उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे; शिवसेना उमेदवारांच्या प्रचारार्थ जाहीर सभा
कराड/प्रतिनिधी : –
उंब्रज शहराच्या भविष्यातील विकासाचा निर्णायक क्षण सध्या जनतेच्या हाती असून, ही निवडणूक उंब्रजसाठी अत्यंत महत्त्वाची आहे, असे प्रतिपादन राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले.
अभूतपूर्व प्रतिसाद : शिवसेना ही आज राज्यातील दुसऱ्या क्रमांकाची ताकद बनली असून, महिलांसाठी सुरू केलेल्या ‘लाडकी बहीण’ योजनेला राज्यभरातून अभूतपूर्व प्रतिसाद मिळत असल्याचे उपमुख्यमंत्री शिंदे सांगितले.
जाहीर प्रचार सभा : उंब्रज, ता. कराड येथील बाजारपेठ तळावर शिवसेनेच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ आयोजित जाहीर सभेत उपमुख्यमंत्री शिंदे यांनी ऑनलाईन सहभाग घेत जनतेला संबोधित केले.
मान्यवरांची उपस्थिती : यावेळी उद्योगमंत्री उदय सामंत, सातारा जिल्हा संपर्कप्रमुख शरद कणसे, जिल्हाध्यक्ष जयवंत शेलार तसेच कराड नगरपरिषदेचे नगराध्यक्ष राजेंद्रसिंह यादव व्यासपीठावर उपस्थित होते. याप्रसंगी शिवसेनेचे उमेदवार ॲड. महादेव साळुंखे, नयन निकम, सोमनाथ चव्हाण यांच्यासह पंचायत समिती गणांतील उमेदवार, शिवसैनिक आणि मोठ्या संख्येने महिला उपस्थित होत्या.
एका वर्षात न्याय देऊ : उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले, उंब्रजला नगरपंचायतीचा दर्जा देणे, घनकचरा व्यवस्थापन, पिण्याच्या पाण्याचा प्रश्न, शेतीसाठी आवश्यक सुविधा, रस्ते व उड्डाणपूल या सर्व प्रश्नांना येत्या एका वर्षात न्याय देण्यात येईल. मी प्रत्यक्ष सभेला येणार होतो; मात्र उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या दुःखद निधनामुळे मन अत्यंत व्यथित आहे. माझी कर्मभूमी मुंबई असली तरी जन्मभूमी सातारा असून या मातीशी माझे नाते अतूट आहे. सातारा जिल्ह्याच्या विकासासाठी मी सदैव कटिबद्ध आहे, असे त्यांनी भावनिक शब्दांत सांगितले.
हीच बाळासाहेबांची शिकवण : गरीबीचे चटके जवळून पाहिले असून, आईची काटकसर अनुभवली असल्यामुळेच ‘लाडकी बहीण’ योजना सुरू केली, असे सांगत त्यांनी या योजनेला कुणीही धक्का लावू शकणार नाही, असा विश्वास व्यक्त केला. शब्द दिला की तो पाळायचा, हीच बाळासाहेब ठाकरे यांची शिकवण आहे, असेही ते म्हणाले.











