रामकृष्ण वेताळ; वक्तृत्व व तुकाराम गाथा पाठांतर स्पर्धेस भेट
कराड/प्रतिनिधी : –
नवीन पिढीला थोर समाजसुधारकांचा इतिहास आणि संतांचे कार्य समजले, तरच भावी पिढी संस्कारक्षम घडेल, असे प्रतिपादन भारतीय जनता पार्टी किसान मोर्चाचे सरचिटणीस रामकृष्ण वेताळ यांनी केले.
स्पर्धेस भेट : सुर्ली (ता. कराड) येथील माध्यमिक विद्यालयात यशवंत शिक्षण संस्थेच्या सांस्कृतिक व्यासपीठाच्या वतीने आयोजित राज्यस्तरीय वक्तृत्व व संत तुकाराम महाराज गाथा पाठांतर स्पर्धेस त्यांनी भेट दिली. यावेळी ते बोलत होते.
मान्यवरांची उपस्थिती : याप्रसंगी संस्थेचे सचिव डी. ए. पाटील, शंकर पाटील, मुख्याध्यापिका मनिषा पानवळ, विजया कदम, नंदा पाटील, अनिल लोकरे, दिपक पवार, माजी मुख्याध्यापक जी. बी. देशमाने, के. आर. साठे, ए. आर. मोरे आदी मान्यवर उपस्थित होते.
वारसा जतन करण्याचे कार्य : आजच्या धकाधकीच्या जीवनात ग्रामीण संस्कृतीशी असलेला जिव्हाळा कमी होत चालला असल्याचे सांगत श्री. वेताळ म्हणाले, भारत देशाला समृद्ध सांस्कृतिक वसा आणि वारसा लाभलेला आहे. सुर्लीसारख्या ग्रामीण भागात शाळा उभी करून शिक्षणाची ज्योत पेटविण्याचे कार्य अण्णांनी सुरू केले. तो वारसा आजही जतन करण्याचे कार्य संस्था करीत आहे, हे निश्चितच कौतुकास्पद आहे. विद्यार्थ्यांसाठी असे नाविन्यपूर्ण उपक्रम प्रेरणादायी ठरतात.
सहशालेय व सांस्कृतिक उपक्रम : संस्थेचे सचिव डी. ए. पाटील यांनी सांगितले की, ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना योग्य व्यासपीठ मिळावे आणि त्यांच्या गुणवत्तेचा विकास व्हावा, यासाठी संस्थेच्या वतीने विविध सहशालेय व सांस्कृतिक उपक्रम सातत्याने राबविले जातात.
आभार : या कार्यक्रमाचे प्रास्ताविक डी. पी. पवार यांनी केले. सूत्रसंचालन आर. एम. अपिने यांनी केले, तर आभार प्रदर्शन ए. ए. जाधव यांनी मानले.