शेतीमित्र अरुण पाटील; ‘गो संवर्धन व पर्यावरण रक्षणा’वर व्याख्यान
कराड/प्रतिनिधी : –
पाच-दहा हजार वर्षांपूर्वी अठरा महर्षींनी आपल्याला पहिली धार्मिक, सांस्कृतिक आचारसंहिता घालून दिली. गाय उभी, तिथे तीर्थक्षेत्र उभा राहते, हे सांगितले. परंतु, ऋषीमुनींनी सांगितलेली संकल्पना आपण विसरलो. पाश्चात्य संस्कृतीला भुलून दुःख, विकलांगता, मनोरुग्ण व विविध आजारांना कवटाळले. आपली संस्कृती सोडल्यामुळे देवत्व गेले आहे. ते परत मिळवण्यासाठी घरोघरी गोमातेचे पालन, संगोपन होणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन शेतीमित्र, गोतज्ञ अरुण पाटील यांनी केले.
व्याख्यान : श्री गोरक्षण संस्था ट्रस्ट, कराडतर्फे शिवजयंतीनिमित्त ‘भारतीय संस्कृतीचा केंद्रबिंदू – देशी गाय, मानवी आरोग्य व संपुर्ण पर्यावरण रक्षण’ या विषयावर आयोजित व्याख्यानात मार्गदर्शन करताना ते बोलत होते.
मान्यवरांची उपस्थिती : या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे जयराम स्वामी वडगावचे मठाधिपती विठ्ठल स्वामी महाराज, संस्थेचे अध्यक्ष सुनील पावसकर यांची प्रमुख उपस्थिती होती.

त्यातून विषारी कण पोटात जातात : जागतिक बाजारपेठेत ४५ टक्के कृषी उत्पादन एकट्या भारताचे होते. मात्र, आज आपल्या शेतीची अवस्था बिकट झाली असल्याचे सांगत श्री. पाटील म्हणाले, हरियाणातील गहू, तांदळातून विषारी कण आपल्या पोटात जातात, हे संशोधनातून समोर आले आहे. पिकांवरील विषारी औषधांच्या अतिवापरामुळे कॅन्सरचे प्रमाण वाढलेय.
नदी अपवित्र करण्याचे पाप केले : नदी आणि गाईला माता मानणाऱ्या आपल्या संस्कृतीला आपण विसरत चाललोय. गंगा नदीच्या पाण्यातील जैवविविधता जगातील कोणत्याही नदीच्या पाण्यात आढळत नाही. मात्र, हीच नदी अपवित्र करण्याचे पाप आपण केले असल्याचे मत श्री. पाटील यांनी व्यक्त केले.
अपत्याचा बुद्धांश कमी होतो : मनःशांती आणि शीघ्र विचारशक्ती ठेवण्यासाठी पाणी शुद्ध ठेवायला हवे, असे सांगत श्री. पाटील म्हणाले, तिथी, वार, नक्षत्र, चरण यांनुसार झाडात वेगवेगळे प्रथिने तयार होतात. म्हणून वडाला प्रदक्षिणा घालण्यास संस्कृती सांगते. आज ६५ टक्के स्त्रियांचे सिजर करावे लागते. यावेळी दिलेल्या इंजेक्शनमुळे अपत्याचा दहा टक्के बुद्धांश कमी होत असल्याचे पाश्चात्य संशोधनातून समोर आले आहे.
प्रयोग हेच जीवन : संस्कृतीचा आधार घेऊन आरोग्य निरोगी राखायला हवे. निसर्गाचा आनंद घेऊन जो जगाला, तो आनंदी. खोपीत रहा, पण समाधानाने रहा. शेती श्रद्धेवर अवलंबून असते. शेती विकसित करण्याचे तंत्र पराशर मुनींनी सर्वप्रथम मांडले. प्रयोग हेच जीवन म्हणून जगायला शिका, असे आवाहन श्री. पाटील यांनी केले.
‘ज्याच्या घरी गाय, तिथे विठ्ठलाचे पाय’ : ‘ज्याच्या घरी गाय, तिथे विठ्ठलाचे पाय’ या तुकाराम महाराजांच्या चरणाचा आधार घेत श्री. पाटील म्हणाले, प्रत्येक घरात गोमातेचे पालन होणे गरजेचे आहे. गाईंमुळे २३ टक्के ऑक्सिजन मिळतो. तिच्या शेणात ३० टक्के, तर वाळलेल्या शेणात ४५ टक्के ऑक्सिजन असतो. गाईच्या शेणाचा सडा अंगणात मारल्याने अल्ट्रानील किरणे सहा फुटांवरून परावर्तीत होतात.
