बालगंधर्व रंगमंदिर, पुणे येथे २१ फेब्रुवारी रोजी होणार वितरण सोहळा
नांदेड/प्रतिनिधी : –
नांदेड येथील अपर पोलीस अधीक्षक सुरज गुरव लिखित ‘विद्यार्थी धर्म’ या पुस्तकाची दुसरे राज्यस्तरीय शासकीय अधिकारी मराठी साहित्य संमेलन–२०२६ अंतर्गत ‘सर्वोत्कृष्ट साहित्यकृती ग्रंथ पुरस्कार’ासाठी निवड झाली आहे. राज्यभरातील विविध साहित्यकृतींपैकी या पुस्तकाची निवड झाल्याने नांदेड जिल्ह्यासाठी हा अभिमानाचा क्षण मानला जात आहे.
पुरस्कार वितरण सोहळा : या पुरस्काराचे वितरण शनिवार, दि. २१ फेब्रुवारी २०२६ रोजी सायंकाळी ५ वाजता बालगंधर्व रंगमंदिर, पुणे येथे होणार आहे. हे संमेलन पुणे महानगरपालिका, मराठी भाषा संवर्धन समिती, संवाद पुणे आणि यशदा यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आले आहे. राज्यभरातील शासकीय अधिकारी, साहित्यिक, अभ्यासक व रसिकांच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडणार आहे.
विद्यार्थ्यांना जीवनमार्ग दाखवणारी कृती : ‘विद्यार्थी धर्म’ हे पुस्तक केवळ साहित्यकृती नसून विद्यार्थ्यांसाठी जीवनमार्गदर्शक ठरावे, या उद्देशाने सुरज गुरव यांनी ते लिहिले आहे. शिक्षणाच्या स्पर्धात्मक वातावरणात भरकटणाऱ्या तरुणाईला योग्य दिशा देणे, आत्मअनुशासन, ध्येयवादी वृत्ती, राष्ट्रनिष्ठा, चारित्र्यसंपन्नता आणि सकारात्मक विचार यांचे महत्त्व पटवून देणे हा या पुस्तकाचा गाभा आहे.
गुणांवर नव्हे, तर मूल्यांवर आधारलेली वाटचाल : विद्यार्थी जीवनात यश संपादन करताना केवळ गुणांवर नव्हे, तर मूल्यांवर आधारलेली वाटचाल कशी असावी, याचे उदाहरणांसह विवेचन या पुस्तकात करण्यात आले आहे. लेखकाने स्वतःच्या जीवनातील अनुभव, पोलीस सेवेत आलेले प्रसंग आणि तरुणांशी संवादातून जाणवलेले प्रश्न यांचा ऊहापोह करून प्रेरणादायी शैलीत विचार मांडले आहेत.
अल्पावधीत राज्यभर लोकप्रियता : डिसेंबर २०२५ मध्ये ‘विद्यार्थी धर्म’ची निर्मिती करण्यात आली. दि. ७ डिसेंबर २०२५ रोजी नांदेड येथे झालेल्या भव्य प्रकाशन सोहळ्यानंतर पुस्तकाला वाचकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. अवघ्या एका महिन्यात पुस्तकाची कीर्ती राज्यभर पोहोचली. वाढत्या मागणीमुळे दुसरी आवृत्ती अल्पावधीतच प्रकाशित करण्यात आली असून पुस्तकाची लोकप्रियता दिवसेंदिवस वाढत आहे.
किल्ले संवर्धनातून समाजप्रबोधन : मूळचे सांगली जिल्ह्यातील असलेले आणि सध्या नांदेड येथे अपर पोलीस अधीक्षक म्हणून कार्यरत असलेले सुरज गुरव यांनी यापूर्वी नांदेड शहरात उपविभागीय पोलीस अधिकारी म्हणून सेवा बजावली आहे. कर्तव्य बजावत असतानाच त्यांनी ऐतिहासिक वारसा जपण्यासाठी पुढाकार घेत नंदगिरी किल्ल्याच्या संरक्षण व संवर्धनाची मोहिम हाती घेतली.
‘माझा जिल्हा, माझा किल्ला’ : ‘माझा जिल्हा, माझा किल्ला’ ही संकल्पना रुजवत त्यांनी तरुणाईला इतिहास जपण्याची प्रेरणा दिली. त्यांच्या नेतृत्वाखाली अनेक युवक नंदगिरी किल्ल्याच्या संवर्धनासाठी स्वयंप्रेरणेने कार्यरत आहेत. त्यांच्या ‘माझं गडप्रेम’ या पुस्तकातूनही किल्ल्यांप्रती असलेले प्रेम आणि जतनाची भूमिका प्रभावीपणे मांडण्यात आली आहे.
कर्तव्य आणि साहित्य यांचा सुंदर संगम : कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी अहोरात्र झटणारा एक अधिकारी आणि त्याचवेळी समाजमन घडविणारा साहित्यिक अशी दुहेरी भूमिका सुरज गुरव निभावत आहेत. कुटुंबीयांकडे दुर्लक्ष करूनही वेळ काढत त्यांनी विद्यार्थ्यांच्या हितासाठी ‘विद्यार्थी धर्म’ची निर्मिती केली.
साहित्यिक कार्याची दखल : राज्यस्तरीय पुरस्काराने त्यांच्या साहित्यिक कार्याची दखल घेतली असून नांदेडसह सांगली जिल्ह्यातील नागरिकांकडून त्यांचे अभिनंदन करण्यात येत आहे. आगामी काळातही समाजप्रबोधनाची ही वाटचाल अधिक व्यापक स्वरूपात सुरू राहील, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.