डॉ. संदीप डाकवे यांनी रेखाटली ९८ अध्यक्षांची चित्रे
कराड/प्रतिनिधी : –
सातारा येथे होणाऱ्या ९९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या पार्श्वभूमीवर सैदापूर (ता. कराड) येथील अक्षरगणेशाकार डॉ. संदीप डाकवे यांनी आतापर्यंत संमेलनाचे अध्यक्षपद भूषवलेल्या ९८ अध्यक्षांची चित्रे रेखाटून कलेतून मानवंदना अर्पण केली आहे. या चित्रांचे स्वतंत्र प्रदर्शन भरवण्याचा मानस त्यांनी व्यक्त केला आहे.
महाराष्ट्र शासनाकडून गौरव : समाजप्रबोधन आणि सामाजिक बांधिलकी जपणाऱ्या डॉ. डाकवे यांच्या कार्याची दखल घेत महाराष्ट्र शासनाने त्यांना सहा वेळा गौरवले असून विविध संस्थांकडून ७५ हून अधिक पुरस्कार त्यांना मिळाले आहेत.
इंडिया व वर्ल्ड रेकॉर्ड : डॉ. डाकवे यांनी, यापूर्वी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष प्रा. केशव मेश्राम, नागनाथ कोतापल्ले, फ. मु. शिंदे आणि श्रीपाल सबनीस यांची भेट घेतली आहे. त्यांच्या विविध कलात्मक उपक्रमांची नोंद इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड व वर्ल्ड रेकॉर्ड बुक्समध्ये झाली आहे. त्यांनी ना. शंभूराज देसाई यांच्या ५४ भावमुद्रा, नीलकंठ खाडीलकर (भाऊ) यांच्या ८३ भावमुद्रा तसेच ७५ क्रांतिकारकांची स्केचेस रेखाटली असून, सध्याची ९८ अध्यक्षांची चित्रमालिका विशेष कौतुकाचा विषय ठरत आहे.
संमेलनासाठी खारीचा वाटा
अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनासाठी स्पंदन चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने ‘एक अक्षरगणेशा – साहित्य संमेलनासाठी’ हा उपक्रम राबवण्यात आला. या उपक्रमातून जमा झालेली २,९९९ रुपये रक्कम संमेलनासाठी देण्यात आली आहे. डॉ. संदीप डाकवे हे संमेलनाच्या साहित्यिक व ऐतिहासिक दालन समितीमध्ये कार्यरत आहेत.