९० दिवसांत पाणी, स्वच्छता, ई-गव्हर्नन्ससह सर्वांगीण बदल; टीडीआर देणारी ‘क’ वर्गातील राज्यातील पहिली नगरपालिका – आमदार डॉ. अतुल भोसले
कराड/प्रतिनिधी : –
मलकापूर नगरपालिकेने महाराष्ट्रात आदर्श ‘क’ वर्ग नगरपालिका म्हणून आपली वेगळी ओळख निर्माण करत आता ‘अल्ट्रा मॉडेल’ शहर बनण्याच्या दिशेने ठोस पावले उचलली आहेत. शहराच्या पुढील २५ वर्षांच्या गरजा लक्षात घेऊन नियोजनबद्ध विकासकामांची अंमलबजावणी सुरू असून, त्याचाच भाग म्हणून ‘अभियान ते अभिमान’ या संकल्पनेतून ९० दिवसांच्या विशेष उपक्रमाचा शुभारंभ करण्यात आला असल्याची माहिती आमदार डॉ. अतुल भोसले यांनी दिली.
पत्रकार परिषद : मलकापूर नगर पालखीतर्फे राबविण्यात येणाऱ्या ९० दिवसांच्या विशेष उपक्रमाच्या शुभारंभप्रसंगी आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते.
मान्यवरांची उपस्थिती : यावेळी नगराध्यक्ष तेजस सोनवणे, उपनगराध्यक्ष मनोहर शिंदे, नियोजन व विकास समिती सभापती सूरज शेवाळे, आरोग्य समिती सभापती धनंजय येडगे, महिला व बालकल्याण समिती सभापती गीतांजली पाटील, उपसभापती गीता साठे, सार्वजनिक बांधकाम समिती सभापती हणमंतराव जाधव, नगरसेवक दादासो शिंगण आदींची उपस्थिती होती.
भरपाईचा न्याय्य पर्याय : शहर विकासाला गती देण्यासाठी टीडीआर (Transferable Development Rights) प्रमाणपत्रांची अंमलबजावणी करणारी मलकापूर ही राज्यातील ‘क’ वर्गातील पहिली नगरपालिका ठरली असल्याचे सांगत आमदार डॉ. भोसले यांनी, यामुळे विकासकामांमुळे जमीन बाधित झालेल्या नागरिकांना भरपाईचा न्याय्य पर्याय उपलब्ध झाला असून, शहर नियोजनाला नवी दिशा मिळणार असल्याचे सांगितले.
…ही काळाची गरज : घोषणांपेक्षा प्रत्यक्ष कामावर भर देत मलकापूरचा सर्वांगीण विकास करण्यासाठी राज्य सरकारकडून मोठ्या प्रमाणावर निधी आणणार असल्याचे सांगत आमदार डॉ. भोसले यांनी, वाढत्या लोकसंख्येनुसार पायाभूत सुविधा उभारणे ही काळाची गरज असल्याचे सांगितले.
व्यवस्थापन, नियोजन आणि अंमलबजावणी : ९० दिवसीय अभियानात शहराचा चेहरामोहरा बदलण्याचा आराखडा तयार करण्यात आला असल्याचे सांगताना नगराध्यक्ष तेजस सोनवणे म्हणाले, ५ एप्रिल ते ४ जुलै या कालावधीत प्रशासन ‘झिरो पेंडन्सी’चे उद्दिष्ट ठेवून काम करणार आहे. या अभियानात २४ तास नळ पाणीपुरवठा योजनेचे बळकटीकरण, सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पाचे विस्तारीकरण, घनकचरा व्यवस्थापन व प्लास्टिक निर्मूलन मोहीम, ई-गव्हर्नन्सद्वारे सेवा सुलभता, प्रभागनिहाय स्वच्छता व लोकसहभाग, ‘प्रशासन आपल्या दारी’ उपक्रम, पाणंद रस्ते व मूलभूत सुविधा विकास आदी महत्त्वाचे उपक्रम राबविण्यात येणार आहेत. हे केवळ अभियान नसून व्यवस्थापन, नियोजन आणि अंमलबजावणी यांचा संगम असलेली ९० दिवसांची परिवर्तन मोहीम असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
२५ वर्षांचा विकास आराखडा तयार : माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या संकल्पनेतून शहराचा २५ वर्षांचा विकास आराखडा तयार करण्याचे काम आता आमदार डॉ. अतुल भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली हाती घेतले असल्याचे उपनगराध्यक्ष मनोहर शिंदे यांनी सांगितले. ते म्हणाले, त्याअंतर्गत २४ तास पाणीपुरवठा, आधुनिक सांडपाणी व्यवस्था, सोलर उर्जेद्वारे स्वयंपूर्ण वीज निर्मिती, सीसीटीव्हीद्वारे सुरक्षित, स्वच्छ शहर, सोलर यंत्रणा बसवणाऱ्या नागरिकांना मालमत्ता करात पाच टक्के सवलत देण्याचा निर्णयही घेण्यात आला आहे.
