जनकल्याण पतसंस्थेच्या चार नव्या शाखांना शासनाची मंजुरी

👇बातमी ऐकण्यासाठी येथे क्लिक करा.

संस्थेची मल्टीस्टेटकडे वाटचाल – अध्यक्ष चंद्रशेखर देशपांडे

कराड/प्रतिनिधी : –

पश्चिम महाराष्ट्रातील सहकार क्षेत्रात विश्वासार्हतेचे प्रतीक ठरलेल्या जनकल्याण नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित, कराड या संस्थेच्या कोथरूड (पुणे), बारामती, गडहिंग्लज व तासगाव येथील चार नव्या शाखांना महाराष्ट्र शासनाच्या सहकार विभागाने मंजुरी दिली आहे. यामुळे संस्थेच्या विस्ताराला आणखी गती मिळाली आहे.

सातत्याने ‘अ’ वर्ग प्राप्त : ‘दीपस्तंभ’ पुरस्काराने सन्मानित जनकल्याण पतसंस्थेने सध्या ५७७ कोटी रुपयांच्या ठेवी व ३५६ कोटी रुपयांचे कर्जवाटप करत ९३३ कोटी रुपयांचा एकत्रित व्यवसाय उभारला आहे. ३०५ कोटी रुपयांची भक्कम गुंतवणूक, १९.०४ टक्के सीआरएआर, ३२.८४ टक्के एसएलआर व २.७४ टक्के सीआरआर या निकषांची पूर्तता करत संस्थेने गेली १५ वर्षे सातत्याने ‘अ’ वर्ग प्राप्त केला आहे.

देशपातळीवरील यादीत समावेश : संस्थेच्या आर्थिक शिस्तबद्धतेची दखल घेत नवी दिल्ली येथील नॅफकब (NAFCUB) या राष्ट्रीय स्तरावरील सहकारी संस्थेने देशपातळीवर बँक होण्याची क्षमता असलेल्या पतसंस्थांच्या यादीत जनकल्याण पतसंस्थेचा समावेश केला आहे. ही बाब संस्थेच्या सभासदांसह हितचिंतकांसाठी गौरवाची आहे.

विशेष सर्वसाधारण सभा : दरम्यान, १ हजार कोटी रुपयांच्या एकत्रित व्यवसायाच्या दिशेने वाटचाल करत संस्थेचा राज्याबाहेरही विस्तार व्हावा, यासाठी जनकल्याण पतसंस्थेला बहुराज्यीय (मल्टीस्टेट) स्वरूप देण्याचा ठराव संचालक मंडळाने मंजूर केला आहे. त्यासंदर्भात सोमवार, दि. १२ जानेवारी २०२६ रोजी विशेष सर्वसाधारण सभा आयोजित करण्यात आली असल्याची माहिती संस्थेचे अध्यक्ष चंद्रशेखर देशपांडे यांनी दिली.

Jan Swarashtra
Author: Jan Swarashtra

error: Content is protected !!