मला या गोष्टीचा खूप आनंद आहे की, माझे १९९३ पासून मित्र असलेले ग्रंथपाल संजय शिंदे वयाच्या ५८ व्या वर्षांतील निवृत्ती तारुण्याच्या स्फूर्ती, आनंदाने साजरी करीत आहेत. एक आनंद वारकरी आज ज्ञानपंढरीच्या सेवापूर्तीचा सोहळा अनुभवत आहे. सावता जसा ‘कांदा, मुळा, भाजी; अवघी विठाई माझी’ म्हणत असे. तद्वत आपण समोरच्या वाचकांमध्ये ज्ञानेश्वर पाहिला, त्यांच्यासाठी कार्यमग्न झाला. ही कृतकृत्यता घेऊन आज समाधानाने निवृत्त होत आहात; त्यानिमित्ताने…
सेवानिवृत्ती : आपण शासनाच्या नियमानुसार कराड नगरपरिषद नगरवाचनालयाचे ग्रंथपाल या पदावरून आज बुधवार (दि. ३०) एप्रिल २०२५ रोजी सेवानिवृत्ती होत आहात. या प्रदीर्घ सेवेत आपण प्रामाणिक, प्रभावशाली कार्य केले. आपल्या सहकार्यांना बरोबर घेऊन काम करण्याची आपली पद्धत नक्कीच प्रेरणादायी ठरणार आहे.

वारसा ताकदीने चालवला : माजी ग्रंथपाल विठ्ठल पाटील, श्री. अशोक आदमणे यांचा वारसा तेवढ्याच ताकदीने आपण पुढे चालवण्यात यशस्वी झाला आहात. नगरपरिषदेचे नगराध्यक्ष, नगरसेवक, पदाधिकारी यांच्या विश्वासास नेहमीच पात्र राहिलात. नोकरी करीत असताना पदाची कर्तव्ये व शिस्तीचे काटेकोर पालन करुन एक आदर्श निर्माण केला आहात. यापाठीमागे आपल्या आई-वडिलांचे संस्कार आहेत. आईचा “भाजणारा” हात आणि वडिलांचा “कमावणारा” हात ज्याला कळतो, तो आपोआपच चांगल्या कर्माला वळतो.
आध्यात्मिक व्यक्तीमत्व : मनाला चांगल्या विचारांचे कव्हर असेल, तर माणूस नावाच पुस्तक नेहमी सुंदरच असते…. आपण ग्रंथालयाची जबाबदारी सांभाळत समृद्ध ग्रंथालय बनवले. वाचकांना माऊली मानून सेवा दिलीत व जो आनंद मिळविला, तोच सच्चिदानंद आहे. या पाठीमागे आपले आध्यात्मिक व्यक्तीमत्व ठळकपणे दिसून येते.
उत्तम ग्रंथपाल : आपला स्वभाव, हास्यभाव, आपलेपणा, निष्ठा, सचोटी, शिस्तबद्धता, कार्यतत्परता, परिश्रम आणि सकारात्मक दृष्टिकोन या सर्व गुणांचा ठेवा आपल्या व्यक्तीमत्त्वात आहे, म्हणूनच उत्तम ग्रंथपाल म्हणून आपण कौतुकास पात्र ठरला आहात.
सिंहाचा वाटा : महाराष्ट्रातील काही उत्कृष्ट सार्वजनिक ग्रंथालयात कराड नगरपरिषद नगरवाचनालयाचा समावेश झाला आहे. यापाठीमागे यशवंतराव चव्हाण साहेबांचा साहित्यिक वारसा, दूरदृष्टीने निर्णय घेऊन कराडचा सर्वांगिण विकास करणारे गिनीज बुकमध्ये नोंद झालेले आदरणीय नगराध्यक्ष पी. डी. पाटील साहेब, ग्रंथालयास लाभलेले कार्यक्षम ग्रंथपाल व कर्मचारी वृंद यांचा सिंहाचा वाटा आहे. अशा सुंदर ठिकाणी आपली सेवानिवृत्ती होत आहे, यापेक्षा मोठा आनंद कोणता. हा आनंद व सुख आपल्या भावी आयुष्यात प्रत्येक दिवशी समाधान देणार आहे.

लोकप्रिय उपक्रम : ग्रंथपाल संजय शिंदे यांच्या कार्याचे व व्यक्तिमत्त्वाचे अनेक पैलू आहेत. त्यापैकी ग्रंथपाल म्हणून जबाबदारी सांभाळत स्पर्धा परीक्षा विभाग, शासकीय ग्रंथ महोत्सव, विद्यार्थी सामुहिक पुस्तक वाचन, असे अनेक लोकप्रिय उपक्रम सातत्याने यशस्वी पार पाडत लोकांना आनंद व सेवा दिली आहे. त्यापैकी शतकाकडे वाटचाल करणारी शारदीय व्याख्यानमाला आणि यशवंतराव चव्हाण व्याख्यानमाला. या दोन्ही व्याख्यानमालांची पंचक्रोशीतील लोक वाट पाहत असतात. यांचे श्रेय नगरपरिषदेला आहेच, पण त्यापाठीमागे ग्रंथपाल संजय शिंदेंनाही द्यावेच लागेल. कारण या लोकप्रिय व्याख्यानमाला यशस्वी करण्यासाठी जो आटापिटा करावयास लागतो, त्याचा मी अनेक वर्षे साक्षीदार आहे.

