काश्मीरमध्ये अडकलेल्यांचा परतीचा मार्ग सुकर

👇बातमी ऐकण्यासाठी येथे क्लिक करा.

आ. डॉ. अतुल भोसलेंकडून तिकिटाची व्यवस्था; शनिवारी रात्री परतणार पर्यटक

कराड/प्रतिनिधी : – 

काश्मीरमध्ये पर्यटनासाठी गेलेल्या आणि अतिरेकी हल्ल्यामुळे तिथेच अडकून पडलेल्या कराड व सातारा येथील ७ पर्यटकांना सुखरुप परत आणण्यासाठी कराड दक्षिणचे आ. डॉ. अतुल भोसले पुढे सरसावले आहेत. त्यांनी खा. उदयनराजे भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली या सातही प्रवाशांच्या विमान व रेल्वे तिकिटांची व्यवस्था केल्याने, हे पर्यटक शनिवारी (दि. २६) रात्री उशिरा कराडमध्ये सुखरुप परतणार आहेत.

कराडकरांचा समावेश : कराडमधील इंटेरियर डिझायनर महेश मिलिंद कुलकर्णी हे आपल्या कुटुंबासमवेत काश्मीरला पर्यटनाला गेले होते. त्यांच्यासमवेत माधवी मिलिंद कुलकर्णी, श्रीधर शामराव क्षीरसागर, वर्षा श्रीधर क्षीरसागर, सुखदा श्रीधर क्षीरसागर हे कराडचे रहिवाशी; तर शरद हरिभाऊ पवार व विद्या शरद पवार हे सातारचे दोघे पर्यटक होते.

अतिरेक्यांचा भ्याड हल्ला : पहेलगाम येथे अतिरेक्यांनी जेव्हा भ्याड हल्ला केला, तेव्हा हे पर्यटक गुलमर्गमध्ये होते. त्यानंतर ते तातडीने श्रीनगरमध्ये निवासाच्या ठिकाणी पोहचले.

गावी जाण्यासाठी हालचाल : या अतिरेकी हल्ल्यामुळे सर्वत्रच घबराटीचे वातावरण पसरल्याने पर्यटकांनी पुन्हा आपापल्या गावी जाण्यासाठी हालचाल सुरु केली.

फोनवरुन प्रत्यक्ष संपर्क : कराड व सातारा येथील हे पर्यटक श्रीनगरमध्ये अडकल्याचे समजताच आ. डॉ. अतुलबाबा भोसले यांनी बुधवार (दि. २३) त्यांच्याशी फोनवरुन प्रत्यक्ष संपर्क साधला.

पर्यटकांना दिलासा : यावेळी त्यांना आणण्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री ना. देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय उड्डाण वाहतूकमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्याशी चर्चा करत, तिकिटांची व्यवस्था करणार असल्याचे सांगितले. त्यामुळे या सर्व पर्यटकांना दिलासा मिळाला.

सुखरुप आणण्यासाठी प्रयत्न : या पर्यटकांना लवकरात लवकर कराडला सुखरुप आणण्यासाठी आ. डॉ. भोसले यांनी सर्व पातळ्यांवर आपले प्रयत्न सुरु ठेवले.

विमान व रेल्वे तिकिट व्यवस्था : आ. डॉ. भोसले यांनी गुरुवार (दि. २४) सायंकाळी खा. उदयनराजे भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली या सातही प्रवाशांसाठी श्रीनगर ते दिल्ली विमान प्रवास आणि दिल्ली ते कराड असे रेल्वे प्रवासाच्या तिकिटांची व्यवस्था केली.

दर्शन एक्सप्रेस : शुक्रवार (दि. २५) श्रीनगर आंतरराष्ट्रीय विमानतळावरुन इंडिगो एअरलाईन्सच्या विमानाने हे सातही पर्यटक दुपारी दीडच्या सुमारास दिल्लीतील इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर सुखरुप पोहचले. तिथून पुढे दर्शन एक्सप्रेसने हे सर्व पर्यटक शनिवारी (दि. २६) रात्री उशिरा कराड येथे पोहचणार आहेत.

खासदार, आमदारांचे आभार : आ. डॉ. अतुल भोसले यांनी तातडीने विमान व रेल्वे तिकिटांची व्यवस्था केल्याने या पर्यटकांकडून समाधान व्यक्त होत असून, त्यांच्या कुटुंबीयांनी खा. उदयनराजे भोसले व आ. डॉ. अतुल भोसले यांचे आभार मानले आहेत.

Jan Swarashtra
Author: Jan Swarashtra

Leave a Comment

error: Content is protected !!