सहकार क्षेत्रात मुळापासून सुधारणा आवश्यक

👇बातमी ऐकण्यासाठी येथे क्लिक करा.

शेतीमित्र अशोकराव थोरात; कराडमध्ये तिसऱ्या सहकार परिषदेचे आयोजन

कराड/प्रतिनिधी : –

गेल्या पंधरा ते वीस वर्षांत महाराष्ट्रातील सहकार क्षेत्र सर्वांर्थाने मागे पडत चालले असून अधोगतीकडे चालले आहे. अशा सहकार क्षेत्राची सध्य वस्तुस्थिती व भविष्याबाबत परखड विचार विनिमय करून मुळापासून बदल करण्यासाठी आणि सहकाराची अधोगती थोपवण्यासाठी सहकार क्षेत्राबाबत प्रबोधन करून या क्षेत्राला एक नवीन दिशा देण्यासाठी कराडमध्ये तिसऱ्या सहकार परिषदेचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती शेतीमित्र अशोकराव थोरात यांनी पत्रकार परिषदेत दिली.

कराड अर्बन शताब्दी हॉल : गत दोन वर्षांपासून मळाई ग्रुप, मलकापूर मधील सहकारी संस्था व कनिष्ठ महाविद्यालयीन अर्थशास्त्र राज्य विचारमंच यांनी संयुक्तपणे एक दिवसीय सहकार परिषद आयोजित केली जात आहे. याहीवर्षी राज्यस्तरीय तिसरी सहकार परिषद २०२५ चे रविवार, दि. १९ रोजी सकाळी ११ ते दुपारी ४ वाजेपर्यंत, दि कराड अर्बन को ऑप. बँकेच्या ‘शताब्दी सभागृहात आयोजन करण्यात आले आहे. या परिषदेस अर्बन ग्रुप व कराड अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक प्रायोजक आहेत.

सहकार परिषदेचा उद्देश : या सहकार परिषदेचा उद्देश केंद्राचा सहकार कायदा व त्याचा महाराष्ट्रातील सहकारी चळवळीवरील परिणाम अभ्यासणे, सहकार क्षेत्राच्या सध्याच्या परिस्थितीची चर्चा करणे, सहकार क्षेत्रापुढील आव्हानांचा विचार विनिमय करणे, सहकार वृध्दिंगत करण्यासाठी कराव्या लागणाऱ्या उपायांवर चर्चा करणे हा आहे. ही सहकार परिषद सहकार क्षेत्रातील सभासद व पदाधिकारी, सहकार व अर्थशास्त्राचे विद्यार्थी व तरुण, सहकाराचे अध्यापन करणारे प्राध्यापक, शिक्षक, प्रशिक्षक, सहकार क्षेत्रात कार्यरत असणारे शासकीय अधिकारी आणि समाजातील सर्व घटकांसाठी ही सहकर परिषद आहे.

उद्घाटन : या परिषदेचे उद्घाटन राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरण महाराष्ट्र राज्याचे (पुणे) आयुक्त अनिल कवडे यांचे हस्ते होणार आहे. अध्यक्षस्थानी अर्बन कुटुंब प्रमुख, बँकेचे सुभाषराव जोशी आहेत. तर मळाई ग्रुप, मलकापूरचे अशोकराव थोरात, कनिष्ठ महाविद्यालयीन अर्थशास्त्र राज्य विचार मंचचे अध्यक्ष प्रा.डॉ. शरद शेटे, जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था सातारचे संजय कुमार सुद्रिक, सहाय्यक उपनिबंधक सहकारी संस्था, कराडच्या श्रीमती अपर्णा यादव यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे.

पहिले सत्र : पहिल्या सत्रात सत्र सकाळी १२ ते १ दरम्यान श्रीमंत बाबासाहेब देशमुख महाविद्यालय, आटपाडीचे प्राचार्य डॉ. एस. एम. भोसले हे ‘विविध कार्यकारी सहकारी संस्था आणि ग्रामीण विकास’ या विषयावर मार्गदर्शन करणार आहेत.

दुसरे सत्र : दुसऱ्या सत्रात सकाळी १ ते २ दरम्यान देवचंद कॉलेजचे (अर्जुननगर-कोल्हापूर) डॉ. संतोष यादव हे ‘महाराष्ट्रातील सहकारी संस्थांची सद्यस्थिती’ या विषयावर मार्गदर्शन करणार आहेत.

तिसरे सत्र : तिसऱ्या सत्रात दुपारी २.३० ते ३.३० दरम्यान बापूजी साळुंखे कॉलेज, कराडचे सेवानिवृत्त प्राचार्य डॉ. विजय पाटील हे ‘केंद्रातील नवीन सहकार कायदा व धोरण यशापयश’ या विषयावर मार्गदर्शन करणार आहेत.

भोजन : दरम्यान, दुपारी २ ते २.३० भोजन वेळ असेल.

समारोप : परिषदेच्या समारोपावेळी दुपारी ३.३० ते ४ वाजता अशोकराव थोरात यांचे व्याख्यान होणार आहे.

आवाहन : या परिषदेस कनिष्ठ व वरिष्ठ महाविद्यालयांचे सहकार व अर्थशास्त्राचे प्राध्यापक व निवडक विद्यार्थी, तसेच सातारा, सांगली, कोल्हापूर जिल्ह्यातील सहकारक्षेत्रात काम करणारे प्रतिभावंत कार्यकर्ते उपस्थित राहणार आहेत.
या सहकार परिषदेस नोंदणी व इतर कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही. तरी सहकार क्षेत्रात काम करणाऱ्या अधिकारी, पदाधिकारी, अभ्यासकांनी, व सहकार क्षेत्रातील संबंधितांनी या सहकार परिषदेचा लाभ घ्यावा, असे आवाहन सहकार परिषदेचे आयोजक अशोकराव थोरात यांनी केले आहे.

 

Jan Swarashtra
Author: Jan Swarashtra

Leave a Comment

error: Content is protected !!