डॉ. विनायक कुलकर्णी; शासकीय अभियांत्रिकीतील रोजगार मेळावा यशस्वी, ६०० पेक्षा जास्त विद्यार्थ्यांना थेट नियुक्तीपत्रे
कराड/प्रतिनिधी : –
कराड शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयात आयोजित रोजगार मेळाव्याला नामवंत कंपन्यांसह विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. शैक्षणिक संस्था आणि उद्योग जगतातील दरी भरून काढण्याचा आणि विद्यार्थ्यांसाठी अर्थपूर्ण संधी उपलब्ध करण्यासाठीचा संस्थेचा प्रयत्न आहे. सर्व विद्यार्थ्यांना त्यांच्या करिअरच्या अपेक्षित भविष्यासाठी सक्षम बनवणे, हेही यातील एक उद्दिष्ट असून या मेळाव्यातून मिळालेल्या संधीचे सोने करत विद्यार्थ्यांनी नक्कीच उंच भरारी घ्यावी, अशी अपेक्षा शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय, कराडचे प्राचार्य डॉ. विनायक कुलकर्णी यांनी व्यक्त केली.
रोजगार मेळावा : येथील शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय, कराड व बोर्ड ऑफ अप्रेंटिसशिप ट्रेनिंगच्या (BOAT) सहकार्याने शनिवार (दि. ११) रोजी कराड अभियांत्रिकीमध्ये रोजगार मेळावा 2025 चे आयोजन करण्यात आले होते.
मान्यवरांची उपस्थिती : या मेळाव्याचे उद्घाटन बोर्ड ऑफ अप्रेंटिसशिप ट्रेनिंगचे (BOAT) उपसंचालक एन. एन. वाडोदे, NCVET (दिल्ली) चे संचालक डॉ. सुहास देशमुख आणि संस्थेचे प्राचार्य डॉ. विनायक कुलकर्णी या मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी संस्थेच्या डिन प्रा. उमा पाटील, प्रा. पौर्णिमा कावलकर यांच्यासह टाटा, वॉल्स्टार, भारत फोर्ज, श्री रेफ्रिजरेटर आदी नामांकित कंपन्यांच्या पदाधिकाऱ्यांची प्रमुख उपस्थिती होती.













