राजश्री पाटील यांचे आश्वासन; सैनिक फेडरेशनतर्फे पाटील यांचा सत्कार
कराड/प्रतिनिधी : –
कराड तालुक्यात नुकत्याच रुजू झालेल्या पोलीस उप अधीक्षक राजश्री पाटील यांनी माजी सैनिक, शहीद जवानांचे कुटुंबीय व सेवेत असलेल्या सैनिकांच्या विविध प्रश्नांवर तातडीने चर्चा करून उपाययोजना करण्याचे आश्वासन सैनिक फेडरेशनतर्फे आयोजित सन्मान कार्यक्रमात त्यांनी दिले.
मागणी : फेडरेशनचे राज्य उपाध्यक्ष व जिल्हा संरक्षण समिती सदस्य प्रशांत कदम यांनी यावेळी सैनिकांच्या अडचणींबाबत प्रांत कार्यालयात व जिल्हा संरक्षण समितीत सातत्याने होत असलेल्या चर्चेची माहिती दिली. मात्र, स्थानिक पातळीवर कराड येथे पोलीस उप अधीक्षक कार्यालयात सैनिक व त्यांच्या कुटुंबीयांची स्वतंत्र बैठक आयोजित करावी, अशी मागणी त्यांनी केली.
तोडगा काढण्याचे आश्वासन : पोलीस उप अधीक्षक पाटील यांनी या मागणीला सकारात्मक प्रतिसाद देत, कराड येथे लवकरच सैनिक, माजी सैनिक व शहीद जवानांच्या कुटुंबीयांसाठी बैठक घेऊन त्यांच्या समस्या ऐकून त्यावर तोडगा काढला जाईल, असे आश्वासन दिले.
उपस्थिती : यावेळी सैनिक फेडरेशन कराड तालुकाध्यक्ष सदाशिव नागणे, उपाध्यक्ष सचिन माने यांसह पदाधिकारी उपस्थित होते.