ग्रामीण भागातील शेतकरी, व्यापारी आणि सर्वसामान्य नागरिकांसाठी विश्वासार्ह आर्थिक सेवा देणारी कृष्णा सहकारी बँक आता अधिक व्यापक झाली असून, कराड, वाळवा आणि शिराळा तालुक्यांत एकाच दिवशी तीन नव्या शाखांचे उत्साहात उद्घाटन करण्यात आले. या विस्तारामुळे ग्रामीण भागातील बँकिंग सेवा अधिक सुलभ होणार असल्याचा विश्वास व्यक्त करण्यात आला.
उद्घाटन : कराड तालुक्यातील मुंढे येथे बँकेच्या २६ व्या शाखेचे उद्घाटन यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन डॉ. सुरेश भोसले यांच्या हस्ते पार पडले.
डिजिटल तंत्रज्ञानाचा स्वीकार : कृष्णा बँकेने नेहमीच सर्वसामान्यांचे आर्थिक हित जपले असून, ग्राहकांच्या विश्वासावरच बँकेने आपले वेगळे स्थान निर्माण केले असल्याचे सांगत डॉ. सुरेश भोसले यांनी, डिजिटल तंत्रज्ञानाचा स्वीकार करून ग्राहकांना अधिक दर्जेदार सेवा देण्याचा बँकेचा प्रयत्न केल्याचे सांगितले.
आर्थिक विकासाला चालना : शिराळा तालुक्यातील शेडगेवाडी येथे २५ व्या शाखेचे उद्घाटन जि. प. सदस्या साईतेजस्वी देशमुख यांच्या हस्ते झाले. नव्या शाखेमुळे स्थानिक नागरिकांना घराजवळ बँकिंग सुविधा उपलब्ध होणार असून, परिसराच्या आर्थिक विकासाला चालना मिळेल, असे त्यांनी नमूद केले.
शुभारंभ : वाळवा तालुक्यातील कासेगाव येथे ज्येष्ठ नेते ॲड. बी.डी. पाटील यांच्या हस्ते, कुमार पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत शाखेचा शुभारंभ करण्यात आला. या तिन्ही कार्यक्रमांना विविध मान्यवर, लोकप्रतिनिधी, सहकारी संस्थांचे पदाधिकारी, बँकेचे संचालक, कर्मचारी, तसेच स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
पहिल्याच दिवशी ठेवींचा विक्रमी प्रतिसाद
कृष्णा सहकारी बँकेच्या नव्या शाखांना ग्राहकांचा पहिल्याच दिवशी उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. तिन्ही शाखांमध्ये मिळून तब्बल ९ कोटींहून अधिक ठेवी जमा झाल्याची माहिती मुख्य कार्यकारी अधिकारी भगवान जाधव यांनी दिली. ग्राहकांच्या या विश्वासामुळे बँकेच्या पुढील वाटचालीला अधिक बळ मिळणार असल्याचेही त्यांनी सांगितले.