वाकुर्डे नळपाणी योजनेला सोलर फिडरचा दिलासा

👇बातमी ऐकण्यासाठी येथे क्लिक करा.

वीजखर्च कमी करण्यासाठी विधानसभेत प्रस्ताव – आ. डॉ. अतुल भोसले

कराड/प्रतिनिधी : –

कराड दक्षिणमधील वाकुर्डे नळपाणीपुरवठा योजनेवरील वाढता वीजखर्च कमी करून शेतकऱ्यांना मोठा दिलासा देण्यासाठी योजना सोलर फिडरवर आणण्याचा प्रस्ताव येत्या अधिवेशनात मांडणार असल्याची घोषणा आमदार डॉ. अतुल भोसले यांनी केली.

बैठक : कृष्णा हॉस्पिटल येथील जनसंपर्क कार्यालयात लाभक्षेत्रातील गावांचे शेतकरी आणि संबंधित अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत झालेल्या व्यापक बैठकीत ते बोलत होते.

…या गावांचा समावेश : काले, ओंड, ओंडोशी, नांदगाव, मनव, उंडाळे, शेवाळवाडी, जिंती, टाळगाव, घोगाव, येणपे, वाठार, झुजारवाडी, पवारवाडी, चोरमारवाडी, माटेकरवाडी, येळगाव, गोटेवाडी, म्हारूगडेवाडी, आकाईवाडी, साळशिरंबे आदी गावांना वाकुर्डे योजनेतून शेती व पिण्याच्या पाण्याचा पुरवठा केला जातो.

उन्हाळ्यापूर्वीच नियोजन : दरवर्षी उन्हाळा सुरू होताच पाणीटंचाईची समस्या तीव्र होते. परिणामी शेतीचे नुकसान आणि पिण्याच्या पाण्याची गैरसोय वाढते. यंदा उन्हाळ्यापूर्वीच नियोजनबद्ध पाणीपुरवठा सुनिश्चित करण्यासाठी ही बैठक घेण्यात आली.

वीजबिलाचा प्रश्न मार्गी : बैठकीत शेतकऱ्यांनी किमान तीन आवर्तनांत नियमित पाणीपुरवठा व्हावा, तसेच वीजबिलाचा उर्वरित भार शासनाने उचलावा, अशी ठाम मागणी केली. गेल्या काही वर्षांत कृष्णा सहकारी साखर कारखान्याच्या माध्यमातून वीजबिलाचा प्रश्न मार्गी लागल्याने पाणीपुरवठा सुरळीत राहिल्याचेही यावेळी नमूद करण्यात आले.

२० टक्क्यांचा भारही कमी व्हावा : राज्य शासनाच्या निर्णयानुसार सध्या ८० टक्के वीजखर्च शासनाकडून आणि २० टक्के खर्च शेतकऱ्यांकडून उचलला जात असल्याचे सांगत आ. डॉ. भोसले म्हणाले, या निर्णयाचा मोठा फायदा लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांना झाला आहे. मात्र भविष्यात शेतकऱ्यांवरील हा २० टक्क्यांचा भारही कमी व्हावा, यासाठी वाकुर्डे योजना सोलर फिडरवर आणण्याचा ठोस प्रस्ताव विधानसभेत मांडण्यात येईल.

संयुक्त बैठक घेणार : यासाठी इतर संबंधित आमदारांशी चर्चा करून संयुक्त बैठक घेण्याचाही प्रयत्न केला जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले. लाभक्षेत्रातील शेवटच्या टोकापर्यंत वेळेत व नियोजनबद्ध पाणी पोहोचावे, यासाठी अधिकाऱ्यांनी तत्परतेने कार्यवाही करावी, अशा सूचनाही त्यांनी दिल्या.

उपस्थिती : बैठकीला वारणा-कोथरूडचे उपविभागीय अधिकारी विजय आंबोळे, शाखा अभियंता ऋतुराज कुराडे, य. मो. कृष्णा सहकारी साखर कारखान्याचे संचालक दयानंद पाटील, मलकापूरचे उपनगराध्यक्ष मनोहर शिंदे यांच्यासह विविध गावांतील पदाधिकारी व शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

शिराळा उपसा जलसिंचन योजनेचा आराखडा अंतिम टप्प्यात

दरम्यान, सुमारे ७०० कोटी रुपयांच्या शिराळा उपसा जलसिंचन योजनेचा प्रस्ताव शासनस्तरावर विचाराधीन असून, या माध्यमातून सुमारे ७५०० एकर शेतीला पाणीपुरवठा होणार आहे. या योजनेचा सविस्तर आराखडा तयार करण्याचे काम सुरू असून, त्यात कराड दक्षिणमधील काही गावांचाही समावेश होण्याची शक्यता आहे. ही योजना पूर्णत्वास गेल्यास परिसरातील शेतीला दीर्घकालीन दिलासा मिळेल, असा विश्वास आ.डॉ. भोसले यांनी व्यक्त केला. 

Jan Swarashtra
Author: Jan Swarashtra

आणखी वाचा

Buzz4 Ai
error: Content is protected !!