२१ शाखांमधून विस्तारलेले जाळे; ‘अ’ दर्जा कायम ठेवत आर्थिक स्थैर्याचा नवा टप्पा
कराड/प्रतिनिधी : –
जखिणवाडी येथील श्री मळाईदेवी नागरी सहकारी पतसंस्थाने आर्थिक वर्ष २०२५-२६ मध्ये उल्लेखनीय कामगिरी करत ३१७ कोटी रुपयांचा संमिश्र व्यवसाय पूर्ण केला असून, ५ कोटी ३८ लाख रुपयांचा ढोबळ नफा कमावला आहे. संस्थेच्या प्रगतीमुळे सहकार क्षेत्रात तिची भक्कम ओळख अधिक अधोरेखित झाली आहे.
नियोजनबद्ध धोरण अवलंबले : संस्थेच्या आर्थिक वाटचालीची माहिती देताना चेअरमन अजित थोरात व व्हाईस चेअरमन चंद्रकांत टंकसाळे म्हणाले, संस्थेने सहकार खात्याचे सर्व निकष पूर्ण करत आर्थिकदृष्ट्या सक्षम व स्वनियंत्रित पतसंस्थेचा दर्जा मिळवला आहे. भविष्यातही ही प्रगती कायम ठेवण्यासाठी नियोजनबद्ध धोरण अवलंबले जात असून, यंदाही सभासदांना लाभांश देण्यात येणार आहे. तसेच सर्व शाखांमध्ये लॉकर सुविधा सुरू करण्याचा मानसही त्यांनी व्यक्त केला.
७१.३१ कोटी रुपयांची गुंतवणूक : संस्थेने ठेवी व कर्ज व्यवहारात सातत्यपूर्ण वाढ नोंदवली आहे. ३१ मार्च २०२६ अखेर संस्थेकडे १८०.४० कोटी रुपयांच्या ठेवी असून, १३६.७६ कोटी रुपयांचे कर्ज वितरण करण्यात आले आहे. सी.डी. रेशो ६६.४५ टक्के राखण्यात आला असून, ७१.३१ कोटी रुपयांची गुंतवणूक विविध बँकांमध्ये मुदत ठेवीच्या स्वरूपात करण्यात आली आहे. याशिवाय १२.४९ कोटी रुपयांचे भागभांडवल व १५.४६ कोटी रुपयांचे राखीव व इतर निधी संस्थेने उभा केला आहे.
सभासदांना अत्याधुनिक सुविधा : नक्त एनपीए कमी ठेवत वसुलीच्या आघाडीवरही संस्थेने यश मिळवले आहे. ग्राहकांशी सुसंवाद ठेवत आर्थिक शिस्त निर्माण करण्यावर भर देण्यात आला आहे. अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून कोअर बँकिंग प्रणाली, RTGS व NEFT सारख्या सुविधा सभासदांना उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.
सातत्याने ‘अ’ दर्जा : संस्थापक अध्यक्ष अशोकराव थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू झालेली ही संस्था आज २१ शाखा व मुख्य कार्यालयासह २२ केंद्रांमधून सेवा देत आहे. सध्या ९१९४ सभासद असून ७० कर्मचारी कार्यरत आहेत. यामुळे स्थानिक तरुणांना रोजगाराची संधी उपलब्ध झाली आहे. सर्व शाखा संगणकीकृत असून, १७ शाखा स्वमालकीच्या इमारतीत कार्यरत आहेत. गेल्या ३९ वर्षांपासून अविरत जनसेवा करताना संस्थेने सातत्याने ‘अ’ दर्जा मिळवला आहे. सहकार क्षेत्रातील विविध निकष पूर्ण करत स्थैर्य व विश्वासार्हता टिकवून ठेवण्यात संस्था यशस्वी ठरली आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही वार्षिक सर्वसाधारण सभा १ जून २०२६ रोजी घेण्याचा मानस आहे.
विश्वास : संचालक मंडळ व कर्मचाऱ्यांच्या संयुक्त प्रयत्नातून संस्थेची ही प्रगती शक्य झाल्याचे सांगत, भविष्यातही गोरगरिबांच्या सेवेसाठी संस्था अधिक जोमाने कार्यरत राहील, असा विश्वास चेअरमन व व्हाईस चेअरमन यांनी व्यक्त केला.