गोमुत्राचे महत्त्व : गोमुत्राच्या गंध लहरींमुळे बुद्धिमत्ता वाढते. गोमूत्र कीडनाशक असून त्यातून १६ अन्नद्रव्य पिकाला मिळतात. दररोज ४५ मिली गोमूत्र प्राशन करावे. कॅन्सरपासून वाचण्यासाठी गोमुत्राशिवाय पर्याय नाही, जगाने मान्य केले आहे. गोमूत्र कोलेस्ट्रॉल जाळून टाकते. गाईचे दूध, दही, ताक, तूप अत्यंत औषधी आहे. मात्र, विज्ञानाने आपण अधोगतीला गेलो. गाय घराघरात जावी, शेतीचे, घराचे आरोग्य निरोगी रहावे, यासाठी गाईचे पालन, संगोपन करणे गरजेचे असल्याचे श्री. पाटील यांनी सांगितले.

आपण षंडासारखे गप्प! : हिंदूंवर, गाईंवर हल्ले होताना आपण षंडासारखे गप्प आहोत, असे सांगत मठाधिपती विठ्ठल स्वामी महाराज म्हणाले, आज अतिरेकी हल्ल्यांपेक्षा आपल्याच धर्म आणि संस्कृतीला नावे ठेवणारेच खरे अतिरेकी आहेत. अनेकजण दानधर्म करतात. परंतु, गोपालन सारख्या संस्थेला मदत करताना लोक कुचराई करतात. त्यामुळे मदत कुठे करावी, हेही कळायला हवे.
खाण्यातूनच विषप्राशन : सणासुदीला पुजायलाही गाय, बैल मिळणार नाहीत, अशी परिस्थिती असल्याचे सांगत महाराज म्हणाले, आपण आपल्या खाण्यातूनच विष प्राशन करतोय. १०० लोकांपाठीमागे दहा जण कॅन्सरने ग्रस्त आहेत, हे त्याचेच उदाहरण आहे. त्यामुळे आपण आर्थिकदृष्ट्या आपला शेतकरी चांगल्या पद्धतीने उभा करायला हवा, गोशाळेचा सहकार्य करायला हवे, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.
संस्थेच्या कार्याचा आढावा : प्रास्ताविकात संस्थेचे अध्यक्ष सुनील पावसकर यांनी प्रत्येकाच्या घरी गाय असावी, याबाबत जागृतता निर्माण करण्यासाठीचा हा प्रयत्न आहे. १९१५ पासून या जागेवर गोशाला आहे. मात्र, जागेचे आर्थिक महत्व पाहून काहींची या जागेवर वक्रदृष्टी पडली. सदर जागा विकल्याचे निदर्शनास आल्यानंतर आम्ही गोशाला वाचवण्यासाठी लढा उभारला. यामध्ये सर्वसामान्य गो प्रेमी, नागरिक आमच्या पाठीमागे उभे राहिल्याचे त्यांनी सांगितले.
सहकार्य : सूत्रसंचालन मदन सावंत यांनी केले. सौ. ज्योती दंडवते यांनी आभार मानले. संपूर्ण वंदे मातरम् होऊन कार्यक्रमाची सांगता झाली. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अनिल कडणे, सुरेंद्र भस्मे, संजीव शहा, महेश उर्फ पप्पु कुष्टे, गीता सूर्यवंशी, पांडुरंग चव्हाण यांचे सहकार्य लाभले. कार्यक्रमास गोप्रेमी, शिवप्रेमी, पर्यावरणप्रेमी युवक, युवती, महिला, नागरिक उपस्थित होते.
गोरक्षण संस्थेच्या मागे हिंदुंनीच फेरा लावलाय
कराडची गोरक्षण संस्था शंभर वर्षांहून जुनी आहे. इथे गाईचे पालन, पोषण केले जाते. याला गोप्रेमी, नागरिकांचा हातभार आहे. मात्र, या संस्थेच्या मागे लागलेला फेरा हिंदुंनीच लावला आहे, यासारखे दुसरे दुर्दैव नाही. पैसा हा सर्वश्रेष्ठ नाही. मनुष्यच मनुष्याचा वैरी बनत चाललाय. मात्र, श्री गोरक्षण ट्रस्ट संस्थेला त्यांच्या जागेवरून कोणीही हटवू शकत नाही. प्रसंगी आम्ही जीवाची बाजी लावू. अशा कुप्रवृत्तीला गोप्रेमी, पर्यावरण प्रेमी, नागरिकांनीही खंबीरपणे विरोध करायला हवा, असे आवाहन मठाधिपती विठ्ठल स्वामी महाराज यांनी केले.
