स्वा. सावरकर स्मारक समितीच्या वतीने आयोजन; ज्येष्ठ नागरिकांसाठी विशेष वाहनव्यवस्था
कराड/प्रतिनिधी : –
स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या स्मृतिदिनानिमित्त कराड येथे गुरुवारी (दि. २६) रोजी सायंकाळी ६.३० वाजता दि. कराड अर्बन को-ऑप बँकेच्या शताब्दी सभागृहात स्मृतिदिन समारंभाचे आयोजन करण्यात आले आहे.
आयोजक : या कार्यक्रमाचे आयोजन स्वा. सावरकर स्मारक समिती, कराड यांच्या वतीने करण्यात आले आहे.
सावरकर, विकसित भारत आणि आपण सगळेच…: समारंभात प्रमुख वक्ते म्हणून चाणक्य मंडळ परिवारचे संस्थापक, ज्येष्ठ प्रशासकीय अधिकारी अविनाश धर्माधिकारी (आयएएस), उपस्थित राहणार असून ‘सावरकर, विकसित भारत आणि आपण सगळेच…’ या विषयावर ते मार्गदर्शन करणार आहेत. सावरकरांचे राष्ट्रवाद, सामाजिक सुधारणा, विज्ञाननिष्ठ विचार आणि विकसित भारताच्या संकल्पनेशी असलेले नाते या संदर्भात ते आपले विचार मांडतील.
सावरकर गीत क संपूर्ण वंदे मातरम् : कार्यक्रमात ‘स्वरानंद’ समूहाच्या वतीने सावरकर गीतांचे सादरीकरण होणार आहे. तसेच ‘वंदे मातरम्’ गीताच्या १५० व्या जयंती वर्षानिमित्त ‘संपूर्ण वंदे मातरम्’ हे गीत विशेषरूपाने सादर करण्यात येणार आहे. यामुळे कार्यक्रमाला देशभक्तीचा विशेष रंग चढणार आहे.
मार्गदर्शन क सहकार्य : स्वा. सावरकर स्मारक समितीचे अध्यक्ष सुभाषराव जोशी यांच्या मार्गदर्शनाखाली हा समारंभ आयोजित करण्यात आला असून, अ. डवळे, घ. त्र्यं. पेंडरकर, वि. पु. गोखले, अवधूत कुलकर्णी, वि. के. जोशी, डॉ. निखिल आगवेकर आदी मान्यवरांचे सहकार्य लाभले आहे.
विशेष वाहनव्यवस्था : ज्येष्ठ नागरिकांसाठी विशेष वाहनव्यवस्था उपलब्ध करून देण्यात आली असून, गुरुवार पेठ येथील अर्बन बँकेसमोर सायंकाळी ६ वाजल्यापासून ही सुविधा सुरू राहणार आहे.
आवाहन : सावरकरांच्या स्मृतिदिनानिमित्त आयोजित या कार्यक्रमास कराडकरांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.
विचारांचा जागर : राष्ट्रनायक सावरकरांच्या विचारांचा जागर आणि विकसित भारताच्या दिशेने वाटचाल या संकल्पनांना अधोरेखित करणारा हा समारंभ कराडच्या सांस्कृतिक व बौद्धिक क्षेत्रात महत्त्वाचा ठरणार आहे.