उत्तम नियोजन : व्याख्यानमालेच्या अगोदर तीन-चार महिने व व्याख्यानमाला संपल्यानंतर किमान एक महिना काम सुरू असते. वक्ता ठरवताना अनेक श्रोत्यांशी चर्चा, प्राध्यापकांची मते, मुख्याधिकाऱ्यांची मान्यता, नगराध्यक्ष व नगरसेवकांशी चर्चा, हे सर्व सोपस्कार करून सर्वसमावेशक वक्ता ठरवणे, त्यांचे मानधन ठरवणे, सर्व वक्त्यांचे मानधन व इतर खर्च नगरपरिषदेने मंजूर केलेल्या बजेटमध्ये बसवणे, व्याख्यानमाला ठरल्यानंतर तसे बोर्ड तयार करून शहरातील चौकाचौकांत लावणे, व्याख्यानमालेची कार्यक्रमपत्रिका छापणे, कराड शहरातील सर्व मान्यवरांना व्याख्यानमालेचे निमंत्रण देणे, वक्ता ठरल्यानंतर त्यांचे व्याख्यान होईपर्यंत त्यांच्याशी संपर्कात राहणे, वक्ता त्यांच्या घरातून निघाल्यापासून तो कराडमध्ये पोहचेपर्यंत त्यांच्या संपर्कात राहणे, वक्ते आल्यानंतर त्यांचे यथोचित स्वागत, चहापाणी देऊन त्यांना थोडी विश्रांतीची सोय करणे, वक्ता व्यासपीठावर पोहचेपर्यंत अलर्ट रहाणे, सूत्रसंचालक, अध्यक्ष व प्रमुख उपस्थिती सर्वांचे नियोजन व स्वागत करणे, एवढेच नाही; त्या वक्त्याचे संपूर्ण व्याख्यान ऐकणे, त्याचबरोबर श्रोत्यांचा प्रतिसाद पाहणे, व्याख्यानाच्या शेवटी टाळ्यांचा कडकडाट ऐकला की, संजय शिंदेंच्या चेहऱ्यावर एक समाधानाचे हास्य दिसत असे. यातून आमच्यासारख्या त्यांना सहकार्य करणाऱ्यांनाही समाधान, आनंद मिळत असे.