प्रमाणपत्र व धनादेश वितरण : शहर विकासामुळे बाधित झालेल्या नागरिकांना यावेळी टीडीआर प्रमाणपत्रांचे वितरण करण्यात आले. तसेच नगरपालिका कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मानधनाचा प्रश्न सोडवत त्यांना धनादेशही देण्यात आले.
ढेबेवाडी-बैल बाजार ८० फूट रुंद कनेक्टिव्हिटी रोड
राष्ट्रीय महामार्गामुळे दोन भागात विभागलेल्या मलकापूर शहरातील वाहतूक कोंडी आणि नागरिकांची गैरसोय दूर करण्यासाठी ढेबेवाडी फाटा ते बैल बाजार रोड दरम्यान ८० फूट रुंद कनेक्टिव्हिटी रोड उभारण्यात येणार आहे. हा रस्ता शहरासाठी पर्यायी आणि सुकर मार्ग ठरेल, तसेच यामुळे व्यापार आणि दैनंदिन हालचालींना मोठी गती मिळणार असल्याचे आमदार भोसले व उपनगराध्यक्ष शिंदे यांनी सांगितले.
‘विकास पर्यटन’साठी आमदारांचा एक महिन्याचा पगार
नगरपालिका अध्यक्ष, उपाध्यक्ष, सर्व नगरसेवक, नगरसेविका, समित्यांचे सभापती, उपसभापती व अधिकारी, कर्मचाऱ्यांनी उत्कृष्ट विकासकामांचा अभ्यास करावा, यासाठी विशेष ‘अभ्यास दौरा’ आयोजित केला जाणार आहे. या दौऱ्याचा पालिका प्रशासनावर बोजा न टाकता आमदार डॉ. अतुल भोसले यांनी, आपल्या एका महिन्याच्या आमदारकीच्या पगाराचे योगदान जाहीर केले आहे. यातून सर्वांनी आधुनिक प्रकल्पांची माहिती मिळवून शहर विकास अधिक गतिमान करावा, असे त्यांनी नमूद केले.
सत्ताधाऱ्यांची हुकूमगिरी अन् मीपणा उघड
मलकापूर नगरपालिकेच्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमाची निमंत्रण पत्रिका विरोधी गटाच्या नगरसेवकांनाही देण्यात आली. मात्र त्यांना कार्यक्रमात बोलण्याची संधी दिली गेली नाही. ही सत्ताधाऱ्यांची हुकूमगिरी असून, या निमित्ताने त्यांचा मीपणा उघड झाला आहे. उपनगराध्यक्ष मनोहर शिंदे यांनी ९० दिवसांचा विकास कार्यक्रम जाहीर केला. परंतु, अनेक नागरिकांना पाच वर्षांपासून नळ कनेक्शनच्या जोडण्या दिल्या गेलेल्या नाहीत. तसेच लोकांनी निवडून दिलेल्या नगरसेवकांना पालिकेच्या कार्यक्रमात बोलण्याची संधी दिली जात नाही, हा त्यांचा अपमान असल्याचे स्पष्ट मत राष्ट्रवादी अजितदादा पवार गटाचे नगरसेवक दादासो शिंगण यांनी माध्यमांना प्रतिक्रिया देताना व्यक्त केले.