सातारा जिल्ह्यात सर्वसामान्य कार्यकर्त्याला सत्तेच्या प्रवाहात सामावून घेण्याची सुरुवात स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांनी केली. हीच लोकाभिमुख परंपरा पुढे नेत स्वर्गीय विलासकाका पाटील – उंडाळकर यांनी सामान्य कार्यकर्त्यांना राजकीय सत्तेमध्ये संधी दिली. त्याच विचारांची फलश्रुती म्हणजे नितीन ढापरे यांच्यासारख्या सामान्य कार्यकर्त्याला बाजार समितीच्या उपसभापतीपदाची संधी मिळाल्याचे प्रतिपादन रयत सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष अॅड. उदयसिंह पाटील – उंडाळकर यांनी केले.
सन्मान सोहळा : कराड शेती उत्पन्न बाजार समितीचे नवनिर्वाचित उपसभापती व वाय. झेड. इंडिया न्यूज चॅनेलचे मुख्य संपादक नितीन भिमराव ढापरे यांच्या निवडीबद्दल कराड तालुक्यातील सर्व पत्रकारांच्यावतीने खोडशी येथील हॉटेल शिवनेरी येथे सपत्नीक भव्य सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले होते.
मान्यवरांच्या हस्ते सपत्नीक सत्कार : यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे नेते सारंग श्रीनिवास पाटील यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अॅड. उदयसिंह पाटील होते. ग्रंथ, शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ व मानपत्र देऊन नितीन ढापरे यांचा सपत्नीक सन्मान करण्यात आला. यावेळी माजी मुख्याध्यापक पंडित ढापरे, श्रीमती संघमित्रा ढापरे, सौ. सुजाता ढापरे यांच्यासह तालुक्यातील पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित होते.
विचारांच्या अधिष्ठानावर चालणाराच टिकतो : अॅड. पाटील म्हणाले, आजचा काळ हा संक्रमणाचा आहे. अशा काळात जो विचारांच्या अधिष्ठानावर चालतो, तोच टिकतो. स्वर्गीय विलासकाका नेहमी सांगायचे ‘निष्ठेने चालणाऱ्याला संधी मिळते आणि त्या संधीचे सोनं करण्याची जबाबदारी त्याची असते.’ राजकारणात एखादा कार्यकर्ता घडविण्यासाठी संघटनेची दहा वर्षे, नेतृत्वाची दहा वर्षे आणि कार्यकर्त्याची स्वतःची दहा वर्षे, असा तीस वर्षांचा संघर्ष लागत असतो. त्यामुळे टीका करताना वास्तव तपासणे आवश्यक आहे.
सामाजिक बांधिलकीतून संधी : सत्तेचे विकेंद्रीकरण ही संकल्पना स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांनी रुजवली आणि तीच परंपरा विलासकाकांनी जपली. त्याच मार्गावर चालत राजकीय पार्श्वभूमी न पाहता सामाजिक बांधिलकीच्या आधारे नितीन ढापरे यांना बाजार समितीत संधी देण्यात आली. स्वर्गीय विलासकाका नसताना झालेल्या ऐतिहासिक निवडणुकीत मिळालेले यश हे सामूहिक विश्वासाचे फलित आहे. आज बाजार समितीच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर रोजगारनिर्मिती होत असून शेतकऱ्यांना शेतीमालाला चांगला भाव मिळत असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
यशवंत विचार राजकारणी, पत्रकारांनी जपावा : आपण सर्वजण यशवंत विचारांचे पाईक आहोत, अशा शब्दात केलेला गौरव आमच्यासाठी सन्मानाचा असल्याचे सांगत सारंग पाटील म्हणाले, ‘माझं ते खरं नव्हे, तर खरं ते माझं’ हा यशवंत विचार या मातीत रुजलेला आहे. तो विचार राजकारणी म्हणून आम्ही आणि पत्रकार म्हणून तुम्ही सर्वांनी जपला पाहिजे. स्वर्गीय विलासकाकांनी हा विचार कृतीतून जिवंत ठेवला. त्यांच्या दूरदृष्टीमुळेच आणि उदयदादांच्या नेतृत्वामुळे नितीन ढापरे यांच्यासारख्या कार्यकर्त्याला सत्तेची संधी मिळाली.
शब्द खरा करून दाखवला : सत्काराला उत्तर देताना नितीन ढापरे म्हणाले, कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नसताना स्वर्गीय विलासकाकांनी माझ्यावर विश्वास ठेवला आणि अॅड. उदयसिंह पाटील यांनी दिलेला शब्द खरा करून दाखवला. अशी संधी फक्त यशवंत विचारांची मंडळीच देऊ शकतात. उदयदादांच्या सातत्यपूर्ण मार्गदर्शनामुळे शेतकरी आणि व्यापारी यांचा समतोल राखत बाजार समितीच्या माध्यमातून तालुक्याच्या विकासासाठी काम करत आहोत.
मनोगत : प्रारंभी, पत्रकार प्रमोद सुकरे, शशिकांत पाटील, संभाजी थोरात यांनी मनोगत व्यक्त केले. संदीप चेणगे यांनी मानपत्राचे वाचन केले. प्रास्ताविक प्रमोद तोडकर यांनी केले. सूत्रसंचालन अभय देशमुख यांनी केले, तर आभार जगन्नाथ कुंभार यांनी मानले.