले.

‘सेवापर्व’ घराघरात पोहोचवणार : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कराड शहरासाठी कोट्यवधींचा निधी उपलब्ध करून दिला. त्यातून अनेक महत्त्वाची विकासकामे पूर्ण झाली असल्याचे संगत या सर्व माहितीचे ‘सेवापर्व’ नावाचे पुस्तक तयार करून प्रत्येक घरापर्यंत पोहोचवत आहोत. कराड शहरातील शंभूतीर्थ स्मारक, स्मशानभूमी सुधारणा, वाखाण रस्ता मार्गी लावणे, विविध सामाजिक उपक्रमांना सहाय्य अशा कामांचा त्यांनी उल्लेख केला.

धनुष्यबान मिळाला असता तर…! : कराड नगरपालिका निवडणुकीसाठी आपणास पक्ष कडून धनुष्यबान हे चिन्ह मिळाले असते तर, निवडणूक अधिक सक्षमपणे लढता आली असती. मात्र काही राजकीय कारणांमुळे त्यादृष्टीने वाटचाल झाली नाही, याबाबतही त्यांनी नाराजी व्यक्त केली.

भगवा फडकवण्याचा निर्धार कायम : ते म्हणाले, १९९४ मध्ये स्वर्गीय आनंद दिघे यांनी कराड नगरपालिकेवर भगवा फडकवण्याची इच्छा व्यक्त केली होती. यावेळी ते शक्य होते…, पण पुढील काळात कराड पालिकेवर भगवा फडकवण्याचा निर्धार कायम आहे, असे पाटील यांनी सांगितले. तसेच आगामी दोन दिवसांत किमान दहा प्रभागांतून आणखी अपक्ष आपल्यासोबत येतील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

संपर्क केला असता, तर हात दिला असता

शिवसेनेचे जिल्हा समन्वयक राजेंद्रसिंह यादव यांनी आपल्याशी संपर्क साधला का? या प्रश्नावर प्रतिक्रिया देताना पाटील म्हणाले, त्यांनी माझ्याशी कधीच संपर्क केला नाही. फोन केला असता, संवाद साधला असता, तर आपणही त्यांना नक्की साथ दिली असती. पक्षाच्या बळकटीसाठी आणि कराड नगरपालिकेवर भगवा फडकवण्यासाठी ते अत्यंत आवश्यक होते, मात्र तसे झाले नाही, याबाबत त्यांनी नाराजी व्यक्त केली. 

समाजकार्य आणि विकासकामात वरचढ

कराड शहरातील विविध प्रकल्पांसाठी एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून कोट्यवधींचा निधी आणता आला. शहराच्या सुशोभीकरणात व सार्वजनिक सुविधांच्या निर्मितीत लक्षणीय कामगिरी झाल्याचा दावा करत पाटील म्हणाले, पक्षाने कामांचा तुलनात्मक आढावा घेतला असता, समाजकार्य, सेवाकार्य आणि विकासकामात कोण वरचढ आहे, हे स्पष्ट दिसले असते. मात्र आमच्यावर अन्याय झाल्याची भावना नागरिकांमधूनही व्यक्त होत असल्याचे त्यांनी सांगितले. 

ए.बी. फॉर्म, धनुष्यबाणासाठी प्रयत्न केला 

शिवसेनेचे नेते, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे आम्ही शिवसेनेच्या धनुष्यबाण या चिन्हावर निवडणूक लढवण्याची इच्छा व्यक्त केली होती. त्यादृष्टीने जिल्हाप्रमुख आणि संपर्कप्रमुख यांच्याकडे पक्षाचा ए.बी. फॉर्म मिळवण्यासाठी पाठपुरावा केला, मात्र त्याला यश विषयाला नाही. मात्र अपक्ष उमेदवार म्हणून निवडणुकीस सामोरे जात मिळालेले यश एकनाथ शिंदे यांना अर्पण करणार असल्याचे अपक्ष उमेदवार ज्योती पवार यांनी सांगितले. 

Jan Swarashtra
Author: Jan Swarashtra

आणखी वाचा

Buzz4 Ai
error: Content is protected !!