घनकचरा व्यवस्थापनासाठी ग्रामस्थांचा उत्स्फूर्त सहभाग
कराड/प्रतिनिधी : –
स्वच्छ भारत अभियानाला साथ देत बेलवडे बुद्रुक (ता. कराड) येथील ग्रामपंचायतीने गावाच्या घनकचरा व्यवस्थापनासाठी महत्वपूर्ण पाऊल उचलले आहे. नुकतेच गावात नव्याने खरेदी करण्यात आलेल्या घंटागाडीचे लोकार्पण सरपंच डॉ. सुशांत मोहिते यांच्या हस्ते करण्यात आले.
ग्रामस्थांमध्ये समाधानाचे वातावरण : या उपक्रमामुळे गावातील स्वच्छता उपक्रम अधिक प्रभावीपणे राबवता येणार असल्याने ग्रामस्थांमध्ये समाधानाचे वातावरण आहे.
मान्यवरांची उपस्थिती : या लोकार्पण कार्यक्रमात सरपंच डॉ. सुशांत मोहिते, उपसरपंच जयवंत कुंभार, ग्रामपंचायत सदस्य मारुती मोहिते, रुपेश मोहिते, स्वाती मोहिते, माजी सदस्य महेश मोहिते, ज्येष्ठ नागरिक राजाराम मोहिते, नामदेव मोहिते, जगन्नाथ मोहिते, गणेश मोहिते, गोरखा कुंभार, जाफर पटेल, इम्रान मुल्ला, ग्रामसेवक श्री. खांडके, पंचायत समितीच्या पाटील मॅडम, तसेच विविध विभागांचे अधिकारी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कचऱ्याचे योग्य व्यवस्थापन : “गावाचा सर्वांगीण विकास करताना स्वच्छता ही एक मूलभूत गरज असल्याचे सांगत सरपंच डॉ. सुशांत मोहिते म्हणाले, गावातील कचऱ्याचे योग्य व्यवस्थापन करण्यासाठी ही घंटागाडी अत्यंत उपयुक्त ठरणार आहे. यामुळे केवळ स्वच्छता नाही, तर आरोग्याच्या दृष्टीनेही सकारात्मक परिणाम दिसून येतील.”
विनामूल्य जमिनी उपलब्ध : या प्रकल्पासाठी गावातील ज्येष्ठ नागरिक राजाराम मोहिते यांनी आपली जमीन विनामूल्य उपलब्ध करून दिली. त्यांच्या या समाजहिताच्या योगदानाचे उपस्थित मान्यवरांनी भरभरून कौतुक केले.
सहकार्य : अशोक लेलँड कंपनीचे व्यवस्थापक योगेश मोहिते यांनी या प्रकल्पासाठी आवश्यक तांत्रिक आणि आर्थिक सहकार्य केल्याबद्दल त्यांचेही आभार मानण्यात आले.
ओला व सुका कचऱ्याचे वर्गीकरण : “घंटागाडीच्या माध्यमातून दररोज घरोघरी जाऊन कचरा संकलन करण्यात येणार असून ओला व सुका कचऱ्याचे वर्गीकरण करून त्याची योग्य विल्हेवाट लावली जाईल.”, असे ग्रामसेवक अण्णासाहेब खांडके यांनी सांगितले.
स्वच्छतेच्या दिशेने भक्कम पाऊल : कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ग्रामसेवक श्री. खांडके यांनी, तर उपसरपंच जयवंत कुंभार यांनी आभार मानले. हा उपक्रम ग्रामपंचायतीच्या लोकसहभागातून साकारलेल्या योजनांचे एक यशस्वी उदाहरण असून, गावाने स्वच्छतेच्या दिशेने भक्कम पाऊल टाकले आहे.
आवाहन : या प्रकल्पाच्या यशस्वीतेसाठी ग्रामस्थांनीही सहकार्य करावे, असे आवाहन यावेळी ग्रामपंचायतीच्या वतीने करण्यात आले.
