अजितदादा पवार यांच्या निधनामुळे आनंदराव पाटील यांचा वाढदिवस रद्द

👇बातमी ऐकण्यासाठी येथे क्लिक करा.

कराड/प्रतिनिधी : –

राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या अपघाती निधनामुळे महाराष्ट्रात शोककळा पसरली असून, विविध स्तरांतून श्रद्धांजली वाहिली जात आहे. या दुःखद घटनेच्या पार्श्वभूमीवर कराडचे माजी आमदार आनंदराव पाटील (नाना) यांनी आपला १९ फेब्रुवारी रोजी होणारा वाढदिवस साजरा न करण्याचा निर्णय जाहीर केला आहे.

नागरिकांमध्ये हळहळ : अजितदादा पवार यांनी, सातारा जिल्ह्यासह राज्याच्या विकासात मोलाचे योगदान दिले. त्यांच्या अकाली निधनामुळे राज्याच्या राजकीय आणि सामाजिक क्षेत्रात मोठी पोकळी निर्माण झाली आहे. सर्वसामान्य जनतेच्या मनात घर केलेल्या या नेतृत्वाच्या जाण्याने महाराष्ट्रातील नागरिकांमध्ये हळहळ व्यक्त होत आहे.

आनंदोत्सव साजरा करणे उचित नाही : या पार्श्वभूमीवर कोणताही वाढदिवस समारंभ, सत्कार कार्यक्रम किंवा सार्वजनिक उत्सव आयोजित न करण्याचा निर्णय आनंदराव पाटील यांनी घेतला आहे. अशा शोकाकुल वातावरणात वैयक्तिक आनंदोत्सव साजरा करणे उचित नाही. आपण सर्वांनी या धाडसी आणि दिलदार नेतृत्वाला भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करून त्यांच्या कार्याचा आदर्श पुढे न्यावा, असे त्यांनी प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे.

आवाहन : १९ फेब्रुवारी रोजी आनंदराव पाटील कराड येथील निवासस्थानी उपलब्ध नसणार असल्याची माहिती त्यांच्या संपर्क कार्यालयामार्फत देण्यात आली आहे. कार्यकर्ते, मित्रपरिवार व हितचिंतकांनी कोणतेही वाढदिवसाचे कार्यक्रम, फलक, केक कापणे किंवा हारतुरे आदी उपक्रम आयोजित करू नयेत, असे आवाहनही करण्यात आले आहे.

Jan Swarashtra
Author: Jan Swarashtra

error: Content is protected !!