कराडकरांसमोर भावी नगराध्यक्षांनी मांडले विकासाचे व्हिजन

👇बातमी ऐकण्यासाठी येथे क्लिक करा.

नऊही उमेदवार एका व्यासपीठावर; छत्रपती शिवाजी उद्यान ग्रुपच्या चर्चासत्रास सकारात्मक प्रतिसाद

कराड/प्रतिनिधी : –

कराड नगरपालिकेच्या नगराध्यक्ष पदासाठीच्या सर्व नऊही उमेदवारांना एकाच व्यासपीठावर आणणारे ऐतिहासिक चर्चासत्र येथील छत्रपती शिवाजीनगर हौसिंग सोसायटीतील छत्रपती शिवाजी उद्यान ग्रुपतर्फे उत्साहात पार पडले. नागरिक आणि पत्रकारांच्या उपस्थितीत झालेल्या चर्चासत्रास सर्व उमेदवारांनीही सकारात्मक प्रतिसाद देत टिकाटिप्पणीविरहित वातावरण, परस्पर सन्मान आणि शहर विकासाबद्दलची गंभीर बांधिलकी या वैशिष्ट्यांमुळे हे चर्चासत्र विशेष ठरले. उमेदवारांनी आपल्या व्हिजनची थेट मांडणी करत नागरिकांना सुजाण मतदानाचे आवाहनही केले.

दृष्टिकोन : या चर्चासत्रात नागरिकांच्या अपेक्षा, शहरातील सोयी-सुविधा, ट्रॅफिक, पाणीपुरवठा, रोजगार, कचरा व्यवस्थापन, करप्रणाली, पर्यटन, भुईकोट किल्ल्याचे संवर्धन, वाढती लोकसंख्या आणि भविष्यातील आराखडा यांवर उमेदवारांनी आपापला दृष्टिकोन स्पष्ट केला.

विनायक पावसकर (भाजप) : भाजपचे उमेदवार विनायक पावसकर यांनी, शहरातील पार्किंग ही ज्वलंत समस्या असल्याचे सांगत आरक्षित जागांवर शास्त्रीय पद्धतीने पार्किंग उभारण्याचे आश्वासन दिले. युवकांसाठी आयटी पार्क, 24 तास पाणी योजना, करप्रणाली ऑनलाईन, भ्रष्टाचारमुक्त कारभार आणि पालिकेच्या उत्पन्नवाढीवर भर दिला.

राजेंद्रसिंह यादव (यशवंत विकास आघाडी) : यशवंत विकास आघाडीचे राजेंद्रसिंह यादव यांनी, नगरपालिका ही मातृसंस्था असल्याने सक्षम नेतृत्वाची गरज असल्याचे सांगितले. 2056 च्या लोकसंख्येला गृहित धरून सूक्ष्म नियोजन तयार केल्याचे सांगत, पाणी आरक्षणावर ते काम करत असल्याचे स्पष्ट केले. जुन्या पाणी व ड्रेनेज योजनांचे पुनर्जिवन, भुईकोट किल्ला, प्रीतिसंगम बाग आणि यशवंतराव चव्हाण समाधीस्थळाचे पुनरुज्जीवन करण्याचा त्यांनी संकल्प व्यक्त केला.

झाकिर पठाण (काँग्रेस) : काँग्रेसचे झाकिर पठाण यांनी, विद्यार्थ्यांसाठी मोफत शिक्षण, शाळांचे आधुनिकीकरण, घनकचरा व्यवस्थापन, कचरा टेंडर प्रक्रियेतील पारदर्शकता, स्वास्थ्यसेवा सुधारणा आणि ट्रॅफिक समस्येवर एकेरी वाहतूक योजनांची गरज व्यक्त केली.

रणजित पाटील (अपक्ष) : अपक्ष रणजित पाटील यांनी, ‘काम आधी, बोलणे नंतर’ या भूमिकेसह स्टेडियमसाठी निधी आणल्याचा उल्लेख केला. ईदगाह मैदानावर वॉकिंग ट्रॅक, पर्यावरणपूरक उपक्रम, रस्ते-पाणी-विज-सीसीटीव्ही-पार्किंगची अंमलबजावणी करणार असल्याचे सांगत सामाजिक कार्याची त्यांनी उजळणी केली.

गणेश कापसे (अपक्ष) : अपक्ष गणेश कापसे यांनी, युवकांच्या रोजगाराला केंद्रस्थानी ठेवून आयटी पार्काची घोषणा केली. पाणी, ड्रेनेज आणि रस्त्यांसारख्या मुलभूत सुविधांवर भर देत ‘मी एकही टेंडर घेणार नाही’, असे स्पष्ट विधान केले.

इमरान मुल्ला (बसपा) : बसपाचे इमरान मुल्ला यांनी, प्रत्येक प्रभागात शाळा सुरू करण्याचे आश्वासन दिले. युवकांसाठी रोजगार, शासकीय योजनांची माहिती तळागाळात पोहोचवणे आणि महिला सबलीकरणावर त्यांचा भर राहणार असल्याचे सांगितले.

शरद देव (अपक्ष) : अपक्ष शरद देव यांनी, शहरातील वाहतूक ही सर्वात जटिल समस्या असल्याचे सांगत, जुना ते नवा कोयना पूल रिंग रोड करण्याचा संकल्प मांडला. शहरातील मंदिरांचे पर्यटनस्थळांमध्ये रूपांतर, बारा डबरीतील खत प्रकल्पाचे सक्षम व्यवस्थापन, तसेच घरपट्टी व पाणीपट्टी दरांवर नियंत्रण यांचा उल्लेख केला.

श्रीकांत घोडके (अपक्ष) : अपक्ष श्रीकांत घोडके यांनी, पार्किंग व्यवस्थेचे महत्व पटवून देत व्यापारवाढीसाठी त्याची आवश्यकता स्पष्ट केली. तसेच कचरा व्यवस्थापन, कचरा गाड्यांचे नियोजन, महापुराच्या काळात संरक्षणभिंतींची गरज आणि सिग्नलवर सीसीटीव्ही बसवण्याचा त्यांचा कार्यक्रम सांगितला.

बापू लांडगे (अपक्ष) : तर अपक्ष बापू लांडगे यांनी, झोपडपट्टी पुनर्वसन, पर्यावरणसंतुलित शहर, शासनाच्या निधीचा काटेकोर वापर आणि निकृष्ट कामांवर पूर्णविराम देण्याची भूमिका स्पष्ट केली. तसेच ‘मी भ्रष्टाचार करणार नाही, करू देणार नाही आणि कोणतेही टेंडर भरणार नाही’, अशी शपथ घेत नियमित जनता दरबार घेण्याचे आश्वासन दिले.

उपस्थिती : कार्यक्रमाचे प्रास्ताविक अ‍ॅड. संभाजीराव मोहिते यांनी, तर सूत्रसंचालन प्रा. भगवान खोत यांनी केले. तर प्राचार्य सतीश घाटगे यांनी आभार मानले. या कार्यक्रमाला नागरिकांची उल्लेखनीय उपस्थिती लाभली.

Jan Swarashtra
Author: Jan Swarashtra

error: Content is protected !!