छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियमवर ४०० मीटर सिंथेटिक ट्रॅक उभारा

👇बातमी ऐकण्यासाठी येथे क्लिक करा.

क्रीडाप्रेमींची मागणी; मलकापुरात सातारा जिल्हा ॲथलेटिक्स चर्चासत्र, क्रीडा विकासासाठी ठराव

कराड/प्रतिनिधी : –

सातारा जिल्ह्यातील ॲथलेटिक्स क्षेत्रातील वाढत्या गरजा लक्षात घेता कराड आणि सातारा येथील स्टेडियममध्ये आंतरराष्ट्रीय दर्जाचा ४०० मीटर सिंथेटिक ट्रॅक तातडीने उभारण्यात यावा, अशी ठाम मागणी क्रीडा क्षेत्रातील मान्यवरांनी व्यक्त केली.

चर्चासत्र : मलकापूर येथे आयोजित चर्चासत्रात ही मागणी एकमुखाने पुढे आली. सातारा जिल्हा व कराड तालुका ॲथलेटिक्स असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने, तसेच मळाई ग्रुप, मलकापूर यांच्या सहकार्याने रविवारी (दि. २२) मलकापूर येथील स्टार इंग्लिश मिडियम स्कूल अँड ज्युनिअर कॉलेजच्या सभागृहात ‘सातारा जिल्ह्यातील ॲथलेटिक्समधील प्रमुख अडचणी व पुढील नियोजन’ या विषयावर चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते. विविध मान्यवर, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय प्रशिक्षक, खेळाडू, क्रीडा शिक्षक आणि पदाधिकारी यांच्या उपस्थितीत ही बैठक पार पडली.

दर्जेदार सरावाची संधी : यावेळी मार्गदर्शन करताना अशोकराव थोरात म्हणाले, सातारा जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर गुणवंत खेळाडू तयार होत आहेत; मात्र अत्याधुनिक सुविधांचा अभाव हा त्यांच्यासमोरील मोठा अडथळा आहे. विशेषतः कराड येथील छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियम येथे ४०० मीटरचा सिंथेटिक ट्रॅक उभारल्यास खेळाडूंना दर्जेदार सरावाची संधी उपलब्ध होईल आणि राष्ट्रीय पातळीवरील स्पर्धांसाठी त्यांची तयारी अधिक सक्षम होईल, असे त्यांनी नमूद केले.

मागणीचा पाठपुरावा करणार : बैठकीत विविध पदाधिकाऱ्यांनी एकमताने ठराव मंजूर करत कराड व सातारा येथील स्टेडियममध्ये तातडीने सिंथेटिक ट्रॅक उभारण्यासाठी संघटनेच्या वतीने शिष्टमंडळ स्थापन करण्याचा निर्णय घेतला. हे शिष्टमंडळ संबंधित शासकीय यंत्रणांशी बैठक घेऊन मागणीचा पाठपुरावा करणार आहे. तसेच सातारा जिल्हा क्रीडा फेडरेशनचे पुनरुज्जीवन करून त्याला नवचैतन्य देण्याचा ठरावही करण्यात आला.

सत्कार समारंभाचे आयोजन : जिल्ह्यातील सर्व नगरपालिका यांनी क्रीडा विकासासाठी त्यांच्या एकूण अर्थसंकल्पातील किमान ५ टक्के निधी शासन निर्णयानुसार खर्च करावा, यासाठी जिल्हाधिकाऱ्यांना पत्रव्यवहार करण्याचे आणि संबंधित मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना त्याची प्रत देण्याचे ठरविण्यात आले. याशिवाय सातारा जिल्हा ॲथलेटिक्स असोसिएशनच्या वतीने दरवर्षी फेब्रुवारी महिन्यात जिल्ह्यातील गुणवंत खेळाडूंचा सत्कार समारंभ आयोजित करण्याचाही निर्णय घेण्यात आला.

मान्यवरांची उपस्थिती : या चर्चासत्राला सातारा जिल्हा ॲथलेटिक्स असोसिएशनचे अध्यक्ष पांडुरंग शिंदे, सामना समिती अध्यक्ष ॲड. भरत पाटील, संस्थापक श्रीराम कदम, भारतीय ॲथलेटिक्स कोच सुभाष पवार, आंतरराष्ट्रीय कोच बळवंत बाबर, उपमहाराष्ट्र केसरी चंद्रकांत सूळ, संघटक व राष्ट्रीय खेळाडू संजय वाटेगावकर, कोच राजगुरू कोचळे, राष्ट्रीय खेळाडू नरेंद्र लिबे, माजी खेळाडू व क्रीडा मार्गदर्शक पवन पाटील, राष्ट्रीय प्रशिक्षक अतुल पाटील, शशिकांत पाटील, महेंद्र भोसले, प्रा. दीपक डांगे पाटील, आदर्श क्रीडा संघटनेचे जगन्नाथ कराळे, जयवंत पाटील, योगेश खराडे यांच्यासह अनेक क्रीडा शिक्षक व खेळाडू उपस्थित होते.

कामकाजाचा आढावा : प्रारंभी, संजय वाटेगावकर यांनी, जिल्हा संघटनेच्या कामकाजाचा आढावा सादर केला. चर्चासत्रात नरेंद्र लिबे, दिलीप चिंचकर, अतुल पाटील, महेंद्र भोसले, दत्तात्रय पाटील, संजय राठोड आदींनी कराड येथील क्रीडांगणातील अडचणी, खेळाडूंच्या सरावासाठी आवश्यक सुविधा आणि भविष्यातील नियोजन याबाबत स्पष्ट मते मांडली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन योगेश खराडे यांनी केले, तर आभार महेंद्र भोसले यांनी मानले. 

Jan Swarashtra
Author: Jan Swarashtra

आणखी वाचा

Buzz4 Ai
error: Content is protected !!