तत्परता : व्याख्यानानंतर व्याख्यातांना जेवण देऊन त्यांच्या राहण्याची व्यवस्था करुन, सकाळी सात वाजता त्यांना नाष्टा व चहापाणी देऊन एसटीमध्ये बसवणे, व्याख्यानाची बातमी तयार करणे, सर्व वृत्तपत्रांच्या कार्यालयात पाठवणे व दुसऱ्या दिवशी होणाऱ्या व्याख्यानाच्या व्यवस्थेमागे लागणे. ज्यांना व्याख्यानास सभागृहात येता आले नाही, त्यांच्यासाठी त्या व्याख्यानाचे टीव्ही वाहिन्यांद्वारे प्रसारण करणे, सर्व व्याख्यानमाला संपल्यानंतर सर्व व्याख्यातांना त्यांचे फोटो व आभार पत्रे पाठवणे, सहकार्यांना आभारपत्र पाठवणे व शेवटी सर्व पारदर्शक खर्चाचा अहवाल नगरपरिषद ऑडिट विभागाला पाठवणे, तो तपासून घेणे, ऐवढे सोपस्कार पार पाडावे लागतात.
समयसूचकता : याशिवाय ऐवढे जागरुक राहूनही अनेकवेळा काही वक्त्यांनी अचानक व्याख्याने रद्द केली आहेत. तेवढ्या कमी वेळेत दुसरा वक्ता मिळवणे खुप अडचणीचे ठरते. पण असे प्रसंगही संजय शिंदेंनी दडपण आल्यानंतरही त्या परिस्थितीला सामोरे जाऊन सोडवले आहेत. पण व्याख्यानमालेत खंड पडू दिला नाही. एकदा तर पुण्यातून येणाऱ्या व्याख्यात्यांनी मी कराडला येण्यासाठी प्रवास सुरू केला आहे. असा दुपारी चार वाजता फोन केला व पाच वाजून दहा मिनिटांनी दुसरा फोन केला. मला व्याख्यानास येता येत नाही, मला मुख्यमंत्र्यांनी मुंबईला मिंटींगसाठी बोलावले आहे. व्याख्यानास एक तास राहिला होता. संजय शिंदेंना मोठं दडपण आलं. एवढ्या कमी वेळेत शारदीय व्याख्यानमालेत वक्ता तयार होणे कठीण होतं. तरीपण संजय शिंदेंनी काही लोकांशी चर्चा करुन कराडमधील कार्यक्षम वरिष्ठ पोलीस निरीक्षक बी. आर. पाटील यांना व्याख्यानासाठी फोन केला. त्यावेळी बी. आर. पाटील मेडिकल तपासणीसाठी हॉस्पिटलमध्ये डॉक्टरांसमोर बसले होते. त्यांना परिस्थिती सांगितली व आपण व्याख्यान देण्याची विनंती केली. श्री. पाटील साहेबांनी थोडा विचार करून येण्याचे मान्य केले व ठरलेल्या वेळेत व्याख्यान सुरू झाले. यावेळी संजय शिंदेंची समयसूचकता दिसून आली. तसेच पूर्ण सभागृह भरलेल्या श्रोत्यांना उत्कृष्ट व्याख्यान उपलब्ध करून जी सेवा केली, याबद्दल संजय शिंदेंचे कौतुक करावे तेवढे कमीच ठरेल.
श्रेय : एवढी तळमळ, धडपड, निष्ठा असल्याने असे अनेक उपक्रम त्यांना यशस्वी करणे शक्य झाले आहे. अनेक मातब्बर व्याख्यातांना आणून दोन्ही व्याख्यानमाला सतत यशस्वी करणे, या उपक्रमाचे श्रेय ग्रंथपाल संजय शिंदे यांनाच द्यावे लागेल. या उपक्रमासाठी सर्व श्रोत्यांच्या वतीने मी ग्रंथपाल संजय शिंदे यांचे मनःपूर्वक अभिनंदन करतो.
पुरस्कारांनी गौरव : कराड नगरपरिषद नगर वाचनालयास महाराष्ट्र शासनाचे व विविध संस्थांचे पुरस्कार मिळाले आहेत. तसेच ग्रंथपाल संजय शिंदे यांनाही उत्कृष्ट ग्रंथपाल म्हणून महाराष्ट्र शासनासह अनेक संस्थांकडून पुरस्कार देऊन गौरविण्यात आले आहे.
प्रेरणादायी व्यक्तिमत्व : सचोटी, प्रामाणिकपणा, वक्तशीरपणा व शिस्त असे आपले व्यक्तिमत्व आपल्या पेशात येणाऱ्या सर्वांनाच प्रेरणादायी ठरणारे आहे. खरेतर, अनेक वर्षे पुस्तकांच्या व वाचकांच्या मेळ्यात आपले दिवस व्यथित झालेले असतात. आज ते जड अंतःकरणाने सोडताना दु:खावेग आवरता येऊ शकत नाही. पण सरकारी वय आडवे येते आणि आपणास सेवामुक्त व्हावे लागते.
सेवेत मुक्तभाव असतो : खरेतर, यापुढील सेवा हीच खरी सेवा. कारण नोकरीत मोल असते, पण पगार, वेतन असते. पण सेवेत मुक्त भाव असतो. सेवेतून कधीच निवृती घेता येत नाही, फक्त माध्यम बदलते एवढेच! जेव्हा मानसाला सक्तीची विश्रांती समोर दिसते, तेंव्हा बिचाऱ्या माणसाची नेमकी धांदल उडते आणि त्याला विश्रांती विसरावी लागते.
निवृत्ती हा स्वल्पविराम : निवृत्ती हा पूर्णविराम नसून स्वल्पविराम असतो, हे शिंदे साहेबांना माहिती आहे. अलिकडे अनेक निवृत्त लोक क्रियाशील असलेले दिसतात. यंग सिटीझनचे विविध उपक्रम सुरू असतात. स्पर्धा, सहली, आस्वाद, व्यायाम, हास्यक्लब इत्यादी द्वारे आपली राहिलेली इच्छा, स्वप्न, आणि छंद पूर्ण करताना दिसतात. निवृत्ती हे आपल्या आयुष्यातील एक कोरे पान आहे. आपल्याला आपले जीवन नव्या, वेगळ्या पद्धतीने जगण्याची एक नवी संधी आहे. ‘यंग सीनिअर्स’ म्हणून धमाल करण्याची काहीवर्षे आहेत. या दृष्टिकोनातून संजय शिंदे साहेबांची वाटचाल राहील, यात शंका नाही. कारण समाजसेवेचे व्रत त्यांच्या अंगात भिनलेलेच आहे.
धन्यवाद : ज्यांनी तुम्हाला आयुष्यभर पाठीशी उभे राहून समर्थपणे साथ दिली, आपला प्रपंच सांभाळला. त्या सौभाग्यवती मंदाकिनी वहिनींना द्यावे तेवढे धन्यवाद थोडेच आहेत.
शुभेच्छा : उर्वरित आयुष्यात आपणास व परिवारास आयुरारोग्य, सुख, समृद्धी, शांती आणि समाधान लाभो, हीच ईश्वरचरणी प्रार्थना! आयुष्यातील तुमच्या नव्या प्रवासासाठी माझ्याकडून व माझ्या सर्व मित्रांच्यावतीने लाख लाख शुभेच्छा!

– प्रा. भगवान खोत
(संचालक, शिक्षणमहर्षी डॉ. बापूजी साळुंखे स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र, कराड)
