कृष्णा कारखान्याकडून स्थलांतरित ऊसतोड कामगारांना आरोग्य कवच

👇बातमी ऐकण्यासाठी येथे क्लिक करा.

आयुष्मान कार्डचे वितरण; साखर शाळेतील विद्यार्थ्यांचाही सत्कार 

कराड/प्रतिनिधी : – 

रेठरे बुद्रुक येथील यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखानाच्या वतीने कारखान्याशी संलग्न स्थलांतरित ऊसतोड कामगारांना ‘आयुष्मान भारत’ योजनेअंतर्गत आरोग्य संरक्षण देण्याच्या उद्देशाने आयुष्मान कार्डचे वितरण करण्यात आले. कारखान्याचे व्हाईस चेअरमन जगदीश जगताप यांच्या हस्ते हा उपक्रम पार पडला.

पुढाकार : साखर उद्योगाच्या कणा मानल्या जाणाऱ्या ऊसतोड कामगारांना मोफत व कॅशलेस आरोग्यसेवा उपलब्ध व्हावी, या सामाजिक बांधिलकीतून कारखान्याने हा पुढाकार घेतला आहे.

आरोग्य सुरक्षा देण्याचे उद्दिष्ट : कार्यक्रमावेळी बोलताना व्हाईस चेअरमन जगदीश जगताप म्हणाले, चेअरमन डॉ. सुरेश भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली पात्र स्थलांतरित कामगार व त्यांच्या कुटुंबियांना ‘आयुष्मान भारत’ योजनेंतर्गत आरोग्य सुरक्षा देण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. कामगारांचे आरोग्य सुदृढ राहिल्यासच उद्योगाची प्रगती अधिक बळकट होईल, असे त्यांनी नमूद केले.

महत्त्वाचा टप्पा : मॅनेजिंग डायरेक्टर बाजीराव सुतार यांनीही उद्योगातील कष्टकरी कुटुंबांच्या कल्याणासाठी कारखाना सातत्याने प्रयत्नशील असल्याचे स्पष्ट केले. ऊसतोड कामगारांना आरोग्यविषयक अडचणींना सामोरे जावे लागू नये, यासाठी हा उपक्रम महत्त्वाचा टप्पा ठरेल, असे त्यांनी सांगितले.

मान्यवरांची उपस्थिती : या प्रसंगी संचालक बाबासो शिंदे, जिल्हा परिषद सदस्या सौ. प्रियांका साळुंखे, माजी जिल्हा परिषद सदस्य डॉ. राजकुमार पवार, जनरल मॅनेजर (केन) दादासाहेब शेळके, पर्यावरण अधिकारी सुयोग खानविलकर, वैद्यकीय अधिकारी डॉ. हर्षल निकम, कृष्णा सहकारी बँकेचे माजी संचालक तातोबा थोरात तसेच शिक्षिका राधिका लोखंडे आदी मान्यवर उपस्थित होते.

साखर शाळेतील विद्यार्थ्यांचाही सत्कार : कार्यक्रमादरम्यान साखर शाळेतील विद्यार्थ्यांचाही सत्कार करण्यात आला. सामाजिक उत्तरदायित्व जपत कामगारांच्या आरोग्य सुरक्षेला प्राधान्य देणारा हा उपक्रम परिसरात कौतुकास्पद ठरत आहे.

Jan Swarashtra
Author: Jan Swarashtra

आणखी वाचा

Buzz4 Ai
error: Content is protected !!