अॅड. भारत मोहिते; स्व. यशवंतराव मोहिते यांच्या पुण्यतिथीनिमित्त अभिवादन
कराड/प्रतिनिधी : –
आज महाराष्ट्राला खऱ्या अर्थाने स्वर्गीय यशवंतराव मोहिते (भाऊ) यांच्या विचारांची गरज आहे. त्यांच्या दूरदृष्टीमुळे कृष्णाकाठ सुजलाम सुफलाम झाला. त्यांनी राजकारण हे जनतेच्या विकासासाठी कसे वापरावे, याचा आदर्श घालून दिला, असे प्रतिपादन अॅड. भारत मोहिते यांनी केले.
अभिवादन : डॉ. इंद्रजीत मोहिते यांच्या रेठरे बुद्रुक येथील निवासस्थानी स्व. यशवंतराव मोहिते यांच्या सोळाव्या पुण्यतिथीनिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. मान्यवरांनी स्व. यशवंतराव मोहिते यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.
मान्यवरांची उपस्थिती : यावेळी कृष्णा कारखान्याचे माजी अध्यक्ष इंद्रजीत मोहिते, माजी संचालक रघुनाथराव कदम, युवा नेते देवदास माने, मनोहर थोरात, सुदन मोहिते, गणेश डुबल आदी मान्यवर उपस्थित होते.
पक्ष स्थापनेसाठी पुढाकार : भाऊ हे काँग्रेसचे ज्येष्ठ विचारवंत आणि तत्त्वनिष्ठ नेते होते. १९२० मध्ये रशियन क्रांतीदिनी त्यांचा जन्म झाला. स्वातंत्र्याच्या चळवळीत १९४२ साली त्यांनी ‘चले जाव’ आंदोलनात सहभाग घेतल्याचे सांगत अॅड. मोहिते म्हणाले, १९४६ मध्ये शेतकरी कामकरी संघ आणि १९४७ मध्ये आळंदी येथे शेतकरी कामगार पक्षाची स्थापना करण्यासाठी त्यांनी पुढाकार घेतला. १९४८ मध्ये संपूर्ण महाराष्ट्रभर त्यांनी प्रचारक म्हणून काम केले.
ऐतिहासिक निर्णय : १९५२ मध्ये आमदार म्हणून निवडून आल्यावर भाऊंनी कुळकायद्यासारख्या ऐतिहासिक निर्णयांना प्राधान्य दिले. कुळ रद्द करून कुळाला मालक बनविण्याच्या भूमिकेस त्यांनी पाठिंबा दिला.
कोयना धरणाचे महत्त्व अधोरेखित : भाऊंनी कोयना धरणाचे महत्त्व अधोरेखित करून विधानसभेत ठोस मांडणी केली. त्यांच्या आमदारकीच्या काळात सुमारे १८ महत्त्वाचे कायदे त्यांनी पारित करून घेतले. सहकार, गृह, गृहनिर्माण, अर्थ, परिवहन अशी अनेक महत्त्वाची खाती त्यांनी जबाबदारीने सांभाळली,” असे त्यांनी सांगितले.
स्वतःच्या जमीनीचे बलुतेदारांमध्ये वाटप : कमाल जमीन धारणा कायदा अंमलात आणण्यापूर्वी भाऊंनी स्वतःची २२ एकर जमीन बारा बलुतेदारांमध्ये वाटून दिली. राजकीय नेते समाजासाठी काय करू शकतात याचा आदर्श त्यांनी कृतीतून दाखवून दिला. आज जेथे राजकारण हे व्यक्तीस्वार्थासाठी वापरले जाते, तेथे भाऊंसारख्या तत्त्वनिष्ठ नेत्यांची गरज आहे.
अनेक संस्था व योजनांची उभारणी : भाऊंनी पदाचा उपयोग स्वतःसाठी कधीच केला नाही. त्यांनी सत्तेत असताना शेतकरी, कामकरी, कष्टकरी घटकांच्या सर्वांगीण विकासासाठी काम केले. कृष्णाकाठच्या विकासासाठी अनेक संस्था व योजना उभ्या केल्या. त्यामुळे आज या भागाचा कायापालट झालेला दिसतो.
राजकारणावरील विश्वास डळमळीत : नेतृत्वाने ठराविक काळानंतर सन्मानपूर्वक निवृत्त व्हावे आणि नव्या नेतृत्वाला संधी द्यावी, हा आदर्श देखील त्यांनीच घालून दिला. आज जनतेचा राजकारणावरील विश्वास डळमळीत झालेला आहे. तो परत मिळवायचा असेल तर, भाऊंसारख्या लोकनेत्यांच्या विचारांना उजाळा देऊन कार्य करावे लागेल,” असे अॅड. मोहिते यांनी सांगितले.