सामाजिक कार्यकर्त्या सौ. मधुराणी थोरात यांचे निधन

👇बातमी ऐकण्यासाठी येथे क्लिक करा.

महिलांच्या हक्कांसाठी झटणाऱ्या लढवय्या व्यक्तिमत्वाला भावपूर्ण श्रद्धांजली

कराड/प्रतिनिधी : – 

ओंड (ता. कराड) येथील प्रतिष्ठित सामाजिक कार्यकर्त्या, महिलांच्या हक्कांसाठी लढणाऱ्या आणि विविध सामाजिक चळवळींमध्ये सक्रिय असलेल्या सौ. मधुराणी आनंदा थोरात (वय ४३) यांचे मंगळवारी आकस्मित दुःखद निधन झाले.

परिवार : त्या दैनिक ऐक्यचे कराड प्रतिनिधी आणि ज्ञानदीप सामाजिक संस्थेचे अध्यक्ष आनंदा थोरात यांच्या पत्नी होत. त्यांच्या पश्चात पती, दोन मुले आणि सासू असा परिवार आहे. बुधवारी (दि. ५) ओंड येथे त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. रक्षाविसर्जन विधी शुक्रवार दि. ७ नोव्हेंबर रोजी सकाळी ९ वाजता ओंड येथे पार पडणार आहे.

प्रेरणादायी व्यक्तिमत्व : सौ. थोरात या समाजातील वंचित घटक, महिला आणि तरुणींच्या विकासासाठी कार्यरत असलेल्या एक प्रेरणादायी व्यक्तिमत्व म्हणून परिचित होत्या. त्या एकल महिला संघटना, महिलांचा संपत्ती अधिकार चळवळ, महिला नेतृत्व विकास मोहिम, लोकसहभागातून पाणी व्यवस्थापन आणि संविधान जागृती अभियान अशा विविध सामाजिक उपक्रमांमध्ये अग्रणी भूमिका बजावत होत्या.

महिलांना उद्योजकतेच्या प्रवाहात आणले : महिलांच्या सक्षमीकरणासाठी आणि त्यांच्या आर्थिक स्वावलंबनासाठी त्यांनी विशेष काम केले. ज्ञानदीप कौशल्य विकास प्रशिक्षण संस्थेच्या प्राचार्या म्हणून त्यांनी अनेक महिलांना प्रशिक्षण देऊन त्यांना उद्योजकतेच्या प्रवाहात आणले. त्यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रामीण भागातील अनेक महिलांनी स्वबळावर लघुउद्योग सुरू केले.

शासकीय समित्या आणि संस्थांच्या सदस्या : सामाजिक न्याय, शिक्षण, पर्यावरण आणि ग्रामीण विकासाच्या कार्यातही त्यांनी सातत्याने सहभाग घेतला. विविध शासकीय समित्या आणि संस्थांमध्ये सदस्य म्हणून कार्य करताना त्यांनी नेहमी जनसामान्यांच्या हिताचा मुद्दा अग्रस्थानी ठेवला.

श्रद्धांजली : त्यांच्या अचानक निधनाने सामाजिक क्षेत्रात शोककळा पसरली असून, अनेक सामाजिक संस्थांनी आणि कार्यकर्त्यांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे. त्यांच्या कार्यातून प्रेरणा घेऊन सामाजिक परिवर्तनाची मशाल पुढे नेणे हीच त्यांना खरी श्रद्धांजली ठरेल, असे कार्यकर्त्यांचे मत व्यक्त होत आहे.

Jan Swarashtra
Author: Jan Swarashtra

error: Content is protected !!