डॉ. विनायक कुलकर्णी; शासकीय अभियांत्रिकीतील रोजगार मेळावा यशस्वी, ६०० पेक्षा जास्त विद्यार्थ्यांना थेट नियुक्तीपत्रे
कराड/प्रतिनिधी : –
कराड शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयात आयोजित रोजगार मेळाव्याला नामवंत कंपन्यांसह विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. शैक्षणिक संस्था आणि उद्योग जगतातील दरी भरून काढण्याचा आणि विद्यार्थ्यांसाठी अर्थपूर्ण संधी उपलब्ध करण्यासाठीचा संस्थेचा प्रयत्न आहे. सर्व विद्यार्थ्यांना त्यांच्या करिअरच्या अपेक्षित भविष्यासाठी सक्षम बनवणे, हेही यातील एक उद्दिष्ट असून या मेळाव्यातून मिळालेल्या संधीचे सोने करत विद्यार्थ्यांनी नक्कीच उंच भरारी घ्यावी, अशी अपेक्षा शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय, कराडचे प्राचार्य डॉ. विनायक कुलकर्णी यांनी व्यक्त केली.
रोजगार मेळावा : येथील शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय, कराड व बोर्ड ऑफ अप्रेंटिसशिप ट्रेनिंगच्या (BOAT) सहकार्याने शनिवार (दि. ११) रोजी कराड अभियांत्रिकीमध्ये रोजगार मेळावा 2025 चे आयोजन करण्यात आले होते.
मान्यवरांची उपस्थिती : या मेळाव्याचे उद्घाटन बोर्ड ऑफ अप्रेंटिसशिप ट्रेनिंगचे (BOAT) उपसंचालक एन. एन. वाडोदे, NCVET (दिल्ली) चे संचालक डॉ. सुहास देशमुख आणि संस्थेचे प्राचार्य डॉ. विनायक कुलकर्णी या मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी संस्थेच्या डिन प्रा. उमा पाटील, प्रा. पौर्णिमा कावलकर यांच्यासह टाटा, वॉल्स्टार, भारत फोर्ज, श्री रेफ्रिजरेटर आदी नामांकित कंपन्यांच्या पदाधिकाऱ्यांची प्रमुख उपस्थिती होती.

100 पेक्षा जास्त नामांकित कंपन्यांचा सहभाग : शनिवारी सकाळी ९ ते ५ वाजेपर्यंत चाललेल्या रोजगार मेळाव्यात पायाभूत सुविधा, माहिती तंत्रज्ञान, दळणवळण, बांधकाम, उर्जा, पर्यटन व इतर क्षेत्रातील १०० पेक्षा जास्त नामांकित कंपन्यांनी सहभाग घेतला. तर ३०० पेक्षा जास्त कंपन्यांच्या प्रतिनिधींनी संस्थेला भेट दिली. मेळाव्यात ३ हजार ५०० पेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी सहभागी होत लाभ घेतला. अत्यंत यशस्वी पार पडलेल्या या मेळाव्यात विविध पदविका, पदवी, आय.टी.आय, बी. कॉम, बी.एस.सी, बी. फार्मसी अशा क्षेत्रातील ६०० पेक्षा जास्त विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते मेळाव्यातच थेट नियुक्तीपत्रे सुपूर्त करण्यात आली. तर १ हजार पेक्षा जास्त विद्यार्थ्यांसाठी नोकरीच्या संधी विचाराधीन असल्याचे मेळाव्यात सहभागी कंपन्यांच्या पदाधिकाऱ्यांनी यावेळी सांगितले.
उत्कृष्ट नियोजनाचे कौतुक : सहभागी कंपन्यांच्या प्रतिनिधींनी संस्थेच्या उत्कृष्ट व्यवस्थापनाचे आणि प्राध्यापक व विद्यार्थी समन्वयकांच्या सामाजिक वृत्तीचे कौतुक केले. मेळाव्यात सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांनी शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय कॅम्पसमधील उत्कृष्ट सुविधा, कार्यक्षम व्यवस्थापन आणि आश्वासक वातावरणाचे कौतुक करत कृतज्ञता व्यक्त केली.
कौतुक व आभार : प्राचार्य डॉ. विनायक कुलकर्णी यांनी मेळाव्यात सहभागी सर्व कंपन्यांचे प्रतिनिधी आणि विद्यार्थ्यांचे कौतुक केले. तसेच हा रोजगार मेळावा यशस्वी करण्यासाठी विविध संस्थांनी, प्रसारमाध्यमांनी, तसेच आस्थापनांनी मोलाचे सहकार्य केल्याबद्दल संस्थेच्यावतीने संस्थेच्या डिन प्रा. उमा पाटील यांनी आभार मानले.
पहिलाच रोजगार मेळावा यशस्वी
शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय, कराडच्या ६० वर्षांच्या इतिहासात प्रथमच भव्य रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. तरीही संस्थेचे प्राचार्य डॉ. विनायक कुलकर्णी, डिन प्रा. उमा पाटील व शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या आयोजन समितीतील विविध विभागांचे प्राध्यापक, विद्यार्थी आणि NCC, NSS, डिफेन्स क्लब आणि MESCO सुरक्षारक्षकांनी हा मेळावा यशस्वी करण्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न केले. या सर्वांच्या बहुमोल योगदानामुळे कराड अभियांत्रिकीमध्ये प्रथमच घेण्यात आलेला रोजगार मेळावा निर्दोष व अत्यंत यशस्वीपणे पार पडला.
